१३/०४/२०१७

The Great Shivaji Maharaj death annivarssary celebration 2017



तारतम्य       
      आजकाल आपल्या देशात वागण्याचे आणि बोलण्याचे काहीही तारतम्य राहिले नाही. कुणीही येतो काहीही बोलतो , त्याच्या बोलण्यावर मग काही दिवस वादंग निर्माण होते, माध्यमांवर चर्चा केली जाते हे सारे शमत नाही तो दुसरा येतो तो काही तरी बरळतो आणि नवीन वाद उफाळून येतो. देशातील महत्वाचे मुद्दे, विकास हे बाजूला राहते आणि यांचे तारतम्य न बाळगता वागणे बोलणे हेच निस्तरता निस्तरता नाकी नऊ येते. लोकशाहीच्या या देशात कापून टाकू, गळा कापू असे काहीही बोलल्या जाते. तारतम्य न बाळगता बोलण्यातून असे वाद निर्माण होतात तर क्वचित प्रसंगी वागण्याची तारतम्यता न बाळगल्याने सुद्धा वादाचे मुद्दे निर्माण होत असतात. आता परवाचेच उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवले गेले. दिवस दु:खाचा आणि ढोल वाजवून राहिले याला काय म्हणावे. त्यानंतर नेहमीप्रमाणेच सारवासारव झाली. विरोधकांनी आणि सामान्यांनी टीका केली. ढोल वाजवणा-यांनी तर वागण्याचे तारतम्य बाळगले नाहीच परंतू त्यांना विरोध करतांना विरोधी पक्षातील एक पुण्याचा पदाधिकारी माध्यमावर बोलताना म्हणाला की, “आता आम्ही सुद्धा संघाच्या नेत्यांच्या पुण्यतिथी दिनी ढोल वाजवू” याला म्हणतात स्वत:ची बुद्धी न वापरणे त्यांनी ढोल वाजवले का मग आम्हीही वाजवू अशाने मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय उरला ? हे तर अगदी बालिश बुद्धीचे वक्तव्य झाले. त्यांनी थोर पुरुषाचा अनादर केला म्हणून तुम्ही सुद्धा तसा अनादर करावा काय ? आज काल ढोल बडवण्याचे स्तोम इतके वाढले आहे की विचारू नका काहीही झाले की ढोल असतोच. यामुळेच मग आपण कुठे आहोत बाजूला शाळा किंवा इस्पितळ आहे का? हे न पाहता ढोल बडवले जातात.ढोल कुठे वाजवावा याचे साधे तारतम्य राहिले नाही.  त्यांनी पुण्यतिथीला ढोल वाजवला तर विरोधकांनी सत्ताधा-यांचे फोटो असलेले ढोल वाजवून निषेध केला म्हणजे विरोधकांनी सुद्धा ढोल बडवण्याचा आनंद घेऊनच घेतला. राजकारणी तर जनतेला हाती धरून काही कार्यभाग साधतात परंतू जनतेने सुद्धा तारतम्य बाळगावे की कुठे ढोल वाजवावा आणि कुठे नाही. सत्ताधारी आणि विरोधक यांनी निव्वळ थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साज-या करण्यापेक्षा त्यांनी जी शिकवण दिली आहे ती शिकवण जर आचरणात आणली तर ते जास्त महत्वाचे आहे. उत्सव साधे पणाने सुद्धा साजरे केले जाऊ शकतात , उत्सव प्रसंगी काही समाजसेवा सुद्धा केली जाऊ शकते , उत्सव कोणता आहे जयंती आहे की पुण्यतिथी ? दु:खाचा प्रसंग आहे की आनंदाचा याचे तारतम्य लोकप्रतिनिधी आणि जनता दोघांनीही ठेवणे आवश्यक नाही का? थोर पुरुषांना मानवंदना देणे जरुरीच आहे परंतू ही मानवंदना देतांना नेहमी ढोलच बडवणे जरुरी नाही. कधी समाजसेवेचे, रक्तदानाचे, वह्या पुस्तके वाटपाचे , मा. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छतेचे उपक्रम हाती घ्या ना ! तुम्ही जर थोर पुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी या प्रसंगी योग्य वर्तणुकीचे तारतम्य बाळगले, कुठे ढोल बडवावा आणि कुठे नाही याचे सुद्धा तारतम्य बाळगले आणि जनतेच्या हितासाठी सुयोग्य शासन केले तर तुमच्या कर्तुत्वाचा , चांगल्या कार्याचा, तुम्ही जो जाहीरनामा दिला होता तो पूर्ण केल्याचा ढोल आपसूकच बडवला जाईल.           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा