१९/१२/२०१७

Article on recent election won by BJP in Gujrath and Himachal

जनतेला सुद्धा “विकासाचे वेड” 
गुजराथ व हिमाचल प्रदेश या राज्यांच्या निवडणुकांपूर्वी माध्यमांवर “विकास वेडा झालाय“ या आशयाचे अनेक संदेश सतत फिरत होते. नरेंद्र मोदी यांच्यावर व त्यांच्या भारत विकासाच्या स्वप्नावर विडंबनात्मक असे हे संदेशांमुळे तसेच हार्दिक, जिग्नेश व अल्पेश ठाकोर यांच्या झंझावातामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपा ने टीकवून ठेवलेली सत्ता पुन्हा त्यांच्याच हातात राहते की नाही असे सर्वाना वाटत होते. शिवाय अमित शाह व नरेंद्र मोदी यांची ही “होम पिच” या ठिकाणी हार म्हणजे 2019 मध्ये केंद्रात कॉंग्रेस येणार असे कयास बांधले जात होते. दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. यंदाच्या या निवडणूकीच्या आधी गुजराथमध्ये याआधी मुख्यमंत्री बदल करावा लागला होता.तसेच यावेळी पाटीदार समाज आरक्षणाचा मुद्दा होता, विकासासाठी काळ्या पैस्यास अटकाव व्हावा म्हणून केंद सरकारने केलेल्या नोटबंदी व सर्व देशात एकच कर प्रणाली असावी म्हणून लागू केलेल्या  जी एस टी यांचे सावट होते. व्यापारी वर्ग जी एस टी मुळे नाराज होता. मोदींनी लक्षणीय प्रमाणात सभा घेतल्या. “सी प्लेन” सुद्धा घेऊन गेले. तसेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी व कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यापूर्वी कुणीही कॉंग्रेस नेता जितक्या प्रमाणात मंदिरात गेला नसेल तितक्या मोठ्या प्रमाणात राहुल मंदिरात गेले, देवदर्शन घेतले.त्यांच्या शिलेदारांनी ते जनेऊधारी , शिवभक्त असल्याचा दावा केला. याचा उलटा परिणाम झाला त्यांच्या अतिप्रमाणात मंदिरात जाण्यामुळे मतदारांना हे सर्व केवळ आणि फक्त केवळ मते मिळवण्यासाठी आहे हे सहज उमगले. पाटीदार समजाचे नेतृत्व करणा-या हार्दीकच्या काही चित्रफिती झळकल्या. हार्दिक आणि कॉंग्रेस यांचे कुठे खटके सुद्धा उडाले. राहुल गांधी यांच्या खेरीज कॉंग्रेस मधील इतर नेते प्रचारात कमी आढळून आले. अहमद पटेल व राहुल गांधी यांचे सुद्धा जमत नसल्याच्या चर्चा झाल्या. गुजराथच्या पाटीदार समाजातील मोठा वर्ग भाजपा सोबत आहे तसेच मुस्लीम समाजातील लोक सुद्धा आहेत. तीन तलाक कायद्यामुळे मुस्लीम महिला वर्ग सुद्धा काही प्रमाणात का होईना भाजपाकडे आकृष्ट झाला आहे. अशा या पार्श्वभूमीवर सर्व देशाचे लक्ष लागलेली ही निवडणूक शेवटी पार पडली. 18 डिसे रोजी मतमोजणी सुरु झाली सुरुवातीला कॉंग्रेस पुढे असल्याने त्यांच्या तंबूत जल्लोष सुरु झाला शेअर बाजार मात्र गडगडू लागला नंतर भाजपाने आघाडी घेतली व ९९ जागा मिळवून गुजराथचा गड राखला. तसेच कॉंग्रेसने सुद्धा 80 जागा जिंकून दाखवून ते काही अगदीच मागे नाही हे दाखवून दिले.यात हार्दिक जिग्नेश व अल्पेश यांचा मोलाचा वाटा आहे. तिकडे हिमाचल मध्ये सुद्धा भाजपाने विजय मिळवला. मोदींनी विकासाच्या तसेच भावनिक मुद्द्यांवर या निवडणुका जिंकून दाखवल्या ख-या परंतू 2019 मध्ये मात्र विकासाचा मुद्दा कसे काम करेल हे पहावे लागेल. खरी परीक्षा तेंव्हा आहे. या दोन राज्यातील विजयाने जनतेला आता खरेच विकास हवा आहे, देशात बदल हवा आहे असेच चित्र सध्या तरी दिसत आहे, आणि त्यामुळेच जनतेने विकास वेडा झाला नाही तर जनतेला सुद्धा विकासाचे वेड आहे हेच सिद्ध करून दाखवले आहे.

जाता जाता .... 80 जागांमुळे हार्दिक व्यतिरीक्त इव्हीएम मध्ये खराबी किंवा इव्हीएम हॅक झाल्याचे कुणी सुतोवाच अदयाप तरी केलेले नाही  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा