०४/१०/२०१७

Many farmers affected due to very poisonous insecticides in Yeotmal District of Maharashtra

शेतक-याची दैना 
          काय असेल ते असो परंतू आपल्या देशात सर्वाधिक संकटांची भुते कुणाभोवती नाचत असतील तर ती शेतक-याभोवतीच असे कुणीही सांगेल. कधी उशीरा पाऊसामुळे दुबार पेरणीचे संकट, तर कधी कमी पाऊसामुळे पिके करपण्याची भीती, कधी अती पाऊसामुळे पिके खराब , तर कधी चांगली पिके झाली तर हरीण , रान डुकरांचा त्रास, कधी वन्यप्राणी शेतात कोणत्याही कारणाने का होईना मेला तर वन विभागाकडून त्रास , कधी बाजार भाव गडगडतात तर कधी सरकार रास्त भाव देत नाही , कधी बोगस बियाणे , कधी कर्जमाफी साठी आंदोलन, कर्ज माफच कधी झाले तर अर्ज भरण्यासाठी रांगा, एखादे सरकार गोळ्याच मारते तर एखादे जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. संघटना आप-आपसात भांडतात सत्तेसाठी दुस-या संघटना निर्माण करतात. अशी नानाविध संकटांची भुते या देशातील गरीब शेतक-याला त्रस्त करून सोडतात. अशातच सणासुदीच्या दिवसांत यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-याभोवती एक नवीन संकट उदभवले. हे संकट म्हणजे अतिविषारी किटकनाशकाचे. यवतमाळ जिल्ह्यात अतिविषारी किटकनाशकामुळे अनेक शेतक-यांना त्रास सहन करावा लागत आहे. कंपन्यांनी अतिविषारी किटकनाशक विकल्याने कुणा शेतक-याला डोळ्यांचा , तर कुणाला इतर शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. इंदल नावाच्या एका शेतक-याच्या मेंदूवर परिणाम झाला. विषाचा त्याच्या मेंदूवर इतका विपरीत परिणाम झाला की तो हात-पाय झाडू लागला , निरर्थक बडबड करू लागला त्यामुळे त्याला झोपेचे इंजक्शन देऊन रुग्णालयातील खाटेला अक्षरश: बांधून ठेवावे लागले. काय ही दैना, काय हे आपल्या देशाचे दुर्भाग्य ! राज्यात म्हणा की देशात शेतक-याची ही काय अवस्था झाली आहे. राज्यातील शेतक-याच्या मागे काय ही संकटे. ज्या यवतमाळ जिल्यात राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. जिथे राहुल गांधी एका आत्महत्याग्रस्त शेतकरी महीलेस भेटले होते त्याच जिल्ह्यात पुन्हा आता हे विषारी किटकनाशक प्रकरण. काय करते सरकार ? कर्मचारी अधिका-यांचे लक्ष नेमके असते तरी कुठे? किटकनाशक आणि बियाणे यांची काही तपासणी होते की नाही ? जनतेच्या अन्नात भेसळ, दुधात भेसळ,मिठाईत भेसळ आणि शेतक-याचे बी-बियाणे आणि किटकनाशक सुद्धा बोगस. कुणी मेले त्याला आर्थिक मदत दिली की लोक विसरतात. कित्येक दिवसांपासून हेच सुरु आहे. समस्येच्या मुळाशी कुणीही जायला तयार नाही. कंपन्या-कंपन्यातील स्पर्धांमुळे अनेक प्रलोभने विक्रेत्यांना दिली जातात त्यात मालाच्या दर्जाला अंतिम महत्व दिले जाते.आपला माल कसा का असेना प्रलोभनामुळे विक्रेते गरीब शेतक-याला विकतात आणि मग ही अशी संकटे ओढवतात.दर पाच वर्षानी सरकार येते आणि जाते परंतू समस्या “जैसे थे”. सत्ता बदल होत राहतो. जुने जातात नवीन येतात जुन्यांप्रमाणे नवीनही हळू-हळू मस्त होतात.मग जनता रेल्वे पुलांवर मरो की रेल्वे खाली,आत्महत्या करो की भेसळ युक्त खाण्याने मरो, बोगस बियाण्यामुळे नापिकी झाल्याने आत्महत्या करो वा अतिविषारी किटकनाशकाने अत्यावस्थ होवो. लाख दोन लाखाची मदत दिली की यांचे कर्तव्य झाले. 70 वर्षात या देशात कर्मचारी, विद्यार्थी , कामगार ,पोलीस इ कित्येकांनी आत्महत्या केल्या कधी कुण्या राजकारण्याने आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. कुणी केलीही असेल तर ज्ञात नाही. (अर्थात आत्महत्या करणे हे वाईटच, कुणीही आत्महत्या करावी असे मुळीच म्हणणे नाही) परंतू राजकारण्यांना कोणतीच झळ नाही. सर्व यातना,दु:ख, त्रास सोसायला भोळी -भाबडी जनता व शेतकरी आहेतच.“जय जवान जय किसान” ना-याचे नेहमी उच्चारण करणा-या देशात जवानही मरत आहेत आणि किसानही शेतकरी सतत त्रस्त आणि राजकारणी आपल्याच धुंदीत मस्त आहेत व समस्येचे समूळ उच्चाटन करण्याच्या बाबतीत तेवढेच सुस्त सुद्धा आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा