२९/०६/२०१७

"Time Please" Remembering childhood games played in Maharashtra

टॅम्प्लीज...      
       बालपणीचा काळ सुखाचा या शीर्षकाचा एक पाठ आम्हाला हायस्कूल ला असतांना होता. लेखक काही स्मरणात नाही परंतू लहानपणीच्या अनेक आठवणींचे वर्णन या पाठात होते. आता काही दिवसांपूर्वी आमच्या मुख्याध्यापिका म्हणून सेवावानिवृत्त झालेल्या मामी प्रवरा नाईक ह्या आल्या होत्या.त्यांनी माझ्या भाच्यांना मामाकडे म्हणजे माझ्याकडे मोबाईलमध्ये गर्क असलेले पहिले आणि त्यांना त्यांचे भाचे म्हणजे आम्ही, लहान असतांना मामाकडे जळगावला गेल्यावर कसे पुस्तके वाचत असू, किती खेळत असू याची आठवण झाली. त्यांनी ही आठवण बोलून दाखवली आणि मग मन भूतकाळात गेले. दिवसभर वाचन आणि संध्याकाळी खेळ असा दिनक्रम असे. वाचनाच्या त्या आठवणीबरोबर 80 च्या दशकातील अनेक खेळ सुद्धा आठवले. लगो-या, नदी की पहाड,द्स्ती (रुमाल),एक सहेली रो रही थी,चिकट मासोळी सुटली,डोंगराला आग लागली,विष-अमृत,धब्बाकुटी,डाबडुबली,कुरघोडी,खिळा खुपसणी आणि श्रावणात झोके.असे हे सर्व खेळ व सवंगडी           “वो खेल वो साथी वो झुले वो दौडके कहना आ छुले, हम आज तलक भी ना भुले” 
या प्रमाणे एका पाठोपाठ एक आठवत गेले. हे खेळ सायंकाळच्या वेळी प्रत्येक गल्लीत सुरु असतांना दिसायचे.मुलांचा एकच गलका होत असे.फुरसतीत घराच्या पाय-यांवर बसणारी मंडळी हे खेळ पहात त्यांचे बालपण आठवत बसे.हे खेळ खेळतांना अनेक शब्द असे उच्चारले जात की त्यांचा अर्थ त्यावेळी कळत नसे.मोठे झाल्यावर त्यावर विचार केल्यावर तो शब्द काही वेगळा असल्याचे लक्षात येई.हे खेळ खेळतांना थोड्या वेळाचा विश्राम कुणाला हवा असल्यास तर्जनीला मोडून त्याला जीभ लावून “टॅम्प्लीज...” असे म्हणत.मग तशी कृती   करणा-याला थोडा वेळ मिळत असे. याच शब्दाला मराठीत “थुज्जा” असेही म्हणत.बालवयात “टॅम्प्लीज...” म्हणजे काय ? आणि “थुज्जा” म्हणजे काय ? आणि ते तर्जनी मोडून तिला जिभेने चाटूनच का म्हणतात? हे ब्रह्मदेवालाही विचारले तर सांगता येणे अवघड.याचा शोध कुणी लावला ?,कसा लागला ? ते जाऊ द्या पण तशी प्रथा तेंव्हा सर्वच बालके पाळीत. “टॅम्प्लीज...” म्हणजे “टाईम प्लिज” असते हे सुद्धा कित्येकांना कळलेच नसावे. मराठीतील “थुज्जा” या बाबतचा शोध अजून लागणे बाकी आहे. लगो-या या खेळात लागो-या मांडल्या की त्या रचल्यावर “इस्पेअर...” अशी आरोळी लगो-या रचणारा द्यायचा.तो “स्पेअर” असा शब्द आहे,स्पेअर या शब्दाला “इ” कसा काय चिकटवल्या गेला देव जाणे. ब-याच इंग्रजी शब्दांना “इ” हे बिरूद लागलेले पाहून इंग्रजही चक्रावतील. लगो-यांना फोडण्याने फोडत. खेळता-खेळता चेंडू कधी नालीत जात असे, दोन बोटांनी उचलून मग तो मातीने पुसला की पुन्हा खेळ सुरु.लगो-या लावणा-याला चेंडू पाठीत मारत असत कधी कधी मग नालीतल्या चेंडूचा ठसा पाठीवर घेऊन घरी गेले की घरी खाण्याच्या धपाट्याऐवजी प्रथम पाठीत “धपाटा” मिळे. लागो-या खेळतांना चेंडू नसलाच तर काही अडत नसे पाय लगो-यांचा पर्याय असे. द्स्ती म्हणजे रुमाल,या रुमालाला गाठ बांधून त्याला फेकून तो पकडणे हा खेळ सुद्धा खूप रंगत असे. प्रत्येक खेळाचे वर्णन येथे करू गेल्यास लेखन मर्यादेची अडचण भासेल.तेंव्हा क्रिकेटचा इतका सुळसुळाट  झाला नव्हता,सर्वच मुले क्रिकेट खेळत अशी परिस्थिती नव्हती.वर उल्लेखित विविध खेळ सुद्धा खेळले जात असत.खेळता-खेळता मुले भांडत,पडत, “पडे झडे माल वाढे” असे म्हणत लागलेल्या ठिकाणी माती लावून पुन्हा खेळण्यास तयार होत.आता मुलांचे खेळणे किती कमी झाले आहे.प्रत्येक पालकाला मुलांची काळजी असते परंतू आताशा अतिकाळजीने मुले नाजूक होत आहे त्यांच्यातील खिलाडू वृत्ती आणि सहनशीलता कमी होत आहे.सर्व मुलांसोबत खेळल्याने,बागडल्याने सर्वांगीण शारीरिक आणि मानसिक विकास होतो. टीव्ही, मोबाईल दिवसभर शाळा आणि क्लासेस या सर्व भारामुळे मुलं कशी कोमेजून गेलेली दिसतात.त्यांच्यावर अतिरिक्त भार पडत चालला आहे हे समजूनही त्याला काही पर्यायच राहिला नाही आहे.निव्वळ एखाद्या कारखान्यात कच्चा माल टाकला की पलीकडून पक्का माल तयार तसे आपण आपल्या मुलांना शिक्षणाच्या आणि क्लासेसच्या कारखान्यात भरडत आहोत इतके की त्यांच्या मनात सुद्धा थोड्या विश्रामासाठी “टॅम्प्लीज...” म्हणावे असे आहे परंतू ते कितीका “प्लिज“ म्हणोत ना पालकांजवळ सुद्धा त्यांना जाणून घेण्यास “टाईम” नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा