०३/१२/२०१५

About the century of my articles, on this occassion remembered Great "Lokhitwadi" Gopal Hari Deshmukh and his marathi article series "Shatpatre"

शतपत्रे 

जन-निनाद मधील स्तंभास सुरुवात करून दोन वर्षे होत आहेत.लेखन प्रपंच सुरु केला त्यावेळी असे वाटले नव्हते की आपण इतके लिहू.परंतु वाचकांचा उदंड प्रतिसाद, वेळोवेळी मिळणाऱ्या प्रतिक्रिया, प्रेरणा यामुळे आजच्या या शंभराव्या लेखापर्यंत येउन पोहचलो.प्रतिसादाबद्दल खामगाव परिसरातील वाचकवर्ग तसेच वृत्तपत्राची इंटरनेट आवृत्ती, ब्लॉग आणि फेसबुकच्या माध्यमातून वाचणारे तसेच जन-निनाद संपादक आणि कर्मचारीवृन्दांचे आभार.
           डिसेंबर 2013 पासून सुरु केलेल्या लेखन प्रपंचास दोन वर्षे होत आहेत.दोन वर्षातील हा शंभरावा लेख.लेख लिहिण्यास सुरुवात केल्यावर असे वाटले नव्हते की आपण इतके लिहू.परंतु 'वाढता वाढे' करीत लेखांची संख्या आज शंभरवर जाउन पोहचली.हि पण एक 'सेंच्युरी' झाली.परंतु या 'सेन्च्युरीला' काही क्रिकेटच्या सेंच्युरी सारखे कौतुक मिळणार नाही.कारण वाचनप्रेमी हे क्रिकेटप्रेमीपेक्षा कमीच आहेत.येथे क्रिकेट लेखन,वाचन अशी तुलना किंवा तत्सम भाष्य करणे योग्य नाही.वाचन असो क्रिकेट असो ज्याचा त्याचा आपापल्या आवडीचा विषय आहे.परंतु एखादा मोठा आकडा गाठला की एक समाधान होत असते.मग तो अंक वाढत्या वयाचा असो,कंपनीच्या उत्पादनाने गाठलेला उच्चांक असो,,,, परीक्षेतील गुणांचा उच्चांक असो,, क्रिकेटच्या धावांचा उच्चांक असो , शेतीतील भरमसाठ पिकवलेल्या धान्याचा उच्चांक असो,. असा उच्चांक गाठणाऱ्यास काहीतरी निर्मितीचा किंवा उद्दिष्टपुर्तिचा आनंद मिळत असतो.असा आनंद कोणत्याही भौतिक सुखातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा निशितच सुखदायी असतो.आणि या आनंदाचा आस्वाद तो उच्चांक गाठणारा व्यक्तीच घेऊ शकतो. त्यालाच तो समजू शकतो.शंभराव्या लेखास शीर्षक काय द्यावे? असा प्रश्न भेडसावू लागला आणि शंभर, हंड्रेड, शत ,सेंच्युरी असे शब्द डोक्यात 'पिंगा' घालू लागले.(संजय भन्सालींच्या सुपीक डोक्यातील 'पिंगा' नव्हे ). शत शब्दाहून शतपत्रांची आठवण झाली  होय 'शतपत्रे' ! 'लोकहितवादी' गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकात 'शतपत्रे' लिहिली होती.त्यांनी एकूण 108 पत्रवजा लेख तत्कालिन समाजव्यवस्था, प्रथा, परंपरा यांबद्दल लिहिले होते. साधारणता: १० ते १२ वर्षापूर्वी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना हे वाचनात आले होते. स्पर्धा परीक्षांमध्ये काही यश मिळाले नाही परंतु कोणतीही गोष्ट वाया जात नसते. या अभ्यासातून माहिती आणि ज्ञानप्राप्ती झाली हे सुद्धा थोडके नव्हे.शतपत्रे काही वाचनात आली नाही परंतु ती लिहिणारे गोपाळ हरी देशमुख कायम स्मरणात राहिले. मग वाटले आपल्या शंभराव्या लेखास 'शतपत्रे' हेच शीर्षक का देवू नये? मनात अजूनही खळबळ आहे कि हे शीर्षक द्यावे कि नाही? कारण कुठे ते लोकहितवादी आणि कुठे आपण? लोकहितवादींच्या लिखाणातील ओंजळभर.जरी लिखाणकला आपल्यामध्ये आली तरी खूप झाले.मग परत विचार केला की मनात जे आले ते कुणाविषयी व्यक्तिगत द्वेषभावना, आकस न बाळगता निर्भीड आणि नि:पक्षपणे लिहित गेलो.लिहिता-लिहिता शंभर लेख झाले 'शत' हा आकडा गाठला.या 'शत' वरून मग 'शतपत्रे' आठवली आणि 'शतपत्रे' हेच शीर्षक लेखास योग्य आहे असे वाटले.कदाचित लोकहितवादिंची सुद्धा आशीर्वादरूपी मान्यता किंवा संकेत असेल. लेखांची हि शंभरी गाठतांना अनेक वाचक,सोशल मिडियावरिल वाचक,मित्र,आप्तेष्ट,संपादक व इतर सहकारी यांचा उदंड प्रतिसाद मिळत गेला.संपादकांनी लिखाणासाठी 'मुक्त हस्त' ठेवले.लेखन स्वतंत्रता अबाधित ठेवली.वाचकांचे फोन व संदेश यांमुळे लेख लिहिण्यास प्रेरणा मिळत गेली. एखाद्या सडेतोड लेख असला की वाचक फोन करून आनदाने बोलतात कारण अन्यायाबद्दल, चुकीचे जे आहे त्या विरुद्ध लिहिल्याबद्दल ज्या मनातील भावना जाहीर बोलता येत नाही तशा भावना कुणीतरी लेखांमधून व्यक्त करीत आहे असे समाधान त्यांना झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून कळते.एखादा 'छंद मनाला जडला की तो पिसे लावतोच' तसेच झाले 2013 पासून लिखाण छंद सुरूच आहे. अनेकांनी विचारले 'तुम्ही कसे लिहिता?', 'किती वेळ लागतो एक लेख लिहायला?' , "कसे काय सुचते ?" यावर मिर्झा बेग यांच्या कवितेतील एक ओळ आठवली ते म्हणतात की मी कविता करू शकतो कारण 'तो माझा ज्ञानेश्वर आणि मी त्याचा रेडा" तसेच हे सर्व "तो" लिहून घेतो. 2013 मध्ये कुण्या नतद्रष्टांनी सावरकरांची पुस्तके जाळली दु:ख वाटले आणि त्या विरोधात सर्वात पहिला लेख लिहिला शंभराव्या लेखाच्या वेळी "लोकहितवादिंचे" व त्यांच्या "शतपत्रांचे" स्मरण  झाले.प्रथम लेख आणि आजचा शतकी लेख दोन्ही थोर देशभक्त, प्रज्ञावंतांशी  संबंधित असे झाले . हा एक दैवी योगायोगच म्हणावा लागेल. लेखांची शंभरी गाठण्याचे श्रेय वाचकांचे आहे. त्यांच्या प्रतिसादाने हे शक्य झाले. वाचक, आप्तेष्ट, मित्र मंडळी तसेच जन-निनाद संपादक आणि  परिवार सर्वांचेच आभार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा