१९/०५/२०१६

Mubarak Begum, who sang the evergreen song “Kabhi tanhaiyon mein yun hamari yaad ayegi,” from the 1961 movie “Hamari Yaad Aayegi”

...हमारी याद आयेगी?
लहानपणी रेडीओ खूप ऐकला आहे.काही बोटावर मोजता येईल इतक्याच घरी टीव्ही होता.मोठा 50-60 फुटाचा अँन्टिना आणि   ब-हाणपूर केंद्र.चित्र काही बरोबर दिसे ना. खूपच खराब दिसत असले कि अँन्टिना फिरवण्याचे उपद्व्याप होत असत. बहुतांश लोक मात्र बातम्या आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमा करिता या रेडीओवरच निर्भर होते.वृत्त,गाणी,कृषी,हवामान याबाबतच्या इत्यंभूत माहितीसाठी रेडीओ म्हणजे “बहुत जनांचा आधारू” होता.याच रेडीओवर तेव्हा ऐकलेली गाणी आजही आठवतात सिलोन केंद्र जे आता मरणासन्न अवस्थेत आहे त्यावरील कार्यक्रम, दुपारी जळगाव केंद्रावरील ‘आपली आवड”,रात्री “बिनाका” आणि “फौजी भाईयोके लिये” असलेला “जयमाला” असे सगळे– सगळे आजही स्मरणात आहे.याच रेडीओमुळे लता,किशोर,रफी,आशा आणि इतर अनेक गायक, संगीतकार यांची नावे कळली. मराठी मालिका आणि चित्रपटातील  नामांकित कलाकार रमेश भाटकर यांचे वडील स्नेहल भाटकर संगीतकार होते हे ज्ञान रेडिओ मुळेच.सकाळी जळगाव केंद्रावर प्रसारीत होणा-या “आराधना” या भक्तिगीतांच्या कार्यक्रमामुळे अनेक अभंग परिचित आणि पाठ सुद्धा झाले.“दोगाना” म्हणजे “डयूएट” याचा उलगडा रेडीओनेच करून दिला. तसेच एका गुणी परंतु उपेक्षित गायिकेचे नांव सुद्धा या रेडीओनेच ज्ञात करून दिले ते म्हणजे “मुबारक बेगम”.“ऑल इंडिया रेडीओ” येथे मुबारक बेगम यांच्या कारकिर्दीची एक संगीत कलाकार म्हणून सुरुवात झाली होती.मुबारक बेगमनी गायलेली गाणी जरी सुप्रसिद्ध झाली नसतील किंवा रसिकांना परिचित नसतील तरी जी काही गाणी गायली ती मनापासून गायली आणि रसिकांच्या आजही स्मरणात आहेत.स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले “कभी तनहाईयोमे युं हमारी याद आयेगी” आणि शंकर–जयकिशनचे  “मुझको अपने गले लगालो” ही दोन गाणी म्हणजे मुबारक बेगमची सर्वात जास्त गाजलेली गाणी.जरी जास्त गाणी गायली नसतील किंवा प्रसिद्ध गाणी कमी दिली असतील तरी हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मुबारक बेगमला वगळता येवू शकत नाही.पूर्वी सर्वच लोक जे काही कार्य करीत मनापासून करीत असत.पैसे तर मिळत परंतु निव्वळ पैस्यासाठी म्हणून काम होत नसे.राज कपूरने सतत कबीराचे दोहे गुणगुणणा-या कवी शैलेन्द्रला स्वत:च्या सिनेमासाठी ऑफर दिली असता “मै पैसोके लिये नही लिखता” असे म्हणत फिल्मी गाणी लिहिण्यास राज कपूरला प्रथम नकार दिला होता.मुबारक बेगम सुद्धा त्याच पठडीतल्या.आज वन रूम किचन मध्ये मुंबईमधील जोगेश्वरीत राहत असलेल्या मुबारक बेगम यांची प्रकृती आता खालावली आहे.निव्वळ पैस्यासाठी म्हणून काम केले असते किंवा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी समव्यवसायीकांवर गळेकापू कुरघोड्या केल्या असत्या तर कदाचित त्यांच्या जवळ सुद्धा आज बक्कळ पैसा असता.मुलगा खाजगी वाहनचालक असलेल्या मुबारक बेगम यांना सरकारनी २०११ पासून पेन्शन लागू केली आहे.काही सज्जन लोकांनी त्यांना वर्गणी जमा करून पैसे उपलब्ध करून दिले आहेत.परंतु आश्चर्य वाटते ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या निष्ठुरतेचे,आपल्याच व्यवसायातील एक व्यक्ती इतकी विपन्नावस्थेत आहे तरी तिच्याकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील कुणीही फिरकले नाही.इतर चाकरमाने किंवा व्यवसायिक त्यांच्या व्यवसायातील मित्राला काही क्षती पोहचली तर आपण पाहतो कि सर्व जमा होऊन त्याला आणि त्याच्या परिवाराला मदत करतात.हिंदी चित्रपटसृष्टी मात्र यास अपवाद आहे.एखाद्या कलाकाराच्या प्रसिद्धीचा सूर्य एकदा का अस्ताकडे झुकू लागला कि ‘बॉलीवूड’ मध्ये रुपांतरीत झालेली हिंदी चित्रपटसृष्टी त्या कलाकाराकडे पाठ फिरवते. कारकिर्दीला उतरती कळा लागली की एकेकाळच्या रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या कलाकाराकडे हिंदी चित्रपटसृष्टी ढुंकून सुद्धा पाहात नाही.ललिता पवार,विनोदवीर मेहमूद,परवीन बाबी,मनोरुग्ण झालेला व हयात असलेला राजकिरण आणि आता आजाराने त्रस्त असलेल्या मुबारक बेगम असे अनेक कलाकर त्यांच्या अंतिम दिवसात एकलकोंडे झाले.त्यांच्याकडे कुणीही फिरकले सुद्धा नाही.स्वत: गायलेल्या “मुझको अपने गले लगालो” प्रमाणे कुणीतरी आपल्याला आपुलकीने येऊन भेटावे गळाभेट घ्यावी असे मुबारक बेगम यांना कदाचित वाटत असेल.रसिकांना मात्र नेहमीच एकटेपणात मुबारक बेगम यांच्या आर्त स्वरातील “कभी तनहाईयोमे युं हमारी याद आयेगी” प्रमाणे त्यांची आठवण कायम राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा