२४/०८/२०१७

In the memory of traditional photo albums

अल्बम आणि आठवणी

      अल्बम या शब्दाला समानार्थी मराठी शब्द काही ठाऊक नाही परंतू अल्बम म्हटले की आठवण हा शब्द हमखास आठवतोच कारण अल्बम बघितला की अनेक आठवणी ताज्या होतात. आता तर अल्बम मधील फोटो पाहून जुन्या आठवणी येण्याऐवजी अल्बमच्याच आठवणी काढण्याचे दिवस आले आहेत. नाही म्हणायला अल्बम काही अगदीच संपुष्टात आला का कालबाह्य झाला असेही नाहे. अल्बम आहेत परंतू आता केवळ साखरपुडा आणि लग्नकार्यापुरता सीमित.पूर्वी  कॅमे-यांचा सुळसुळाट झालेला नव्हता किंवा कुणीही कॅमेरा घेईल अशी ऐपतही नसायची मग गावातील “फोटो स्टुडीओ” मध्ये एका वेताच्या खुर्चीत पायाला आडी मारून “साधना कट” केलेली  कन्या, लाकडी घोड्यावर एक पुत्र विराजमान, एक मुल आईच्या कडेवर आणि एक बापाच्या असल्या स्वरूपाचा परिवाराचा फोटो काढला जात असे. परिवार मोठा असे “हम दो हमारे दो” चा जमाना नुकताच सुरु झाला होता.”हम दो हमारा एक” चा जमाना येण्यास अजून अवकाश होता. प्रत्येक घरी दरवर्षी असे काही फोटो निघत. क्वचित मीना बाजार आला की एखाद्या नटी सोबत नाहीतर मग मोटरसायकलवर बसून आणि लहान मुलाला चंद्रावर बसवून फोटो काढले जात असत.माझ्या एका मित्राने अमिताभचे बोट धरून फोटो काढला होता आणि नंतर मग त्याने तो कसा मुंबईला गेला,अमिताभ कसा भेटला अशा कथा रंगवून सांगितल्या होत्या.एकदा मीना बाजार मध्ये गेल्यावर मला सुद्धा अमिताभ भेटला परंतू मी त्याचे बोट काही धरले नाही हो मोटरसायकलवर दोन बहिणींना मात्र घेऊन बसलो होतो. अशाप्रकारे काढलेली छायाचित्रे मग दोन काळ्या जाड पानांच्या मध्ये एक पातळ पारदर्शक पांढरा कागद असलेल्या अपभ्रंशात “अल्बॉम” नांव असलेल्या पुस्तकात लावत असत. कालांतराने तो  “अल्बॉम” नसून अल्बम असतो असे समजले. प्रत्येक काळ्या पानावर दोन किंवा तीन छायाचित्र त्या अल्बम मध्ये लावता येत. फोटो लावण्यासाठी चार कोप-यावर चार अशी सुंदर कलात्मक कागदी फुले असत. ही फुले त्या अल्बमवर चिकटवायची आणि त्यामध्ये फोटो लावायचा अशी योजना.अल्बम मध्ये सर्व कृष्ण-धवल छायाचित्रे पाहतांना आपण सुद्धा जुन्या काळात तर नाही गेलो ना असे वाटायचे. छायाचित्रे असलेला अल्बम मग कुणी नातेवाईक, पाहुणे मंडळी आले की तल्लीन होऊन पहात बसत. सर्व कामे आटोपली की अल्बम निघत असत आणि चहाचे घोट घेत जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे. हळू-हळू तंत्रज्ञान विकसित झाले रंगीत फोटो निघू लागले, अल्बमने सुद्धा आपले स्वरूप बदलले  ब्लॅक अँड व्हाईट फोटोंची जागा कलर फोटोने घेतली.तरीही काही दिवस स्वस्त असल्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट तंत्र अस्तित्वासाठी धडपड करीतच होते परंतू काळासामोर कुणाचे चालते? ब्लॅक अँड व्हाईट तंत्र नामशेष झाले. भ्रमणध्वनी मध्येच कॅमेरा आला एका क्षणात फोटो फेसबुक आणि व्हॉटस ऍप द्वारे जगभरात कुठेही पाठवता येणे शक्य झाले आणि अल्बमची क्रेज गेली दीर्घकाळ फोटो जतन करणे संपले. पटला तर ठेवला नाही तर डीलीट. काढलेल्या फोटोची प्रिंट काढून त्याला अल्बम मध्ये लावण्याची सवड लोकांना मिळेनाशी झाली. पेटीतील अल्बम काढून पाहुण्यांसोबत चहाचा घोट घेत फोटो पाहण्याचे दिवस हद्दपार झाले. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या पैल तोगे कोकणा-या काऊ ला शकून घेण्यास सांगितले होते तो सुद्धा आता क्वचितच ओरडतो आणि पाहुणे सुद्धा क्वचितच येतात.यतकदाचित पाहुणे आलेच तर आपले फोटो आपणच आधी शेअर केल्याने त्यांनी पहिले असतात मग काय ज्याची-त्याची मान आप-आपल्या मोबाईल मध्ये. एकवेळेस मोठी माणसे तरी काही संवाद साधतील परंतू किशोरवयीन आणि तरुण मुले त्यांच्या मोबाईल मध्ये गर्क असतात.कपातील चहा थंड होत असतो आणि माळावर अडगळीत आजी आजोबांचे, आपल्या लहानपणीचे, मीना बाजारातील फोटो असलेला अल्बम धूळ खात स्वत:ला महत्व असलेल्या दिवसांच्या आठवणीत कुढत असतो, आणखी कुजत असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा