०८/०६/२०१७

Story of Drugs Addiction.... A Brilliant student got addicted by drug and now in Police custody

नशा करी दुर्दशा 
      नशेमुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे, जीव गेले आहेत. नशेच्या धुंदीत बुद्धी भ्रष्ट होऊन  भलतीच कृत्ये सुद्धा अनेकांकडून घडली आहेत. महाभारतात युधिष्ठीरास सुद्धा दयुताच्या नशेत गेल्यावर सर्वस्व डावावर लावावे लागले. शेवटी काही उरले नाही म्हणून मग स्वत:चे भाऊ आणि पत्नीला सुध्दा त्याने डावावर लावले. तो हरला आणि मग पुढचे महाभारत घडले. जे सर्वांना ज्ञात आहेच. आज-काल रामायण महाभारतातील कथा अनेकांना भाकड कथा वाटायला लागल्या आहेत.  त्या कथांना क्षणभर भाकडकथा असे जरी मानले तरी त्या कथांमधील घटनांची साक्ष देणारे काही पुरावे आजही सापडतात शिवाय या कथांतून अनेक दाखले, उपमा आजही देता येतात आणि लिखाण, अध्यापन करतांना उपमा देणे तर आवश्यकच आहे. कालीदास इतक्या सुंदर उपमा देत असे की “उपमा कालिदासस्य” अशी म्हणच रूढ झाली. उपमा देण्यासाठी म्हणून या कथा नितांत उपयोगी आहेत. म्हणून मग गर्वाबाबत बोलतांना हनुमानाने केलेले भीमाचे गर्वहरण आठवते. मोह झाल्यावर सीता कशी सुवर्णमृगाच्या मोहात पडून नंतर रावणाच्या ताब्यात गेली होती हे आठवते. व्यंगावरून कुणाचा अपमान करू नये हे द्रोपदीने दुर्योधनाच्या केलेल्या अपमानामुळे आठवते. म्हणूनच आज नशेमुळे घडलेल्या एका घटनेमुळे युधिष्ठीराचे द्युत व्यसन आठवले. बुद्धिमान युधिष्ठीराच्या दयुताच्या नशेची आठवण होण्याचे कारण म्हणजे काल एका युधिष्ठीराप्रमाणे बुद्धिमान तरुण विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य व्यसनामुळे कसे उद्धवस्त झाले ही मुंबईत घडलेली घटना. अंधेरी पूर्व परिसरात राहणा-या व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या ओमप्रकाश सिंग यांच्या जयकिशन या विज्ञान शाखेत गुणवत्तेचा उच्चांक गाठ्लेलेया मुलाला काल वाहनचोरी प्रकरणात अटक झाली. आता हा गुणवंत विद्यार्थी वाहनचोरी प्रकरणात कसा काय अडकावा? वाहनचोरी करण्याचे कारण म्हणजे हा जयकिशन नशेच्या जाळ्यात अडकला होता. त्याला अमली पदार्थ अर्थात ड्रग्जचे व्यसन जडले होते. हे व्यसन पूर्ण करण्यासाठी पैसे हवेत म्हणून मग दुचाकी लंपास करायची व OLX या संकेतस्थळावर ती दुचाकी विकायची आणि आपली व्यसनाची गरज भागवायची. जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावीच्या विज्ञान टॉपरपैकी एक असून त्याला 2015-16 मध्ये बोर्डाच्या परीक्षेत 98.50% गुण मिळाल्याचा दावा, त्याच्या पालकांनी केला आहे. जयकिशन ओमप्रकाश सिंग गाडी चोरुन ती निर्जनस्थळी ठेवायची. त्यानंतर त्याचा फोटो काढून तो ओएलएक्सवर शेअर करायचा आणि ती विकायची, अशी त्याची कार्यपद्धती होती. अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला पकडले. तपासात त्याला “बटन” नावाच्या ड्रग्जचे व्यसन जडले होते हे समजले. व्यसनामुळे गुणवंतांच्याही जीवनाची कशी वाताहत होते हे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीचा एक झुरका किंवा एखादा घोट हळू- हळू वाढत जाऊ देऊ नका. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांच्या केवळ गरजा पूर्ण केल्या म्हणजे जबाबदारी संपली असे समजू नये. मान्य आहे आज-कालचे जीवन धकाधकीचे आहे परंतू त्यातून थोडा वेळ तरी आपल्या प्रिय पाल्यांना द्या. पौगंडावस्थेतील पाल्यांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. एक व्यसन तर सर्वांना जडले आहे ते म्हणजे भ्रमणध्वनी वापरण्याचे. आताची मुले कुणाकडे गेली तर बोलण्याऐवजी केवळ मोबाईल मध्ये मान टाकून असतात. या मोबाईल मधून सुद्धा त्यांना “अतिशय” ज्ञानप्राप्ती होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष असणे जरुरी आहे, त्यांना मित्र बनवून समजावणे जरुरी आहे. आज जयकिशन  सिंगचे जीवन ज्याप्रमाणे नशेमुळे बिघडले आहे तसे इतर कुणाचेही न बिघडो. जयकिशन सुद्धा यातून पुन्हा एकदा बाहेर येवून यशाचे शिखर गाठो ही सदिच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा