०२/११/२०१७

Article on Raseela Vadher, the forest officer of Gujarat’s Forests and Environment Department, who has rescued many wild animals

रसिला....एक ‘शेरदिल’ महिला
शीर्षक वाचून थोडे Confuse झाल्यासारखे वाटेल. तसे वाटणे स्वाभाविकच आहे. कारण शीर्षकातील हिंदी शब्द. “रसिला” या शब्दाचा अर्थ म्हणाल तर एखादा चविष्ट पदार्थ. त्यानंतर शेरदिल आणि महिला असे शब्द सुद्धा आहे आता रसिला आणि शेरदिल महिला अर्थात धाडसी स्त्री यांचे काय Combinition, काय संयोग असेल असा प्रश्न कुणालाही पडेलच. त्या दिवशी घरी एकटाच होतो , टी. व्ही. लावला Animal Planet वाहिनी लावली त्यावर उजव्या बाजूस Geer Forest Gujrath असे शीर्षक दिसले तसे आता एकाच वहिनीवर विसावणे कुणालाही सहसा जमत नाही परंतू मी त्याच वाहिनीवर विसावलो. रिमोट वरचा कंट्रोल काढून टाकला आणि गुजराथ मधील सिंहांच्या राष्ट्रीय उद्यानातील “रसिला वाधेर” नामक सिंहीणी सारख्या महिलेची माहिती पाहू लागलो. आपल्या देशात अनेक महिलांनी अलौकिक अशी कामगिरी बजावलेली आहे. गार्गी, मैत्रेयी यांच्या पासून ही परंपरा आहे. आता गार्गी मैत्रेयी यांची नांवे घेतली तर कुणी “राहू द्या ती पुराणातील वानगी पुराणातच” असेही म्हणेल पण ते जाऊ द्या. आजच्या भारतीय स्त्रिया पायलट, ट्रक चालक. रिक्षा चालक, बस वाहक, प्रशासन सर्वच क्षेत्रात गरुड झेप घेत आहे. त्याच यादीत आता रसिला सुद्धा समविष्ट झालेली आहे. 2007 मध्ये गीर जंगलात वनरक्षक म्हणून रुजू झाली. भारतातील कदाचित पहिल्याच अशा वनरक्षक महिलांच्या पथकात तिचा समावेश झाला होता. तिला कार्यालयीन किंवा वनरक्षक म्हणून कार्य करण्यापेक्षा वन विभागातच परंतू काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती आणि त्यातही त्यासाठी तिने बचाव पथकात समावेश होण्यासाठी तयारी सुरु केली. आणि तिची इच्छा पूर्ण झाली. सिंहांच्या बचाव पथकात ती काम काज करू लागली. सिंहांसोबतच बिबट्या, मगर असेही प्राणी ती उपचारासाठी म्हणून सहज हाताळू लागली. प्राण्यांना जेंव्हा जखमा होतात त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना बेशुद्ध करण्यासाठी बंदुकीद्वारे जी इंजक्शने दिली जातात ती देण्यात सुद्धा ती वाकबगार झाली. हे सर्व करता करता आजरोजी पावेतो तिने 300 पेक्षा जास्त सिंह आणि 515 बिबटे तसेच इतरही प्राण्यांचा बचाव किंवा सुटकेचे कार्य केले आहे. “ही 24 तासांची ड्युटी आहे , यात काहीही Schedule नाही कधीही काही काम पडले तर वेळ जायला नको” असा तिचा दृष्टीकोण आहे. कधी एखादे बचाव कार्य 15 मिनिटात आटोपते तर कधी तासं तास  लागतात. प्रत्येक प्राण्याची
Raseela Vadher
स्वभाव वैशिष्ट्ये वेगळी असतात आणि ती समजून घ्यावी लागतात. सिंह हल्ला करण्याच्या आधी शेपूट हलवून किंवा गर्जना करून इशारा देतो तर बिबट्या मात्र अचानक हल्ला करतो. प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कार्य यात खुप तफावत असते कारण प्रत्यक्ष बचाव कार्य करतांना बचाव पथकाला त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो असे रसिला सांगते. या हिंस्त्र श्वापदांचा गीर मधील गावक-यांना सुद्धा त्रास होतो. त्यांची जनावरे कधी कधी या प्राण्यांची भक्ष्य बनतात. तेंव्हा गावक-यांना सुद्धा विश्वासात घ्याये लागते.आता गावकरी बरेच सरावले आहेत त्यांना वन्यजीवांचे महत्व सुद्धा कळले आहे, त्यांना आता या प्राण्यांसोबत जगण्याची सवय झाली आहे. गावक-यांना ते समजावण्याचे कार्य सुद्धा रसिला पार पाडते. महाराष्ट्रातील अधिका-यांना सुद्धा रसिलाने बचाव कार्याचे ‘प्रेझेन्टेशन’ दिलेले आहे. हे सर्व करण्यास कौटुंबिक आधाराची सुद्धा गरज असते विवाह होऊन जास्त दिवस झालेले नसले तरीही ती गीरच्या जंगलात एकटी राहते. तिचा पती वेरावल  नावाच्या  60 किमी अंतरावरच्या गावात राहतो. एक दिवसाआड तिला भेटतो कधी कधी ते ही शक्य होत नाही. शहरी “बीजी वर्किंग कपल” प्रमाणे त्यांच्या मध्ये चांगली “अंडरस्टँडिंग” आहे. ती सर्व जबाबदारी पार पाडते अगदी शहरी “वर्किंग वूमन” प्रमाणे. तिचे भांदुरी नावाचे गांव 42 किमी अंतरावर आहे परंतू ती वनविभागाच्या निवासस्थानातच राहते. सिंह कळपाने राहतो, त्याच्या कुटुंबाची देखरेख, पालन पोषण सिंहीण करीत असते. त्याचप्रमाणे रसिला ही वनविभागाच्या बचाव पथकाची प्रमुख सुद्धा एखाद्या सिंहिणी प्रमाणे तिच्या दोन कुटुंबाचा सांभाळ करीत आहे. एक 
तिचे खरे कुटुंब आणि दुसरे ज्यांना ती आपले कुटुंब मानते ते वन्यजीवांचे कुटुंब. गीरच्या जंगलातील बचाव पथकात मोठी जबाबदारी पार पाडत असलेल्या रसिला या शेरदिल महिलेची दखल माध्यमांनी मात्र  म्हणावी तशी घेतली नाही. तिची ही “स्टोरी” आपल्या भागातील तरुणींना निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा