११/०९/२०१६

Reasons of frequent attack on Maharashtra Police

खलनिग्रहणाची वेळ आली आहे   
ज्ञानेश्वर माऊलींनी 800 हून अधिक वर्षांपूर्वी “जे खळांची व्यंकटी सांडो” असे म्हणत पसायदान मागितले होते.ते आजही मागावेच लागत आहे कारण काही दिवसांपूर्वी विलास शिंदे या पोलिसाचा एका तरुणाने केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला.त्यानंतर परवा कल्याण जवळील तिसगाव येथे गणपती विसर्जन करतांना नितीन डगळे या पोलिस उपनिरीक्षकास बुडवून मारण्याचा प्रयत्न केला गेला.सुदैवाने नितीन डगळे बचावले.गायकवाड आडनाव असलेल्या चार आरोपीना अटक झाली आहे.हे आरोपी स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक असल्याचे सांगितले जाते.काल सुद्धा एका दुचाकीस्वाराने पोलिसास धडक देवून पोबारा केला.या सर्व घटनांपूर्वी एका महिला पोलिसाने हटकले तर त्यांना एक शिवसेनेच्या पदाधिका-याने भर चौकात गाडीतून खेचून मारले होते.गोंदिया का भंडारा येथे एका आमदाराने पोलिसाला मारण्याची चित्रफीत वाहिन्यांवरून झळकली होती.अशा नाना घटना घडल्या.खल प्रवृत्तींची मजल थेट सदरक्षण करणा-या पोलिसांवरच हल्ले करण्यापर्यंत गेली.तेथे सामान्य नागरिकांचे काय?समाजात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.राज्याचे पोलीस महासंचालक यांनी तरुणांना सरकारी नोकरी,पारपत्र मंजुरी आणि इतर शासकीय कामकाजात असे हल्ले केल्याने अडथळे येतील असे स्पष्ट केले.अशा प्रकारांसाठी “फास्ट ट्रॅक” न्यायालय सुरु करण्याचे सुरु झाले.मुळात असे हल्ले का होत आहे?याची सुरुवात कशी काय झाली? या हल्यांची कारणे शोधण्याचे जर ठरवले तर आपणास मुख्यत: पुढील तीन कारणांत या ह्ल्यांचे मूळ असल्याचे लक्षात येते.
पहिले कारण म्हणजे लोकप्रतिनिधींनी सरकारी कर्मचा-यांवर केलेले हल्ले याच्यातून हे हल्ले वाढले.आपले नेते कर्मचारी, पोलीस यांना अगदी कस्पटासमान मानतात तर मग आपण सुद्धा काही केले तर काय बिघडणार?असा कार्यकर्त्यांचा भ्रम झाला त्यांच्या अंगात सुद्धा “जोश” आला आणि मग सरकारी कर्मचारी आणि आता पोलिसांवर सुद्धा हल्ले होण्यास सुरवात झाली.
दुसरे कारण म्हणजे “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या आपल्या बोधवाक्याचा खुद्द पोलिसांनाच पडलेला विसर.सामान्य पांढरपेशा नागरिकांशी पोलीस सुयोग्य वर्तन करतांना दिसत नाही असे बरेचदा घडते.पांढरपेशा वर्ग त्यांच्या पाल्यांना लहानपणापासूनच पोलिसांचा धाक, भीती दाखवत असतो.त्यामुळे पांढरपेशा वर्ग काही न करता सुद्धा पोलीस म्हटले की घाबरतोच आणि मग पोलिस त्यांनाच अधिकच धाक दाखवतात.अशातच मग एखादा आपली सहनशक्ती गमावतो आणि हल्ला करतो.
तिसरे कारण म्हणजे आपली हिंदी चित्रपटसृष्टी.हिंदी चित्रपटातून पोलिसांचा जेवढा अपमान करतात तेवढा इतर कुणाचा अपमान होतांना चित्रपटातून दिसून येत नाही.त्यामुळे पोलीस म्हटला की तो भ्रष्टच असा समज आता नागरीकांचा झाला आहे.तसेच या चित्रपटांचा प्रभाव समाजातील खल प्रवृत्ती असेलेल्या लोकांवर सुद्धा पडतो आणि मग ते चित्रपटा प्रमाणेच प्रत्यक्षात सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात.तरीही पोलीस विभाग याच चित्रपटसृष्टीतील नट-नट्यांना किंबहुना विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या नट-नट्यांना नाचवण्याचे कार्यक्रम घेतोच.

अशी काही कारणे आहेत इतरही अनेक करणे असू शकतात, असतीलही. असे हल्ले होणे हे कायद्याचा धाक राहेला नाही हे सूचित करणारे आहेत.यावर सरकार, गृह मंत्रालय, पोलीस विभाग त्वरने उपाय शोधतील कारण आता त्यांच्यावरच हल्ले होत असल्यामुळे सामान्य नागरिकांवर हल्ला झाल्याने काय शारीरिक आणि मानसिक यातना होत असतील याची त्यांना कल्पना आली असेल. तेंव्हा पोलिसांनी आता आत्मपरीक्षण करून समाजात पुनश्च आपला आदरयुक्त दरारा निर्माण करावा आता खरेच खलनिग्रहणाची वेळ आलेली आहे.   

०२/०९/२०१६

Sad Story of Dana Manzi of Orisa state

दोन मांझी आणि संवेदनाहीन आपण     
      बातमी जरी ओडीसा मधील असली तरी संवेदनाहीन आपण असेच म्हणावे लागेल.कारण देश हा माणसांचा बनलेला असतो. या नात्याने मग आपण सर्वच संवेदनाहीन नाहे काय? कटू आहे परंतू सत्य आहे की आपण भारतीय दिवसें-दिवस संवेदनाहीन बनत चाललो आहोत. त्यातल्या त्यात वैद्यकीय सेवा म्हटली की विचारूच
नका. बिहार मध्ये पत्नीला वैद्यकीय सेविका त्वरीत पुरवता आली नाही म्हणून मोठा पहाड एकट्याने फोडून रस्ता करणा-या “माऊंटन मॅन” दशरथ मांझी याचा किस्सा नुकत्याच एका चित्रपटाने जागा समोर आणला आणि आता अजून एका दुस-या मांझीचा किस्सा जागा समोर सोशल मिडीयाने आणला. हा दुसरा मांझी म्हणजे ओरिसा राज्यातील दाना मांझी. क्षय रोगाने ग्रस्त पत्नीला रुग्णालयात भरती केल्यावर तिचा तेथे मृत्यू झाला. मांझीचे खेडे रुग्णालयापासून ५० ते ६० किमी अंतरावर. रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. मांझी कितीतरी वेळे प्रतीक्षा करीत तेथे थांबला परंतू रुग्ण आथवा त्याचे आप्त यांची आस्थेने, आपुलकीने चौकशी करतील ते रुग्णालयाचे कर्मचारी कसले? मांझी शेवटी कंटाळला, थकला आणि त्याने पत्नीचे कलेवर कापडात गुंडाळले, खांद्यावर घेतले आणि १२ वर्षाच्या मुलीसह रुग्णालय सोडले. रुग्णालय तेथील कर्मचारी यांचे तरीसुद्धा काही भान नाही. मांझी पत्नीचे शव एकटा खांद्यावर घेवून अंदाजे 15 किमी दोन तास घेवून कुणालाही तक्रार न करीता चालत होता. याला काय म्हणावे ? ६९ वर्षे झाली स्वतंत्रता प्राप्त होवून. या देशातील नागरिक मात्र सुविधांपासून वंचितच, गरीबी हटाव सारख्या शाब्दिक चळवळी करून गरीबी अजून हटलीच नाही. ती उलट वाढतच आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधींची अवैध मार्गाने मिळवलेली संपत्ती मोजता-मोजता संबंधीत कर्मचा-यांच्या नाकी नऊ येते. मांझीच्या गरीबीमुळे त्याच्यावर ही वेळ आणली होती. शेवटी एका स्थानिक माध्यमाने मांझीची ही करूण गाथा प्रकाशित केली. ‘सोशल मिडीयावर’ झळकली. नंतर मग मृतदेह तेथून पुढे नेण्यासाठी रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. मांझी कडे मदतीचा ओघ पसरला सर्वात आधी मदत कुणी करावी ? सर्वात आधी मदत पोहचली ती ‘बहरीनच्या पतंप्रधानांची.नंतर एका NGO ने मांझीला मुलीचे शिक्षण आणि मुलगी मोठी होई तो दरमहा ठराविक रक्कम देण्याचे ठरवले.
      मांझीला मदत मिळाली खरी परंतू दशरथ मांझी, दाना मांझी यांसारखे अजून किती मांझी आपण निर्माण होवू देणार आहोत? आपल्या मनातील गरीबांविषयीची कळवळ संपली का? आपणास आपले कर्म, आपला पैसा , आपले कुटुंब यांसोबतच इतर भारतीय नागरिकांशी काहीही घेणे देणे नाही का ? स्वामी विवेकानंद म्हणतात “ मै उसी को महात्मा समझूंगा जिसका हृदय गरिबोंके लिये रोता है अन्यथा वो दुरात्माही है” या वाक्याच्या अनुषंगाने आपण सर्वच आता दुरात्मेच झालेलो आहोत. आणि तसे जर नाही आहे तर मग बिहार मधील दशरथ मांझीला एकट्याने पहाड फोडून रस्ता तयार करण्याचे काम पडलेच नसते आणि ओरिसा मधील दाना मांझी यांस पत्नीचा मृतदेह एकट्याने खांद्यावर न्यावा लागला नसता. परंतू तसे नाही आहे आणि म्हणूनच ६९ वर्षानंतर अनेक घोटाळे करून गबर झालेले आणि गरीबी, दुही कायम ठेवणारे लोकप्रतिनिधी असलेल्या आपल्या देशाची ही हार आहे.