२७/११/२०१७

Article on the MP of Samajwadi Party, Azam Khan's statement on Padmavati

...देखी तेरी दिलदारी
 परवा पद्मावती चित्रपटाबाबत बोलतांना समाजवादी पक्षाचे खासदार आजमखान बरळले की ,”मुस्लिम समाज दिलदार अर्थात मोठ्या मनाचा आहे त्यांनी कधीकाळी आलेल्या व हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन चित्रपट असलेल्या ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटात दाखवलेल्या युवराज सलीमची प्रेयसी अनारकली या नार्तिकेबाबत विरोध केला नाही”. आजमखान यांचे असे म्हणणे की अनारकली आणि सलिम यांची प्रेमकथा हे दंतकथा होती.तरीही त्याकाळी चित्रपट बनला, प्रदर्शित झाला व सलीम अनारकली यांची प्रेमकथा दर्शकांनी पाहिली. हे सर्व मुस्लिम समाज हा दिलदार असल्यामुळे झाले.असा त्यांचा युक्तीवाद. या चित्रपटाबाबतचे किस्से, घटना तो बहुचर्चित प्रणय प्रसंग या गप्पा आजही चवीने चघळल्या जातात. आजमखान म्हणतात की मोठ्या मनाने मुस्लिम समाजाने सलिम-अनारकली यांच्या काल्पनिक प्रेमकथेवर आधारीत सिनेमा स्विकारला. त्यास विरोध केला नाही. आता विरोध न होण्यास महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाचा नायक ‘निशान-ए-पाकिस्तान’ युसुफखान अर्थात दिलीपकुमार,नायिका मुमताज देहलवी अर्थात रूपमती मधुबाला तसेच,दिग्दर्शक के आसिफ.व इतर अनेक कलावंत याच दिलदार मनाच्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे होते. मग प्रखर विरोध कसा होणार? पद्मावतीचे सिनेमाचे तसे नाही एका हिंदू महाराणीचे मोगल आक्रमकासोबत स्वप्न्दृश्याचा आधार घेऊन चित्रित केलेले प्रेमप्रसंग हे जे की कधी घडलेच नाही नेमके त्याच्या अगदी विरोधात भंसालीने चित्रपटात दाखवले त्यामुळे हा प्रखर विरोध होत आहे आणि तो योग्यच आहे. अनारकली काय ती तर नर्तकीच ती ही काल्पनिक आणि अशा कित्येक नर्तिका मोगल शासक नाचवीतच असत हा इतिहास सर्वाना ठाऊकच आहे. आजमखान यांच्याप्रमाणे खरेच समाज दिलदार असेल आणि त्यांनी त्याकाळी ‘मुगल-ए-आजम’ ला विरोध केला नसेल तर त्यांची ती दिलदार वृत्ती आजही कायम असावयास हवी ना ! आणि त्यांच्या दिलदारी या स्वभाव वैशिष्ट्यास जागून मग ते आजही अनेक बाबतीत त्यांची दिलदारी दाखवू शकतात. या समाजाचे मन खरेच मोठे असेल तर मग पाकव्याप्त काश्मीर वरचा दावा दिलदार मनाच्या असलेल्या मुस्लीम समाजाच्या पाकिस्तानने सोडून द्यावा. काश्मीर फुटीरतावाद्यांनी सुद्धा दिलदारी दाखवून वेगळ्या काश्मीरचा हट्ट सोडावा. दिलदार मनाने काश्मिरी पंडीतांना पुनश्च काश्मीरमध्ये येण्यास सहकार्य करावे. राम मंदिराबाबत मोठेपणा दाखवावा. समान नागरी कायद्यास मोठ्या मनाने स्वीकारावे. दिलदार मन असलेल्या समाजाच्या फारुख अब्दुल्ला यांना म्हणावे तुमची सैल सुटलेली जिव्हा ताब्यात घ्यावी. या वरील सर्व बाबी दिलदार मनाने स्वीकारा असे म्हटले तर मग आजमखान त्यास मंजूरी देतील काय ? याचे उत्तर नकारार्थीच असेल हे मिसरूड न फुटलेला मुलगाही सांगू शकेल. आजमखान हे वायफळ आणि वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी वृथा वल्गना करू नये. खिलजी हा परकीय आक्रमक होता. त्याला येन केन प्रकारेण पद्मावती हवी होती. परंतू असे होऊ नये म्हणून गोरा, बादल हे काका पुतणे जीवाच्या शर्थीने लढले. पद्मावतीने अल्लाउद्दिनच्या तावडीत सापडू नये म्हणून अनेक स्त्रियांसह ‘जोहार’ केला. हा इतिहास असल्याने पद्मावतीला विरोध होत आहे. आजमखान महोदय पद्मावती राणी होती आणि अनारकली ही काल्पनिक नर्तिका. दिलदार तर होता राणा रतनसिंह की ज्याने अल्लाउद्दीनला प्रथम पाहुण्याची वागणूक दिली परंतू अल्लाउद्दीनने त्याला दगा दिला. आपण केवळ दिलदार असल्याचे सांगू नका खरेच सर्वच बाबतीत दिलदार बनून दाखवा आणि आपला आदर्श प्रस्थापित करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा