३१/०३/२०१६

Leopard seen in Botha Forest 25 km from Khamgaon Dist Buldhana

व्याघ्र दर्शनानंद
      मानवाला जर खरा आनंद पाहिजे असेल तर तो आनंद हा नेहमीच नैसर्गिक गोष्टीतून प्राप्त होत असतो.आज-काल ‘एन्जॉय’ हा शब्द तरुण वर्गात प्रचलित झाला आहे.पण खरा एन्जॉय मिळत असतो निसर्गाच्या सानिध्यात जाण्याने,अध्यात्मिक वाचनातून,एखाद्या लहान मुलाच्या बोबड्या बोलीतून.जंगलातून जात असतांना अचानक एखादा जंगली प्राणी दिसला तर करोडो रुपयातून मिळणा-या आनंदापेक्षा त्या वन्यजीवाने दिलेल्या दर्शनाचा आनंद जास्त सुखद असतो. अर्थात निसर्ग आणि रसिक माणसासाठी तो आनंद सुखद असतो सर्व आनंद पैशाने तोलणा-यांसाठी नव्हे.”निसर्गाकडे चला” असे रवींद्रनाथ टागोर सुद्धा म्हणत.मंगळवारी अशाच आनंदाची अनुभूती मिळाली.मंगळवारी साधारणत: सायंकाळी ६ च्या सुमारास आम्ही पाच जण कारने बुलडाण्याला निघालो.बोथा जंगलात पाय मोकळे करण्यास उतरलो.परत प्रवास सुरु केला आमचे मित्र नितीन बाहेकर सर हे गाडी चालवत होते.आमची गाडी बोथा घाट जिथे सुरु होतो तिथे पोहचली आणि तोच बाहेकर सर म्हणाले “अरे बघा समोर काय आहे” एक सोबती म्हणाला “अरे तडस ! ” अधिक जवळ जाताच तो बिबट्या आहे असे सर्वांच्याच लक्षात आले.एक पूर्ण वाढ झालेला,अंगापिंडाने धष्टपुष्ट, तरुण बिबट्या आमच्या कारच्या अगदी १०-१२ पावले समोरून निर्भीडपणे राजेशाही ऐटीत, मंदगतीने रस्ता ओलांडत होता.बाहेकर सरांचा उजवा पाय आपोआपच ‘अॅक्सल्ररेटर’ वरून ‘ब्रेक’ वर ठेवला गेला.गाडी उभी झाली पाठोपाठ एक खाजगी प्रवासी ‘ट्रॅक्स’ उभी राहिली.बिबट्या इतक्या अचानकपणे प्रकट झाला की त्याला पाहावे की भ्रमणध्वनीच्या कॅमें-यात कैद करावे काहीच भान नव्हते.त्याला प्रत्यक्ष पाहण्याचा आनंदच इतका होता कि सर्व काही क्षणात विसरूनच गेलो.हल्ली ‘व्हॉटस अॅप’,‘फेसबुक’ अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने वन्यजीवांची चित्रे आणि चलचित्रे मिळत असतात.या माध्यमांच्या मेसेजेसच्या सततच्या भडीमारामुळे नवीन पिढीला वन्यजीवांची काही नवलाई राहिली नाही.परंतु जंगलात अचानकपणे एखादा वन्यजीव दिसला तर ते भाग्यच असते.त्या जंगली श्वापदाला वनात स्वतंत्रपणे संचार करतांना पाहण्याचा आनंद काही औरच.लोक विविध राष्ट्रीय उद्याने,अभयारण्ये यांना भेटी देतात परंतु भाग्य असेल तरच या लोकांना व्याघ्र अथवा अन्य वन्यजीवाचे दर्शन होते नाहीतर अनेक लोकांच्या अशा भेटी व्यर्थ गेल्या आहेत.आम्ही मात्र या बाबतीत ‘लकी’ ठरलो.जवळच्या जवळ बोथ्याच्या जंगलात व्याघ्र दर्शन घडल्याने अधिकच आनंद झाला.कारण जास्तीत जास्त लोक नेहमी म्हणत असतात “कुछ नहि अब बोथा जंगल में”. काहीही ध्यानी मनी नसतांना ‘तो’ आमच्या समोर आला.आमच्या कडे पाहत त्याने रस्ता पार केला.उजव्या बाजूला जंगलात १०-१२ पाऊले गेल्यावर परत मागे वळून ‘सी ऑफ’ केले.त्याच्या या सर्व बाबी आम्ही आमच्या स्मृतीच्या कॅमें-यात कायमच्या कैद केल्या.हे सर्व पुन्हा जवळच्याच ‘बोथा फॉरेस्ट’ मधे घडले कुठे लांबच्या ठिकाणी जावून तासं-तास प्राण्याची प्रतीक्षा करत बसावे लागले नाही.नंतर ‘त्याच्या’ चर्चेत सर्व मग्न झाले आणि बुलडाणा केंव्हा आले कळले सुद्धा नाही. हे वन्यजीव अनादी अनंत काळापासून आपले सोयरे आहेत.भारतीय परंपरा सदैव प्राणी मात्रांवर दया करा असेच शिकवत आली आहे.कण्व ऋषींच्या आश्रमात शकुंतलेसह अनेक वन्य जीव प्रेमाने वास करीत,चांगदेव वाघावर बसत,चक्रधर स्वामींच्या मांडीवर वाघांची पिल्ले येऊन बसत.अशी आपली संस्कृती.मुक्या वन्य प्राण्यांना मारण्याची प्रथा आणली ती मुघल शासक आणि इंग्रजांनी.आपणा सर्वांना मुक्या प्राण्यांचे रक्षण करण्याची शिकवण आहे हे आपण विसरून जाता कामा नये. आपण जर त्यांचे रक्षण केले तर पुढच्या पिढ्यांना सुद्धा प्रत्यक्ष ‘व्याघ्र दर्शन’ किंवा इतर प्राण्यांचे दर्शन घडेल ना ! मोबाईल,कम्प्यूटरवर त्यांची चित्रे,चलचित्रे पाहण्यात प्रत्यक्ष दर्शनानंदाची गंमत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा