१०/०५/२०१७

"Hariyali Aur Rasta"....a article about making roads and cutting trees

हरियाली और रास्ता      
          सध्या वयाच्या सत्तरीत असलेल्यांना याच शीर्षकाचा एक गाजलेला सिनेमा त्यांच्या तरुण वयात म्हणजे 60 च्या दशकात झळकला होता याचे स्मरण झाले असेलच. रस्त्याच्या सोबतीला हिरवळ असतेच असा आशय. फार जुनी गोष्ट नाही. अगदी 1980 च्या दशकापर्यंत कुठेही जा एक लहान रस्ता असायचा त्यावरून केवळ राज्य परिवहन मंडळाची मोटार धावायची. खाजगी मोटारींचे जाळे फोफावले नव्हते, मोटार सायकलीचे प्रमाण सुद्धा आता इतके नव्हते आणि हो! अॅटोंचा सुद्धा सुळसुळाट नव्हता. रस्त्यांवर जास्त धावायच्या त्या राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासी मोटारी, मधूनच एखादी “शानदार सवारी ,जानदार सवारी” असलेली राजदूत किंवा बुलेट नाहीतर “बुलंद भारत की बुलंद तसवीर” बजाज स्कूटर जात असे. कापसाने किंवा स्थानिक पिकाने भरलेल्या बैलगाड्या बैलांच्या गळ्यातील घंट्या वाजवीत जात असत. विदर्भात तर कापूसच जास्त असे. बाहेरगावी जाताना तर प्रवासी मोटारी व माल मोटारी व्यतिरीक्त क्वचितच एखादी दुचाकी किंवा अॅटों दिसत असे. सर्वात जास्त दिसत त्या दुचाक्या अर्थात सायकली.वाहने कमी त्यामुळे “सिंगल” रस्ता पुरेसा होता. तसेच रस्ते सर्वदूर होते.परंतू या सर्वांसह त्या रस्त्याला सोबत करणारी त्याची एक सखी होती आणि ती म्हणजे हरियाली अर्थात हिरवळ.खेड्यातील पाऊलवाट असो वा राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग असो यांची सोबत ही हिरवळ करायची.रस्याच्या बाजूला एखाद्या महावृक्षाच्या सावलीत गुरे विसावा करतांना दिसत, मध्येच कुठेतरी एखाद्या वृक्षाच्या छायेत सहभोजन सुरु असतांना दिसत असे. कुठे एखाद्या वृक्षाच्या मोठ्या फांदीला बांधलेल्या झोक्यावरून “ऊंच माझा झोका” करतांना मुले-मुली दिसत. तर कुठे “डाब-डुबली”, “सूर पारंब्या” असे खेळ होताना दिसत. पक्षांचा किलबिलाट ऐकू येई. परंतू हे चित्र पुसले गेले.नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत देश बदलू लागला नवीन आर्थिक वारे आले , कर्ज देण्याच्या स्पर्धा सुरु झाल्या आणि त्यामुळे मग वाहने मोठ्या प्रमाणात वाढली, एवढी की त्यांना रस्ता पुरेनासा झाला आणि त्यातूनच मग वळण मार्ग आणि रुंदीकरणे सुरु झाली आणि सोबतच सुरु झाल्या विकासाच्या नावाखाली वृक्षांच्या कत्तली. या तथाकथीत विकासाने रस्त्याची सखी हिरवळ त्याच्यापासून दूर केली. पुढचे प्रत्येकच सरकार मग रस्त्यांचे कार्य हाती घेऊ लागले. “एक्स्प्रेस हायवे” , “सहापदरी”, “चार पदरी” , “उड्डाण पूल” हे नवीन चित्र आकारात येऊ लागले. मोठ मोठे वृक्ष गेले आणि त्यांच्या जागी “वृक्षारोपण करा” , “पर्यावरणाचे रक्षण करा”,“सडके देश को जोडती है”,“सडके विकास का जरिया है”,अशा आशयाचे निव्वळ जनतेला “ब्रह्मज्ञान” शिकविणारे फलक महामार्गावर ठराविक अंतराने दिसू लागले. वाढते अपघात,वाहनांची संख्या यासाठी रुंद रस्ते आवश्यक आहेत हे जरी खरे असले तरी रस्ते रुंद करतांना रस्त्या भोवर्तीच्या वृक्षराजींचा मात्र काहीही एक विचार केल्या जात नाही आहे. शिवाजी महाराजांवर स्वत:चा हक्क दाखविणारे सर्वच राजकारणी शिवाजी महाराज वृक्षांप्रती किती सावध होते हे दर्शविणारे महाराजांचे आज्ञापत्र मात्र साफ विसरले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते रुंद झाले आहेत तेथे सावलीचा मागमूसही दिसत नाही. अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी मोठ-मोठ्या झाडांची सर्रास कत्तल करून वर्षे उलटून गेली परंतू अद्याप तेथे ना रस्ता झाला ना रुंदीकरण.आघाडी सरकारच्या काळापासून काम सुरु असलेला खामगांव-जालना मार्ग किती वर्षे लोटली तरी जैसे थे आहे. हा रस्ता तर धड नाहीच शिवाय एकही वृक्ष सावलीला सापडत नाही.अमरावती जिल्ह्यातील वरुड-अमरावती हा रस्ता आता रुंद होणार आहे. या रस्त्यावर हजारो कडूनिंबाची झाडे आहेत, आता त्या झाडांवर खुणा झाल्या आहेत, त्यांना आता त्यांचे मरण जवळ आल्याचे दिसत आहे. परंतू विकासापुढे या वृक्षांना कोण विचारतो? आणि विकासाकरिता म्हणून बनविलेले यांचे रस्ते लगतच्या पावसाळ्यातच वाहून जातात, खड्डे पडतात , दुभाजकावर लावलेली छोटी झुडपी झाडे वाळून जातात. विकास होतो तो फक्त रस्ते बनविणा-या मंडळीचा. ठेकेदार,टोल वाले गब्बर होतात.आपला कार्यभाग साधला गेला ना, मग देशाचे काय? तो जावो ना का त्याच रस्त्यावरच्या खड्यात अशी त्यांची निगरगट्ट मानसिकता झाली आहे. हे ना रस्ते धड बनवत ना त्याच्या आजू बाजूला वृक्ष संगोपन करत. प्रवासी, वाटसरू मात्र त्या रस्त्यांच्या भोवताली “हरियाली” आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये “रास्ता” शोधत बसतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा