०१/०२/२०१८

Article about remembering the days of Slate and Pencil

एका लेखणीत जादू
   लेखणी म्हणजे काय असते ? असा प्रश्न विचारला जाऊ शकणा-या आजच्या काळात थेट शीर्षकातच लेखणी शब्द वापरावा की नाही अशी शंका मनात उद्भवली परंतू विचार केला की मोबाईल, ई-बुक , ई- लर्निंगच्या काळातील स्मार्ट पिढीस  पूर्वी केवळ लेखणीनेच लिहित असत हे सुद्धा कळायला हवे आणि याच शीर्षकांतर्गत लेख लिहिणे सुरु केले. इंटरनेटने जवळ आलेल्या मित्रांच्या गप्पांमध्ये जास्तीत जास्त आठवणी असतात त्या  बालपणीच्या. आता ज्यांचे वय 30 च्या पुढे आहे त्यांच्या शालेय जीवनात तर ब-याच गमती-जमतीअसत.गळ्यात दप्तर रबराचे, त्यामध्ये पुस्तक चित्राचे हातात डब्बा कडीचा...त्यामध्ये लाडू बुंदीचा अशा रीतीने सर्वांचे गोजिरवाणे आप-आपल्या शाळांत पायीच रवाना होत.शाळेत गेल्यावर त्यांचे अजब खेळ असत. शाळेच्या बिना गजांच्या खिडकीतून हुंदडणारी ही मुले आपल्या सुपीक डोक्यातून अनेक कल्पना काढीत असत. शिक्षकांना भंडावून सोडत.शिक्षक कडक होते परंतू तेवढेच प्रेमळ सुद्धा. सांगायला वाईट वाटते पण आता विद्यार्थ्यांप्रती प्रेम, माया, आपुलकी थोडी लुप्त झाली आहे. आता प्रोफेशनल जमाना आहे ना ! असो !  ही मुले मधल्या सुटीत मातीत छोटा खड्डा करून त्यात मुंगळा टाकत आणि वरुन एखादा काचाचा तुकडा लावत मुंगळा त्यात अडकला की मग त्याची मजा पहात बसत या त्यांच्या छोट्या “झू” मध्ये त्यांना किती आनंद मिळे.मातीत खेळण्याला मनाई नव्हती. आता किती हायजेनिक जमाना आहे. मातीत खेळणे बंद झाले. जुने टायर काडीने लोटण्याचा खेळ खेळतांना पडून कधी काही लागले तर मुले प्रथम त्यात माती भरत असत. स्कूटरचे किंवा राजदूतचे टायर असणारा मुलगा भाव खाऊन जात असे. या मुलांचा अजून एक खेळ असे तो म्हणजे कुणी काही नवीन आणले की ते दाखवणे. ते सुध्दा ही मुले फुकट दाखवीत नसत. “एका लेखणीत जादू” या पद्धतीने ते आपल्या जवळील
गंमत दाखवीत असत. “एका लेखणीत जादू” ही लेखण मिळवण्याची अनोखी जादू त्या काळात सर्वच मुले करीत. दगडी आणि फुसकी अशा लेखण्या मुलांकडे असत. दगडी म्हणजे टणक लेखण आणि फुसकी म्हणजे ठिसूळ. भूश्यात लेखणी भरलेला तो लेखणीचा पुडा वडीलांनी आणला की आताच्या मुलांना एखादा टँब किंवा मोबाईल आणल्यावर जसा आनंद होईल तसा आनंद होत असे. कुणाची दगडी, तर कुणाची फुसकी तर कुणाची रंगीत लेखण असे. दुस-या जवळ आहे तशी लेखण मग आपल्याकडे सुद्धा असावी म्हणून मग “एका लेखणीत जादू” करायची,आपल्या जवळील काही तरी अनोखे दाखवायचे आणि लेखण मिळवायची. अशी युक्ती अनेक मुले करीत. ज्यांच्या जवळ मग अनोखे असे काहीच नसे,खेळणे नसे,कला नसे अशी ग्रामीण भागातील मुले मग रिकाम्या आगपेटीत थोडे गवत आणि त्यावर एक रंगबेरंगी किडा आणत आणि “एका लेखणीत जादू” म्हणून इतरांकडून लेखण मिळवली की तो किडा दाखवत.तेंव्हा तो किडा पाहण्यात किती नैसर्गिक आणि निरागस आनंद होता तोही फक्त एका लेखणीत.एका लेखणीत म्हणजे तेही अख्ख्या लेखणीत नव्हे तर लेखणीच्या एखाद्या तुकड्यात.“बचपन के दिन भी क्या दिन थे उडते फिरते तितली बनके” असे हे दिवस गेले की परत येत नाही.आता मुलांना खेळण्या बागडण्यास फार कमी वेळ असतो.तेंव्हा मुलांना चांगले खेळू-बागडू द्या.आपण नाही का किती खेळलो !आता आपल्या मुलांना सतत अभ्यास,क्लास,1760 गल्लाभरू सामान्य ज्ञान, चित्रकला, रंग भरो स्पर्धा यांत व्यस्त असलेले पाहून, त्यांच्या पाठीवरचे ते मोठे ओझे पाहून असे वाटते की कुणी तरी परत एका लेखणीत जादू करावी आणि आपल्या अनोख्या जादूने आताच्या बालकांना 1980 च्या पूर्वीच्या दशकात जसे निरागस, तणावमुक्त,अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवणारे बालपण होते तसे बालपण आणून द्यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा