०९/०३/२०१७

Article about killing female infant

कळ्यांचा कर्दनकाळ 

“यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी शिकवण असणा-या आपल्या देशाची गत आता “ यत्र धनस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी झाली आहे..............
......... रामकृष्ण परमहंस म्हणतात , “शिक्षक म्हणून आणि डॉक्टर म्हणून जर कोणी या जन्मात व्यवसाय करत असेल आणि तो जर योग्य पद्धतीने आणि प्रमाणिकपणे करत असेल तर त्यांना याच जन्मात मोक्ष मिळतो” परंतू मोक्ष, प्रमाणिकपणा यांना हल्ली कोण विचारतो ?

          सांगली जवळील म्हैसाळ या गावातील स्वाती प्रवीण जमदाडे या महिलेचा गर्भपात करतांना झालेल्या मृत्यूमुळे आणि त्यासोबतच भारती रुग्णालयाच्या माध्यमातून झालेल्या अनेक स्त्री भृण हत्यांमुळे उभा महाराष्ट्र हादरला. एक मार्चला स्वाती जमदाडे या महिलेचा भारती रुग्णालयात मृत्यू झाला आणि डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे या त्या रुग्णालयाच्या संचालकाला अटक करण्यात आली. बी एच एम एस पदवी असलेल्या या डॉक्टरच्या रुग्णालयात खाटांची आणि शस्त्रक्रिया करण्याची साधने सुद्धा होती. अनेक स्त्री अर्भकांना याने यमसदनी धाडले आणि पुरून टाकले. “बेटी वाचवा बेटी जगवा” , “:बेटी बचाव बेटी पढाओ” असे शासन म्हणत असतांना व जनतेची सुद्धा मुलींकडे पाहण्याची मानसिकता बदलत असतांना नेमकी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रास काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस येण्यास सौ स्वाती जमदाडेंचा मृत्यू व्हावा लागला आणि तो होईपावेतो प्रशासनास वाट पहावी लागली हे एक दुर्दैव म्हणावे की प्रशासनाची लापरवाही ? पोलिसांनी जर कधी मनात आणले तर मंदेरा बाहेरची चप्पल सुद्धा चोरीला जावू शकत नाही एवढी पोलीसां जवळ माहिती असते. १९ स्त्री मृत अर्भक सापडण्या पर्यंत कुणास कसे ठावूक नाही याचे आश्चर्य वाटते. 10 वर्षांपासून तो हे रुग्णालय चालवीत आहे होमिओपॅथी डॉक्टर असूनही गर्भपात करीत आहे हे सर्व घडते म्हणजे यात अनेक लोकांचा सहभाग असेलच. आजपावेतो १९ अर्भक सापडली आहेत त्यांची संख्या अधिकही असू शकते. आजच त्याच्या कम्पाउंडर साळुंखे आणि नर्स रोजे यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.शासनाच्या योजना चांगल्या आहेत परंतू कायद्याचा धाक म्हणावा तसा नाही आहे. म्हणूनच खिद्रापुरे सारखे असे कृत्य करण्यास धजावतात. “यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी शिकवण असणा-या आपल्या देशाची गत आता “ यत्र धनस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता” अशी झाली आहे. मग धनासाठी काहीही करण्यास मागे-पुढे पहिले जात नाही , बेकायदेशीर कृत्ये त्यामुळेच घडत असतात. वैद्यकीय क्षेत्रात तर अशा अनेक घटना घडत असल्याचे सर्वानी अनुभवले आहे. मृतास “व्हँटीलेटर” वर ठेवून पेशंटच्या नातेवाईकांना फसवणे, उगाच विविध पॅथॉलॉजी टेस्ट करावयास लावणे, औषधांच्या मात्रा देण्यात चुका करणे, टेस्ट रिपोर्ट चुकीचे देणे असे कितीतरी किस्से अनेकांनी ऐकले आहेत. खिद्रापुरेने तर कहरच केला होमिओपॅथी डॉक्टर असूनही त्याने गर्भपात केले. तो होमिओपॅथी डॉक्टर तरी आहे की नाही हे आता तपासांती कळेलच. केवळ धनाच्या लालसेपाई हे असे घडते आहे दुसरे इतर काही कारण नाही. रामकृष्ण परमहंस म्हणतात , “शिक्षक म्हणून आणि डॉक्टर म्हणून जर कोणी या जन्मात व्यवसाय करत असेल आणि तो जर योग्य पद्धतीने आणि प्रमाणिकपणे करत असेल तर त्यांना याच जन्मात मोक्ष मिळतो” परंतू मोक्ष, प्रमाणिकपणा यांना हल्ली कोण विचारतो ? आता तर हवा फक्त पैसा . कोट्यावधी रुपयांचे ऋण घेऊन इस्पितळे, कोचिंग क्लासेस उभारली जातात आणि मग ऋण फेडण्यासाठी पेशंटला, विद्यार्थ्यांना वेठीस धरले जाते. अर्थात याला अनेक चांगली रुग्णालये व कोचिंग क्लासेस अपवाद आहेतच. परंतू खिद्रापुरेंसारख्या डॉक्टरमुळे समाजातील इतर चांगल्या डॉक्टरांची नावे सुद्धा बदनाम होतात. म्हैसाळ मधील नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने या घटनेच्या निषेधार्थ बंद ठेवला. परंतू   महाराष्ट्रात कुठेही निदर्शेने , आंदोलने , मोर्चे झाले नाहीत. स्वत:च्या स्वार्थी मागण्यांसाठी , शासना कडून विविध लाभ मिळवण्यासाठी मोर्चे काढतांना आपण अनेकांना पाहतो परंतू समाजातील बेकायदेशीर कृत्ये करणा-यांच्या विरोधात मात्र असे मोर्चे क्वचितच निघतात. तेंव्हा यासाठी तर सर्व समाजातील बांधवांनी एकत्र येऊन मोर्चा,निषेध,निदर्शने करावयास हवी. कळ्यांच्या खिद्रापुरे या कर्दनकाळास कठोरात कठोर शिक्षा करावी जेणे करून दुसरा कोणी पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा