१६/१२/२०१५

Article about Bajirao First regarding the release of movie "Bajirao Mastani"

“इतिहास म्हणेल की बाजीराव जेवत होते ”

बुन्देलखंडाचा राजा छत्रसालाने  मो.बंगश याच्या आक्रमणाप्रसंगी मदत मागितली होती. ज्यावेळी निरोप बाजीराव महाराजांपर्यंत आला त्यावेळी ते जेवत होते. असे म्हटले जाते की त्यावेळी हातचा घास तसाच ठेवून बाजीराव उठले आणि उद्गारले "उशीर झाल्यामुळे जर छत्रसाल हरले तर इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते." आणि छत्रसालांच्या मदतीला धावून गेले.
‘बाजीराव मस्तानी ’ या संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटामुळे थोरले बाजीराव हे नांव निदान आठवले तरी गेले नाहीनतर  बाजीराव व त्यांचा पराक्रम ज्ञात असलेले जन अत्यल्प आहेत. यातील गाणे "पिंगा" प्रदर्शित झाले आणि हा सिनेमा चर्चेत आला. बाजीरावाची चरित्रसंपन्न, गुणी, नखशिखांत अंग झाकून राहणारी पत्नी काशीबाई या  
मस्तानीबाई सोबत नृत्य करतांना दाखवले आहे. होय मस्तानीबाईच ! कारण त्या सुद्धा बाजीरावांच्या द्वितीय पत्नी होत्या  त्यामुळे त्यांच्याविषयी सुद्धा मान ठेवूनच बोलायला नको का ? त्या नृत्यकलेत निपुण होत्या एवढेच. परंतू सदैव त्यांचे वर्णन एखाद्या दरबारी नर्तकी सारखे केले गेले. काशीबाई आणि मस्तानीबाई यांच्या सहनृत्याचा विचार सुद्धा कुणी करू शकत नाही आणि बाजीरावांनी सुद्धा तसा केला नसेल. अगदी स्वप्नातही केला नसेल. असा विचार फक्त गल्लाभरू चित्रपटवालेच करू शकतात. एखादी गोष्ट चालली की त्या गोष्टीचे भूत या फिल्मवाल्यांच्या डोक्यातून जोवर मोठी आपटी खात नाही तोवर उतरत नाही. देवदास मध्ये "डोला रे डोला रे " सहनृत्य गाजले. त्याचे भूत अजूनही भंसालीच्या डोक्यातून काही गेले नाही. मग त्याच प्रकारात त्याने पिंगा गाणे चित्रित केले. आता प्रेक्षकांंनी पिंगा गीत सहन करायचे आणि वर सहिष्णूता कमी झाली आहे अशी ओरड या फिल्मवाल्यांंनीच करायची. वास्तववादी काय आहे ते दाखवायला हवे उगीच आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी कल्पनेच्या भरा-या मारून आपल्याच महापराक्रमी प्रतिष्ठीत राजे, महाराजे, सरदार व त्यांच्या गोतावळीचा अपमान होईल असे काही करू नये. मल्हारी या गाण्यात चक्क थोरल्या बाजीरावांना सुद्धा नाचतांंना दाखवले आहे. असली नृत्ये, गाणी पाहून खरे इतिहासप्रेमी अतिशय दु:खी झाले आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी ज्याचे गुण हेरून अल्प वयात पेशवे (पंतप्रधान) पद दिले ज्यांना घोड्यावरून खाली उतरायला वेळ नव्हता ते आणि नाच गाणी ? काहीही दाखवायचे ...! थोरले बाजीराव आपल्या अवघ्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत मोठा पराक्रम गाजवून गेले त्यांना दुसरे शिवाजी राजे म्हणत. बाजीरावांनी सर्वच्या सर्व मैदानी लढाया जिंकल्या आहेत. याप्रसंगी बाजीरावांच्या पराक्रमा सोबत त्यांनी तत्परता व ते कुणाच्या मदतीसाठी कसे धावून जात अशी एक गोष्ट आठवते. बुन्देलखंडाचा राजा  छत्रसालाने  मो.बंगश याच्या आक्रमणाप्रसंगी मदत मागितली होती. ज्यावेळी निरोप बाजीराव महाराजांपर्यंत आला  त्यावेळी ते जेवत होते. असे म्हटले जाते की त्यावेळी हातचा घास तसाच ठेवून बाजीराव उठले आणि उद्गारले "उशीर झाल्यामुळे जर छत्रसाल हरले तर इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते." आणि छत्रसालांच्या मदतीला धावून गेले. ते वेळेवर पोहोचले विजय मिळवला असा हा मर्द मराठा गडी. होय मराठाच !...  आपण सर्वच महाराष्ट्रात राहणारे मराठेच तर आहोत ना ! छत्रसालाने खुश होऊन त्यांना मुलगा मानले , त्यांना काही राज्य दिले, आपली सुंदर गुणी कन्या मस्तानीबाई सोबत विवाह करून दिला. बाजीरावांचे दुर्दैव हे की सतत घोड्यावर असणा-या महापराक्रमी पंतप्रधानाच्या पराक्रमापेक्षा त्यांचे मस्तानीबाईंंवरील प्रेम यालाच जास्त महत्व दिले गेले . घोड्यावर बसल्या बसल्याच तलवारीने कणीस कापून हातावरच हुर्डा मळून खाणा-या व सतत  एका मोहिमेवरून दुस-या मोहीमेवर जाणा-या बाजीरावांचा पराक्रम उपेक्षिल्या गेला.इतिहासानी त्यांच्यावर अन्याय केला. मस्तानीबाई  यांची आई मुस्लीम असल्याने त्यांना व बाजीरावांना तत्कालीन रूढी परंपरेनुसार घरून आणि समाजातून प्रचंड विरोध झाला. एका मोहीमेवर असतांना ओंकारेश्वर जवळील रावेरखेडी या नर्मदा तीरावरील सध्याच्या मध्यप्रदेशातील गावात बाजीरावांचा मुक्काम होता. याच ठिकाणी त्यांना ज्वराने का उष्माघाताने ग्रासले. असे म्हणतात की त्याही स्थितीत या महारथीने नर्मदेत पोहोण्याची पैज लावली  व याचा त्यांना अधिकच त्रास झाला आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्यावर चित्रपट निघाला तोही हिंदी खूप आनंद वाटला. असे वाटले थोरल्या बाजीरावांनी त्रिखंडात गाजवलेला पराक्रम त्रिखंडाला पुनश्च दिसेल परंतू "पिंगा" , "मल्हारी " गाण्यात काशीबाईना व बाजीरावांना नाचतांना  दाखवलेले पाहून प्रत्येक मराठी मनाला वेदना झाल्या. पण चित्रपटाला विरोध आणि निदर्शने अतिशय तुरळक ठिकाणी झाली कारण बाजीरावांना इतिहासातून जनतेच्या मनामनात  पोहोचवलेच गेले नाही. आपण सर्वानी बाजीरावांचा पराक्रम विसरून त्यांची उपेक्षा केली आणि या चित्रपटाने त्यात भर टाकली. आपल्या पराक्रमी पूर्वजांना असे चित्रित केलेले पाहून पेशवे वंशज व मस्तानीबाई वंशज यांनी तक्रारी केल्या आहेत. संजय लीला भंसाली यांच्या कारकीर्दीवर भविष्यात कुणी चित्रपट बनवला व त्यात आपल्या कल्पनेने "लीला" दाखवल्या तर भंसाली कुटुंबियांची प्रतिक्रिया तीव्रच राहील ना !

६ टिप्पण्या: