०४/०८/२०१७

Raj Thakre Speech on the occasion of 95th Birhtday of The Great Legend historian Shivshahir Babasaheb Purandare

खरंच दुर्दैव !
     “बाबासाहेब पुरंदरेंना पोलीस संरक्षणात फिरावं लागणं हे दुर्देव“ अशी खंत मा. राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात 29 जुलै रोजी व्यक्त केली. खरेच हे दुर्दैवच आहे. ज्यांनी पूर्ण हयात शिवव्याख्यानं आणि शिवचरित्र लिहिण्यात घालवली, त्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागत असेल तर देशात सर्वात जास्त सुसंस्कृत म्हणून सतत स्वत:चीच पाठ थोपटणा-या महाराष्ट्राचे हे दुर्दैवच म्हणावे लागेल या दुर्दैवाचे आपण सर्वच दुर्दैवी असे साक्षीदार आहोत.विलेपार्ले, मुंबई  मधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर सन्मान सोहळापार पडला राजसाहेबांनी आपल्या मनातील खंत तेथे बोलून दाखवली.कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर सुद्धा उपस्थित होता.आपल्या भाषणात राजसाहेब म्हणाले “शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचवणारे बाबासाहेबच एकमेव आहे तरीही काही मंडळींकडून जातीपातीची लेबल लावून आरोप केले जात आहेत. एकीकडे शासन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवते तर  दुसरीकडे त्यांच्याच महाराष्ट्रात त्याच बाबासाहेबांना पोलीस संरक्षणात महाराष्ट्रात फिरावं लागतं, काही लोकांना केवळ आरोप करायचे असतात. ज्यांनी पेशव्यांचा इतिहास न लिहिता महाराजांनी केलेल्या अचूक गोष्टी सर्वाना ज्ञात व्हाव्या म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला,अशा माणसाभोवती जातीपातीची भुते नाचवता ?  राजसाहेबांनी व्यक्त केलेली ही खंत अगदी योग्य आहे.एक खंत अशीही आहे की कोणत्याही व्यक्तीच्या, मग गल्लीतील मिसरूड न फुटलेली मुले असोत वा तथाकथित उदयोन्मुख नेते असोत यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीसाठी आपले कॉलम.आपली पाने खर्ची घालणा-या वृत्तपत्रांनी बाबासाहेबांच्या सन्मान सोहळ्याच्या वृत्तासाठी थोडीही जागा देवू नये! काही अपवाद वगळता दुरचित्रवाहिन्यांनी सुद्धा बाबासाहेबांचा वाढदिवस आणि सन्मान सोहळ्याला म्हणावी तशी प्रसिद्धी नाही दिली.
आपण पूर्वापार पहात आलो आहे की राजे महाराजांच्या काळापासून प्रज्ञावंत व्यक्तींचा सतत सन्मान होत आलेला आहे.बुद्धिमान लोकांना राजाश्रय असे. राजा आणि प्रजा दोघेही जात-पात विसरून प्रज्ञावंतांना सन्मान देत असे. अकबराच्या दरबारात बिरबलला मान होता.त्याचा तर अनेक गुणी लोकांचा नवरत्न दरबारच होता.शिवाजी महाराजांनी सुद्धा कवी भूषण आणि इतर कलाकारांचा सन्मान केलेला आहे.विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारी तेनाली राम होता.अजून इतरही अनेक दाखले आहेत.महाराष्ट्र मात्र हे सर्व विसरत चालला आहे. काही लोक विद्वान व्यक्तीचे वय, त्याची विद्वत्ता, त्याचा अभ्यास, त्याची सेवा, त्याची अभ्यास निष्ठा, त्याचा व्यासंग , काहीही एक न पहाता, न विचार करता त्याच्यावर आरोप करतात. भाषा सुद्धा चांगली नसते. या महाभागांनी आता विद्वानांचा आदर करणे देखील सोडले आहे.  
स्वगृहे पूज्यते मूर्खः स्वग्रामे पूज्यते प्रभुः
स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते 
अशी आपली संस्कृती असूनही मतांच्या भिक्षेसाठी राजकारण्यांनी आता संपूर्ण देशात “जात सर्वत्र पूज्यते” अशी दयनीय स्थिती निमार्ण करून ठेवली आहे. वयाच्या 95 व्या वर्षीही इतर देशातील पुस्तकांत शिवाजी राजांबद्दल काय लिहिले आहे हे अभ्यासून थरथरत्या हातांनी लिखाण करणा-या विद्वान बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर “विद्वान् सर्वत्र पूज्यते यानुसार ईश्वर आपणा सर्वाना विद्वानांना पूजण्याची सद्बुद्धी प्रदान करो तसेच कुण्याही विद्वानावर पोलीस संरक्षणात फिरावं लागण्याच दुर्देव न येवो ही प्रार्थना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा