२७/०२/२०१७

मराठी भाषा दिवस विशेष

मराठीची "कंडीशन"
मुद्दामच शीर्षक इंग्रजाळलेले असे दिले . आज आपली मराठी अशीच नाही आहे का झाली ? आज दि.27/12/2017 मराठी राजभाषा दिन आज दि.27/12/2017 मराठी राजभाषा दिन सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. म्हणून म्हटले की मराठी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनानुसार विकिपीडिया वर खाते उघडून जरा मराठी लेखन करावे. कारण तसे इतर भाषांशी तुलना केली तर विकिपीडिया वर मराठी अगदी शेवटच्या क्रमांकाकडे गेलेली दिसते. तसेही आता मराठी भाषा आणि भाषिक हे इंग्रजाळलेले मराठी बोलत असतात. चांगले लेखन आता क्वचितच होतांना दिसत आहे.पु.ल.देशपांडे , चि. वि. जोशी , कुसुमाग्रज , सुरेश भट , भाऊसाहेब पाटणकर , शांता शेळके , बहिणाबाई चौधरी , द.मा.मिरासदार , व.पु. यांच्या सारखे मराठी लेखन आता होतांना दिसत नाही. काही सन्मानीय अपवाद जरूर आहेत परंतू हाताच्या बोटावर मोजता येतील इतके. इंग्रजी शाळेत शिकणा-या मराठी माणसाच्या मुलास मराठी आकडा हा इंग्रजीत सांगावा लागतो."बाबा अठ्ठावीस म्हणजे "ट्वेंटीऐट" का? " असे विचारणारे पाल्य आपणास घरोघरी दिसतील. अर्थात माझेही पाल्य यास अपवाद नाही.करणार काय ? मराठी शाळांत टाकले तर मुलगा मागे पडण्याची भीती , शेजा-याचा मुलगा इंग्रजी शाळेत जातो आणि माझा मराठीत जाईल याची वाटणारी लोक लाज यामुळे मग मराठी मुले मराठी वाचन आणि भाषा यांपासून दुरावत जात आहे. प्रत्येक पालकाने त्यांचा मुलाला कोणत्या शाळेत टाकावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू प्रत्येक पालक आपल्या पाल्यास निदान रोज एक मराठी पान लिहण्यास आणि वाचण्यास सांगू शकतो. इतर देश , आपल्या भारतातील काही राज्ये जशी मातृभाषेचा आदर करणारी आहेत, अभिमान बाळगणारी आहेत तसे महाराष्ट्रीयन मात्र नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागते. किती लोक आता भावगीते ऐकतात ? किती सकाळी आकाशवाणीवर अभंग ऐकतात ? किती तरुण मुले जुन्या पिढीतील मराठी लेखकांची पुस्तके वाचतात? असे विचारले तर निराशाजनक आकडा समोर येईल. मृत्यंजय कादंबरी कोणी लिहिली असे एका तरुणास विचारले असता शिवाजी सावंत ऐवजी शिवाजी साटम असे उत्तर येते याला काय म्हणावे ? भाऊसाहेब पाटणकर मराठी शायरी करत होते. किती जणांना पाटणकर माहीत आहेत? मराठी माणूस , मराठी अभिमान , मराठी अस्मिता असे सतत म्हणणारा शिवसेना पक्षाला महापालिका निवडणूकीत त्यांचे प्रचाराचे घोषवाक्य "डीड यु नो?" असे इंग्रजीत लिहावे लागते!"अमृतातही पैजा जिंके " असे ज्ञानेश्वर जिचे वर्णन करतात त्या मराठी आईचे अमृतासमान दुग्ध प्राशन केलेला बालक त्याच्या आईला मम्मी हाक मारतो ? हे का झाले , आपण असे आणि इतके कसे काय इंग्रजाळलो? कुठे गेले आपले मातृभाषा प्रेम? मराठी माणूस कुठेच मागे नाही आहे त्याने आपले झेंडे अटकेपार लावले आहेत आणि लावत आहे. "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" अशी मराठी माणसाची ख्याती आहे. गरज आहे ती फक्त त्याने आपल्या मातृभाषेचा सन्मान करण्याची ,मराठी माणसाने आपली भाषा समृद्ध करावयास हवी. आपल्या भावी पिढीस मराठी या आपल्या मायबोलीची गोडी लावण्याची,सर्व मराठी भाषिकांचे मेळावे घेण्याची, जात-पात विसरून मराठी भाषिक या एका गोष्टी साठी एकत्र येण्याची तेंव्हा कुठे भाषेबद्दल प्रेम, अभिमान निर्माण होईल. डोंबिवली या मराठी बहुल मुंबई उपनगरात मराठी साहित्य संम्मेलनात खुर्च्या रिकाम्या कशा राहतात? याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.बरेचवेळा दोन मराठी भाषिक भेटतात आणि हिंदीत संभाषण करतात. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे मान्य आहे त्या भाषेचाही आदर आहे अरे पण तुम्ही दोघे मराठी आहात ना ! मग उगीच मोडक्या तोडक्या हिंदीत का बोलता? कुठेही गेले की मराठी माणूस दुकानदार अथवा तत्सम व्यवसायीकाशी हिंदीत बोलणे सुरु करतात बरेचदा तो मराठीत बोलतो परंतू हाच आपला मर्द मराठी हिंदीचे ज्ञान पाजळतो. असो ! आजच्या दिवसापासून तरी आपण सर्व मराठी बांधव आपली मातृभाषा समृद्द करण्याच्या, तिचा आदर करण्याचा वसा घेऊ.जय महाराष्ट्र !

२३/०२/२०१७

Great Freedom Fighter One And Only Vinayak Damodar Savarkar visited Khamgaon on 18 Feb 1942. 75 years completed to his Khamgaon Visit on 18 Feb 2017

यज्ञकुंड धगधगतच राहणार 

         

                    दि 18 फेब्रुवारी 1942 ला  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे संत पाचलेगांवकर महाराज आयोजित “हिन्दू संघटन यज्ञ” या कार्यक्रमा करीता खामगांवला आले होते.यावर्षी 18 फेब्रुवारीला या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाली.या घटनेचे स्मरण म्हणून खामगांव अर्बन बँक आणि विदर्भ साहित्य संघ खामगांव यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड” हा भागवताचार्य मा. श्री वा.ना.उत्पात यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.18 फेब्रुवारी ला मोहनरावांनी प्रमुख वृत्तपत्रातून सावरकर यांच्या खामगांव भेटीचा व पाचलेगांवकर महाराज भेटीचा सविस्तर वृत्तान्त प्रसिद्ध केला होता. तो वाचूनच सावरकर यांच्या खामगांव भेटीची इत्यंभूत माहिती मिळाली. मग काय शनीवार 18 फेब्रुवारीचे सायंकाळचे नियोजन आखून घेतले कारण हा कार्यक्रम चुकायला नको होता. कार्यक्रमाची सुरुवात “जयोस्तुते जयोस्तुते” या सावरकर रचित काव्याने जोशात समूहगान करुन झाली व श्रोत्यांमधे चैतन्य निर्माण झाले. श्री वा.ना.उत्पात यांनी त्यांच्या अमोघ शैलीत सावरकर यांच्या जीवनातील अनेक घटनांचा उलगडा केला.श्री उत्पात यांचे वय ७७ वर्षे असूनही त्यांची दांडगी स्मरणशक्ती व संस्कृतप्रचुर अमोघ वक्तृत्व याचा प्रत्यय श्रोत्यांना येत होता.सावरकर यांचे बालपण, इंग्लंडमधील दिवस,रॅंगलर परांजपे, खेर यांचे किस्से. सावरकरांच्या प्रेरणेने मदनलाल धिंग्रा व अनंत कान्हेरे कसे प्रेरित झाले होते आणि त्यांनी इंग्रज अधिका-यांना कसे ठार केले हे श्रोत्यांना कळले.“ने मजसी ने परत मातृभूमीला” हे काव्य ब्रायटनच्या समुद्र कीना-यावर सावरकरांना कसे स्फुरले ते रडत-रडत हे गीत गात होते आणि पाल हा त्यांचा सहकारी ते उतरवून घेत होता हे सांगतांना उत्पात यांचा गळा भरून आला होता तसेच अनेक श्रोत्यांचे डोळे पाणावले होते. 1905 या वर्षी दूरदृष्टीच्या सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती आणि त्याचा निषेध गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून केला होता. नंतर 1938 मधे स्वत: गांधीजींनीच विदेशी कपड्यांची होळी करीत आपसूकच सावरकरांचे अनुसरण केले होते.फाळणी होणार हा अंदाज सुद्धा सावरकरांना आधीच आला होता.फाळणी नंतर नेहरुंना पंतप्रधान न करता डॉ.आंबेडकर यांना पंतप्रधान करावे अशी बॅ. जिना यांची विनंती गांधीजींनी धुडकावून लावली होती असे कथन श्री उत्पात यांनी पट्टाभी सीतारामय्या यांच्या पुस्तकाचा दाखला देत केले.आज खोटा इतिहास लिहिणारे गल्लोगल्ली झाले आहेत,सावरकरांची एवढी उपेक्षा का? असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.सावरकर व त्यांचे जेष्ठ बंधू बाबाराव, पत्नी, वहीनी, कनिष्ट बंधू सर्व कुटुंबच्या कुटुंब स्वातंत्र्यासाठी झटले.सावरकरांच्या वहीनीला तर नाशिकच्या घाटावरील पिंडाच्या भातावर जीवन जगावे लागले. कुणाशीही तुलना नाही परंतू सावरकर यांच्या इतक्या हाल अपेष्टा कुणाच्याच झाल्या नाहीत.इतके सोसणा-या सावरकरांची भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर सुद्धा उपेक्षा केली.शत्रुराष्ट्र पाकीस्तानचे पंतप्रधान लियाकत अली आले असता सरकारने आपल्या स्वातंत्र्यवीरास तुरुंगात धाडावे ! अशी निर्लज्ज कृती भारतातच होवू शकते. मनोहर जोशी लोकसभेचे सभापती असतांना त्यांच्या पुढाकारामुळे संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावले गेले व मागील शासनाच्या सावरकरांच्या बाबतीतील चुकांचे पापक्षालन केले.शेवटी “झालेत बहु, होतील बहु परंतू या सम हाच” असे स्वातंत्र्यवीरांना उद्देशून ते म्हणाले.व्याख्यानाचा विषय सावरकर म्हटल्यावर विशिष्ट वर्गच कार्यक्रमाला हजर राहील अशी अपेक्षा असते परंतू कोल्हटकर स्मारक पूर्ण भरलेले पाहून सावरकर आता जनतेला कळू लागले पटू लागले अशी आशा वाटली आणि सावरकर हे धगधगते यज्ञकुंड जनतेत असेच धगधगतच राहणार याची खात्री पटली. असा सर्वांगसुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खामगांव अर्बन व विदर्भ साहित्य संघ पदाधिका-यांचे आभार. भविष्यात सुद्धा असे उत्तमोत्तम, सावरकरांच्या भाषेत सांगायचे झाले तर "जे जे उत्तम उदात्त उन्नत" कार्यक्रम आयोजित करावेत अशीच सर्व रसिकांच्या वतीने विनंती.

१६/०२/२०१७

Ex All Rounder Cricketer Rahul Dravid again showed his humbleness and Genteelness as he is known as a real Gentleman

खराखुरा जेंटलमन
       
साहेबाचा खेळ क्रिकेट हा “जेंटलमन गेम” म्हणून ओळखला जातो. यातील खेळाडू हे खिलाडू वृत्तीने आणि सभ्यतेने खेळतात म्हणून तसे म्हटले गेले आहे. जरी सभ्य गृहस्थांचा खेळ असला तरी यात “स्लेजिंग” हा प्रकार सुद्धा होतच असतो. गोरे साहेब ज्या-ज्या देशात गेले त्या-त्या देशात क्रिकेट हा अतिशय आवडीचा खेळ आहे. इतका आवडीचा की काही महाभाग आपल्या पत्नीसह बाहेर फिरायला गेले असता पत्नी रस्त्यावर उभी आहे हे विसरून एखाद्या पान टपरीवर क्रिकेटची मॅच पहाण्यात रमून जातात आणि पत्नी त्यांची वाट पहात ताटकळत बिचारी रस्त्यावर उभी असते.असो ! ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले. त्यापैकी अनेक खेळाडू आपली काहीतरी छाप सोडून निवृत्त झाले आहेत. या खेळाडूं बाबत कधी काही चर्चा अथवा लिखाण झाल्यास त्यात राहुल द्रविड यास वगळता येणारच नाही. राहुल द्रविड भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळू लागल्यावर त्याच्या संयमी शैलीने अल्पावधीतच लोकप्रिय झाला. आपल्या कारकीर्दीत अनेक उच्चांक प्रस्थापीत करून आपल्या निवृत्तीची वेळ सुद्धा त्याने अचूक ओळखली. विरुद्ध संघास द्रविड या चिवट खेळाडूस बाद करणे दुरापास्त होत असे आणि म्हणून त्याला “द वौल“ अशी बिरुदावली सुद्धा मिळाली. द्रविड हा जनतेमध्ये जसा लोकप्रिय आहे तसाच तो त्याच्या सहका-यांमध्ये सुद्धा.द्रविडच्या विक्रमांची आणि त्याने केलेल्या धावांची आणि उच्चांकांची आकडेवारी याचा उहापोह येथे करणार नाही तशी आकडेवारी ज्यांना तशा स्वरूपाचा पिंड आहे अथवा क्रिकेटची अतिशय आवड आहे व तसेच ज्यांना क्रिकेट मधील “विक्रमादित्यांचे” विक्रम मुखोद्गत आहे ते करतील.आम्ही फक्त भारत–पाक सामन्यापुरते क्रिकेटचे
 रसिक त्यामुळे आम्ही क्रिकेट मधील अवांतर व सकारात्मक किस्से यांबद्दलच लिहिणार आणि हो द्रविडचे तसे किस्से आहेत. आपल्या साधेपणाची आणि देशप्रेमाची ओळख द्रविडच्या अनेक मुलाखतीं मधून प्रकट झाली आहे.तुला कोणते गाणे सर्वात जास्त आवडते असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर “जन गण मन“आपले राष्ट्रगीत असे राहुल द्रविडच देवू जाणे.बंगलोर मध्ये फिरायला जाण्यासाठी कोणती कार जास्त आवडेल असे विचारले असता “मला अॅटोनेच फिरायला जास्त आवडेल” असे अनोखे उत्तर.खरोखरच शहरातल्या गर्दीत गाड्या चालवण्यापेक्षा केवळ बसून फिरण्यातच जास्त मजा आहे.द्रविडने दिलेली काही भाषणे सुद्धा गाजली आहेत.आता हे सर्व द्रविड पुराण कशासाठी? तर राहुल द्रविडने आपला “युनिकनेस” पुन्हा एकदा प्रकट केला आहे.बंगलोर विद्यापीठाने जेंव्हा राहुल ला मानद आचार्य अर्थात “डॉक्टरेट” देण्याचे ठरवले.मात्र आगळ्या-वेगळ्या राहुलने मात्र यास नम्रपणे नकार दिला.पुढे विचारले असता राहुल म्हणाला की त्याच्या आईने किती कष्टपूर्वक आणि अभ्यासपूर्वक मेहनत करून “डॉक्टरेट” मिळवली होती.तसेच नागपूरचा जावई असलेल्या राहुलच्या पत्नीने सुद्धा अत्यंत परिश्रमपूर्वक “डॉक्टरेट” मिळवली आहे.माता व पत्नी या दोघींना “डॉक्टरेट” साठी अथक प्रयत्न करावे लागले तसेच इतरांना सुद्धा करावे लागतात मला मात्र “डॉक्टरेट” तसेच मिळते आहे हे मला योग्य वाटत नाही असे त्याने म्हटले. परंतू भारताने १०४ उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित केले आणि जागतिक विक्रम प्रस्थापित केला या बातमी मुळे राहुलची पदवीस नम्र नकार देवून खरोखरच जेंटलमन असल्याची बातमी झाकोळली गेली.आपण म्हणतो की पूर्वीचे लोक चांगले होते, आमचे पूर्वज असे होते,तसे होते.परंतू आजही तसे म्हणजेच उदारमतवादी,सकारात्मक दृष्टिकोनाचे,मेहनती, राष्ट्राभिमानी,नम्र,शांत लोक आहेत हे आपल्याला मेहनती शिवाय “डॉक्टरेट” पदवी घेण्यास नम्रपणे नकार देणा-या राहुलच्या रूपाने दिसून येते, राहुल तू केवळ जेंटलमन गेम खेळणारा नसून खरोखर खराखुरा जेंटलमन आहेस.        














































































































  

१०/०२/२०१७

Maharashtra Congress leaders had food together in golden or may be golden plates

चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामंधी...
      “चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामंधी मोत्याचा घास तुला भरविते...तुला बघून कळी माझी
लई खुलते“ १९७० दशकाच्या उत्तरार्धात झळकलेल्या दादा कोंडके यांच्या “तुमच आमच जमल” या चित्रपटातील या गाण्याची आठवण परवा ताजी झाली कारण सोन्याच्या ताटामधे खरोखर जेवण करण्याचा आनंद लुटल्या गेला.निमित्त होते ते उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने त्याच्या घरी दिलेल्या मेजवानीचे.या कार्यकर्त्याने स्वपक्षातील अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटिल इ.जेष्ठ नेत्यांना घरी मेजवानीसाठी आमंत्रित केले. या मेजवानीसाठी नांदेड येथील “कॅटरर्स” कडून भांडी व जेवण बोलावले गेले होते. जेवणासाठी सोन्याची ताटे होती. ती सोन्याचा मुलामा दिलेली होती असा मुलामा नेत्यांनी नंतर आपल्या प्रतिक्रिये दिला. गरीबांच्या घरी जाणे, तेथे जेवणे असा दिखावा काँग्रेस नेतृत्वाकडून कित्येक वर्षांपासून केल्या जात आहे. एकीकडे असे देखावे करणे आणि दुसरीकडे नेत्यांनी सोन्याच्या म्हणा वा सोन्याचा मुलामा दिलेल्या ताटांमधे जेवणावळी करणे हे या पक्षातील विरोधाभास दर्शविणावरे आहे.अशारितीने थाट-माट दाखवणे हे सर्वच पक्षातील नेत्यांकडून वारंवार घडत असते. या देशाने अनेक नेते पाहिले आहेत की जे अत्यंत गरीबीतून पुढे आले परंतू उच्च्पदावर गेल्यावर सुद्धा त्यांनी “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” यांचा त्याग केला नाही. आता एखादा व्यक्ती त्याच्या घरी कशी मेजवानी देईल हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतू जेंव्हा लोकप्रतिनिधी म्हणा, राज्यकर्ते म्हणा, विरोधक म्हणा यांची समाजातील वर्तनाची बाब येते तेंव्हा त्यांना अतिशय जपून वावरावे लागते आणि नेमका याचाच विसर या नेते मंडळींना पडतो. लोकप्रतिनिधी , राज्यकर्ते , विरोधी पक्ष यांना सर्वाना सार्वजनिक जीवनात फार विचारपूर्वक वावरावे लागते किंबहुना त्यांनी तसे वावरावे अन्यथा आज-कालच्या तंत्रज्ञान समृद्ध जगतात त्यांच्यावर नामुष्की ओढवू शकते कारण माध्यमे सर्वदूर पोहचली आहेत चलचित्र काढणे,ध्वनी मुद्रण करणे अतिशय सुलभ पद्धतीने आणि सूक्ष्म साहित्याने करणे शक्य झाले आहे. बरेचवेळा तसे घडले सुद्धा आहे. नुकतेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत एका उमेदवाराने एका शाळेच्या मुख्याध्यापकास धमकी दिल्याची ध्वनिफीत सर्वदूर पसरली होती.तसेच या सोनाच्या ताटातील जेवणावळीचे झाले. एकीकडे तुमचे पक्षाध्यक्ष गरीबांच्या घरात जेवतात त्याची प्रसिद्धि सुद्धा जोरात होते आणि दुसरीकडे तुम्ही सुवर्ण किंवा तत्सम ताटात पंगतीस बसता तेंव्हा “गरीबी हटाव” नारा ज्यांच्यासाठी तुमच्या माजी पक्षश्रेष्ठींनी दिला होता असा थाट-माटाची पंगत पाहून ते गरीब सुद्धा अवाक झाले. अनेक साधे नेते काँग्रेस पक्षाने या देशास दिले आहेत गांधीजींपासून ते अगदी कालच्या पंतप्रधानपद गेल्यावर लगेच शासकीय बंगला सोडणा-या मनमोहनसिंह यांच्या पर्यंत. पृथ्वीराज चव्हाण देखील दुष्काळग्रस्त भागात गेले असता त्यांनी एका ठिकाणी पंगतीस जाणे टाळले होते असे सांगतात.प्रश्न जेवणाचा मुळीच नाही. ते तर “उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म” असे आहे हे रामदास स्वामींनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. उदर भरण जरुर करा नव्हे ते झालेच पाहीजे कारण तुमच्यावर देशाची जबाबदारी आहे तुमच्या पोटात असले तरच तुम्ही कार्य करू शकाल. परंतू ते जेवण रोज एकचवेळ जेवण करणा-या आणि तसेच दिवसभर उपाशी राहणा-या हजारो लहान व मोठया गरीब जनते समोर बडेजाव व श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन करणारे नसावे याचे तरी निदान भान ठेवावे.

०९/०२/२०१७

Maharashtra Leaders criticising each other in worst language ....article written in rural Marathi language for showing them, what rural people thinking about their leaders language

जनता निपटून घीन न बावा

      सध्या या आपल्या या सुसंस्कृत महाराष्ट्रामंधी लई बेकार राजकारन खेळने सुरु झाले हाय राजेहो. कोन काय बोलीन ह्याचा काईच नेम राहिला न बावा. रोज त्यो टीव्ही लावा का पेपर वाचा नीरा यकमेकाईले वच-वच बोलने सुरु रायते. याईच्या या अशा बोलन्याले जनताच कावली. कोनी सोताच्या पेपरात काईच्या काई वंगाळ भाषेत लिहिते तर कोनी नरडा बसे लोक ओरडते. आवो काय लावल हे. तुमचे वाजपेयीले आठवा न जरसक ते कसे बोलत त पहा, वाघ माणूस बाळासायब कशी खरडपट्टी काढत पन दोस्ताना बी तुटू ना देत. तुमी त राजेहो काईबी लावलं. आवो आता काही वर्षापूर्वीच न बावा सारे कसे मोठया मनानं राजकारन करत राजीव गांधी न कुनाले तरी “नानी याद आयेगी “ अस म्हनल व्हत बाद मंधी चूक झाली अस ध्यानात आल त माफी मांगली बुवा न. आडवाणी कडून यकदा काही बोलल्या गेल त त्याईन बी माफी मांगली व्हती. आता त मले राजेहो नीरा पोट्टेशाहीच दिसून रायली, तुमी काई बी म्हना. याले सुरवात झाली ती आता यक दोन वर्षा आंधी. यक बोलला काई की दुसरा तयार यक म्हनते कौरव त दुसरा म्हनते पांडव, यक म्हनते शकुनी त दुसरा म्हनते शिखंडी, कुनी सोताच्या नेत्याले लगे श्रीकृष्णच बनवून टाकते न बावा. हे काय त्याईचे आखीन यक बारसे होय का ? कौरव- पांडव बावा लढलेच ना हो ! कुरुक्षेत्रावर दुष्मनी अन लागे इंद्र्प्रस्थावर दोस्ती अस नव्हत ना राजेहो. तुमी केंद्रात संग-मंग रायता , राज्यात बी लागे संग-मंग अन महापालिकेत लगे “निपटूनच” काढता का बावा. या अशा वागण्यान सार पानी फिरीन न हो मोदिजी आन लागे शहा जी च्या मेहनतीवर. “कोन पांडव अन कोन कौरव” यावर त भाऊ अटलजीनच कविता करेल आहे लई शोभन तुम्हाले हे कविता. ते कविता वाचली नसन तर वाचा. तुमाले बोलन्यातूनच फुरसत नसन त वाचसान कसे? म्हनून आताच वाचा
                                  कौरव कौन,कौन पांडव, टेढ़ा सवाल है|
दोनों ओर शकुनि का फैला कूटजाल है|
धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है|
हर पंचायत में पांचाली अपमानित है|
बिना कृष्ण के आज महाभारत होना है,
कोई राजा बने, रंक को तो रोना है| 
बाळासायब कसे बोलत, कसे वागत ते बी आठवा. परवा यक म्हणे आमच्या नेत्याले काय निपटता ? आधी मले निपटून दाखवा तर लगे दुसरा म्हनते तुम्हाले दोघाईलेबी निपटतो. आवो ते काय म्हनतात ? सुज्ञ का काय ? तसे नेते हायत न तुमी अन हे अशे कायले बोलून रायले हो? आवो जनतेचे प्रश्न पाहा, राज्याकडे पाहा तुम्ही त लयच खराबा लावला. लोक पोलीसाइले मारून रायले. रस्त्यावर मुडदे काय पडून राहिले कोनाले कशाचा धाकच नाही रायला. राज्यामंधी लई मोठया परमानात असलेल्या धटींगनांइले निपटा न राजेहो पयले , तुमी त त्याइल्लेच पार्टीत घेवून रायले. तुमच्या या भांडनाइत दुस-या पार्ट्याले त चांगलाच हाय न वो तुमी यकमेकाईले निपटसान म्हटल्यावर त्याईले त मंग राज मिळतेच न ! तुमी लय साजरे नेते हायत एक सर्वाइचे आवडते गंगाधर गुरुजीचा गुनी लेक एक पत्रकार,व्यंगचित्रकार सा-या मराठी मानसाईले आवडणा-या बाळासायाबाचा कलाकार मनाचा लेक. तुमी त राजेहो यक रायला तर महाराष्ट्राची लय प्रगती कारसान , शेतक-याईले बी न्याय देसान. तुमी त लई हुशार मायासारखा मानसाने तुमासनी काई सांगने म्हनजे सुर्याले पनती दाखवने होय. अशी वंगाळ भाषा बोलान त जनताच निपटून घेईन न बावा तुमाले निवडणूकीमंधी.  














         

०२/०२/२०१७

Article describes about Rani Padmavati of Chittorgarh on the event of attack on Sanjay Lila Bhansali by Karni Sena of Rajasthan

महाराणी पद्मावतीच्या निमित्ताने  

   राजस्थान म्हटले की आठवतो तो स्वाभिमानी महापराक्रमी ,महाराणा प्रताप राजा त्यानंतर राजपुतांचे शौर्य, “गढ मे गढ चितोडगढ बाकी सब गढीया” अशी ख्याती असलेला चितोडगढ आणि तेथे हजारो स्त्रियांनी एकाच वेळी केलेला   जोहार अर्थात आत्मदहन आणि इतर अनेक शौर्यगाथा.अशा राजस्थान मधील कथा आणि राजस्थान हे नेहमीच तमाम भारतीयांचा आकर्षणाचा विषय आहे.मग यास चित्रपटसृष्टी कशी अपवाद ठरेल? याच राजस्थान मधील राणी पद्मावती उर्फ पद्मिनी आणि तिचे सौंदर्य हे आजही चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय आहे.चित्रपटसृष्टी तर सौंदर्याची पुजारीच म्हणून मग आपल्या संजय भन्साली यांना रतनसिंह या पद्मावतीच्या पतीप्रमाणेच पद्मावतीच्या सौंदर्यानी भुरळ घातली आणि त्यांनी पद्मावतीवरील चित्रपटास सुरुवात केली. काही ना काही “लीला” करून आपल्या चित्रपटांना चर्चेत ठेवणारे संजय भंसाली यांनी म्हणे या चित्रपटात राणी पद्मावती व अल्लाउद्दीन खिलजी यांचे प्रेमप्रसंग स्वप्नातून दाखवले आहेत असा आरोप कर्णी सेना व इतर राजपूत संघटनांनी केला आहे. संजय भंसाली मात्र अशी काही दृश्ये नसल्याचे सांगतात. सिंहल (श्रीलंका) राज्यातील राजकुमारी पद्मावतीच्या सौंदर्या बाबत रतनसिंह या राजाने एका हिरामण नावाच्या बोलणा-या पोपटाकडून ऐकले असल्याची कथा आहे.खूप परिश्रमाअंती सैन्यासह लांबचा प्रवास करून रतनसिंह पद्मावतीशी विवाह करतो आणि तिला आपल्या राज्यात आणतो. काही कालावधी नंतर अल्लाउद्दीन खिलजी या प्रचंड विध्वंसक सुलतानास पद्मावतीच्या सौंदर्याची माहिती मिळते. तो तिला प्राप्त करण्यासाठी चितोडगढ वर स्वारी करतो.रतनसिंह त्याच्याशी लाद्धाई करतो अल्लाउद्दिन त्याच्याशी सलगी करून एकदा तरी राणी पद्मावतीचे सौंदर्य मला दाखव अशी आर्जव करतो तत्कालीन पडदा पद्तीमुळे राणी अर्थात नकार देते परंतू शेवटी रतनसिंह आरश्यातून तिचे रूप अल्लौद्दीनला दाखवतो. राणीचे ते पान खाल्ल्यावर गळा सुद्धा लाल होणारे रूप पाहून तिला प्राप्त करण्यासाठी अल्लाउद्दिन चितोड वर जोरदार आक्रमण करतो रतनसिंह मारला जातो आणि राणी पद्मावती व गडावरील इतर स्त्रिया अल्लाउद्दिनच्या हाती लागू नये म्हणून “जोहार” अर्थात अग्नीत समर्पण करतात.अल्लाउद्दिन प्रमाणे आजही त्याच्याच वंशावळीतील लोक आजही ज्यांना ते काफिर म्हणतात त्यांच्या मुली व स्त्रियांवर भाळतात आणि “लव्ह जिहाद” साठी उद्युक्त होऊन त्यांना फसवितात. चितोडच्या या कथा लहानपणी चितोडगढ पाहण्याचा योग आला असतानाच ज्ञात झाल्या होत्या त्या ऐकल्यावर अंगावर काटा येतो आणि हे चित्रपटवाले जेंव्हा जाणून बुजून त्यांच्या चित्रपटातून वैयक्तिक फायद्यासाठी काहीही दाखवतात.अहो भंसाली,जी स्त्री पतीच्या शत्रूच्या हाती लागू नये म्हणून जोहार करते. इतिहासात नांव करून जाते तिचा जो आहे तो इतिहास दाखवा ना ! तुमचा चित्रपट चालावा म्हणून उगीच काहीही स्वप्न दृश्ये दाखवावावीत,बाजीराव-मस्तानी मध्ये बाजीरावच्या पराक्रमा ऐवजी त्याच्या प्रेमप्रकरणालाच रंगवणे,काशीबाईना नाचताना दाखवणे हे उचित नव्हे. असे करून तुम्ही त्या ऐतिहासिक पात्रांचा अपमान करीत आहात व नवीन वाचन कमी झालेल्या पिढीला चुकीचा इतिहास दाखवण्याचा अक्षम्य अपराध तुमच्या स्वत:च्या फायद्यासाठी करीत आहात. तुम्ही भंसाली आहात कुणी अल्लाउद्दिन सारख्या माणसाच्या वंशावळीतील नाही आहात. निदान हे स्मरून तरी चित्रपट बनवावेत मोठ्या अभिमानाने तुम्ही तुमच्या आईचे नाव स्वत:च्या नावापुढे लावता म्हणजे तुम्ही स्त्रीयांचा आदर करणारे आहात असे वाटते तेंव्हा ऐतिहासिक स्त्री पात्रांना की ज्यांचे समाजात आजही आदराने नाव घेतले जाते त्यांना सुद्धा तुम्ही योग्य प्रकारेच तुमच्या चित्रपटातून दाखवायास हवे.