१६/०५/२०१७

How people looted Alphonso mango rather saving wounded truck driver and cleaner

ज्यादाकी नाही लालच हमको, थोडेमे गुजारा होता है | 
     या लेखाचे शीर्षक म्हणजे भारतातील लोकांची, ते कसे राहतात, कसे आदरातिथ्य करतात, त्यांची दुस-याकडून शिकण्याची वृत्ती , दुस-याला आपले करण्याची वृत्ती, स्वार्थासाठी अन्नाची पूजा न करणे  याची महती करणा-या थोर कवी शैलेन्द्र यांच्या एका गीताची ओळ आहे हे जाणकारांच्या लक्षात आले असेलच. भारतातील लोक कसे आहेत याचे समर्पक वर्णन या गीतात केले गेले आहे. मुकेशच्या आवाजातील हे गीत ऐकताना अंगावर रोमांच येतात. परंतू दुदैवाने आता या देशातील लोक या गीतात जसे वर्णन केले आहे तसे वागताना क्वचितच दिसून येतात. याची प्रचीती मागील आठवड्यात घडलेल्या घटनेमुळे आली. नाशिक जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यातील लांजा येथील एक मिनी ट्रक हापूस आंबा घेऊन येत असतांना त्यास अपघात झाला. सुदैवाने चालक आणि त्याचा सहकारी दोघेही बचावले परंतू जख्मी झाले. ट्रक उलटल्यामुळे त्यातील हापूस आंब्याच्या पेट्या खाली पडल्या. ते दोघे जख्मी आणि आंब्याच्या पेट्या यापैकी रस्त्यावरील येणा-या जाण्या-यांच्या मनात “लालच बुरी बला” असूनही “ज्यादा की लालच” आलीच आणि त्यांनी जख्मी माणसांकडे जाण्याऐवजी प्राधान्य हापूस आंब्याला दिले. कुणीही चालक आणि त्याच्या सहका-याकडे लक्ष दिले नाही. ते दोघे मदतीची याचना करीत राहिले आणि त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्याच अडीच ते तीन लाखांच्या हापूस आंब्याच्या पेट्या लोकांनी पळवून नेल्या. लोकांची ही कृती सांगतांना चालक रडला. कारण त्याने अनेक विनवण्या करूनही कुणी त्याला मदत केली नाही.बहुतांश वेळी असे निदर्शनास आले आहे की खाद्य पदार्थाच्या गाडीला अपघात झाला तर लोक माल पळवतात. परंतू एखादा जख्मी व्यक्ती तुम्हाला मदतीची याचना करीत असतांना तुम्ही त्याच्या मालाचे चौर्यकर्म करीत असतांना तुमच्या डोक्यात जराही मानवतेचे विचार येत नाही. एरवी शेतक-याचा कळवळा दाखवता आणि ज्या तुकाराम महाराजांचे गोडवे गाता त्याच तुकाराम महाराजांनी स्वत:च्या लेकरांकरीता आणलेली अर्धी अधिक ऊसाची मोळी रस्त्यावरील मुलांना वाटून टाकली होते हे विसरून दुस-याचे हापूस आंबे पळविता ! का घडत आहे असे आपल्या देशात ? आपल्या संत परंपरा असलेल्या महाराष्ट्रात ? कुठे हरवली ती आपल्याजवळील सर्व लोकांना वाटण्याची तुकाराम महाराज आणि इतर संतांसारखी संवेदनशीलता ? दुस-यांबद्दल आता आपल्याला काही वाटेनासेच झाले आहे. आपण कधीही हा विचार करीत नाही की आपण त्या आंबेवाल्याच्या जागी असतो तर? पण आता इतका विचार करण्याचा वेळ सुद्धा कुणाजवळ नाही. ही घटना घडली , आणि या घटनेमुळे  माणसाची संवेदनशीलता, दुस-याप्रतीची कणव नाहीशी होत असल्याचे पाहूनच आठवले की कुठे गेली ती आपल्या ओठांवरची “सच्चाई” , आणि हृदयातील “सफाई” ? शैलेन्द्र म्हणतो
मेह्माँ जो हमारा होता है वो जानसे प्यारा होता है |
ज्यादा की नही लालच हमको थोडेमे गुजारा होता है |

मात्र आंबे पळविण्याच्या या घटनेतून याची प्रचीती आली की आता आम्हाला “ज्यादा की लालच” आहेच आणि  “थोडे मे गुजारा” काही आमच्याकडून होऊ शकत नाही. आमची लालच एवढी वाढली आहे की हापूस आंबा मिळतो आहे ना , तो सुद्धा फुकट मग एखादा मरे का ना ,आम्हाला तमा नाही आम्ही प्रथम आमची लालच पूर्ण करू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा