१४/०३/२०१८

Leady James Bond of India #RajaniPandit got bail from Thane Court


“रजनी”च्या जीवनात पहाटेचे किरण   
      रजनी पंडीत #RajaniPandit नांव तसे कमी ऐकिवात असलेले कारण व्यवसाय सुद्धा तसाच. रजनी पंडीत ह्या भारताच्या पहिल्या खाजगी गुप्तहेर. बहीर्जी नाईक या निष्ठावंत व अत्यंत चतुर,हुशार वेषांतरात निपूण असलेल्या शिवरायांच्या गुप्तहेराने  केलेल्या हेरगिरीमुळे शिवरायांना स्वराज्य निर्मितीत मोठी मदत त्या काळात झाली होती. आता अजित डोभाल यांनी सुद्धा त्याच कार्यामुळे नावलौकिक मिळवला. या गुप्तहेरीच्याच कार्यात गुंतलेल्या रजनी पंडीत यांना सुमारे दीड महिन्यापुर्वी “सीडीआर”(कॉल डीटेल्स रेकॉर्ड) अवैधरीत्या मिळवण्याच्या व ते विकण्याच्या आरोपाखाली मागील महिन्यात अटक झाली होती. ठाणे गुन्हे शाखा सीडीआर प्रकरणाचा तपास करीत असता त्यांनी काही आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी करतांना अभिनेता नवाजउद्दीन सिद्दिकी व रजनी पंडीत यांचेही नांव आले. 32 वर्षांपासून खाजगी हेरगिरी करणा-या रजनी पंडीत यांना गजाआड जावे लागले.भारताची “लेडी जेम्स बॉंड म्हणून ओळखल्या जाणा-या रजनी पंडीत या माजी पोलीस अधिका-याच्या मुलीने सुमारे 75 हजार प्रकरणे सोडविली आहेत.त्यांचे वडील पोलीस अधिकारी असतांना महात्मा गांधी हत्या प्रकरणात त्यांनी गुप्तपणे चौकशी केल्याचे सांगितले जाते.कॉलेज जीवनांत रजनी यांनी एका मैत्रीणीला वाईट संगती पासून वाचवण्यासाठी तिच्यावर लक्ष ठेवून तिच्या घरच्यांना माहिती दिली असता मैत्रिणीच्या घरच्या मंडळींनी रजनी पंडीत यांना “तू काय हेर आहेस काय?” असे विचारले आणि मराठी साहित्याचा अभ्यास करणा-या रजनी यांना हेरगिरी करण्याची प्रेरणा व आवड निर्माण झाली व त्यांनी तेच “करीअर” केले.”रजनी पंडीत डीटेक्टीव्ह सर्व्हिसेस” या नावाने संस्था सुरु केली.काही कर्मचारी सुद्धा त्यांनी नियुक्त केले आहेत. दूरदर्शनने त्यांना “हिरकणी” पुरस्कार देऊन गौरवले सुद्धा आहे. परंतू अवैधरीत्या सीडीआर मिळवून ते मोठ्या किमतीस विकणे या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. त्यांच्या समवेत इतरही काही जणांना अटक झाली आहे. त्यांना अटक झाल्यावर देशभर विविध चर्चा सुरु झाल्या आणि त्यांचे नांव बरेच चर्चिले जाऊ लागले. त्यांच्या कार्यामुळे , त्यांच्या विविध प्रकरणे हुशारीने सोडविण्यामुळे त्यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली नसेल ती त्यांना सीडीआर चा अवैध वापर व विक्री या आरोपामुळे व त्यामुळे झालेल्या अटकेमुळे मिळाली. वयाने साठीत असलेल्या रजनी पंडीत चाळीस दिवस कोठडीत होत्या. रजनी पंडीत यांनी मोठा नावलौकिक मिळवला अनेक महिलांना त्यांच्या या गुप्तहेरीच्या कार्यामुळे प्रेरणा मिळाली असेल परंतू या आरोपामुळे व त्यामुळे झालेल्या अटकेमुळे त्यांनी मिळवलेल्या नावलौकिकावर धूळ फेकल्या गेली आहे. चांगले कार्य करीत असतांना अनेक शत्रू सुद्धा तयार होतात त्यातल्या त्यात रजनी पंडीत यांचे क्षेत्र गुप्तहेरीचे त्यामुळे शत्रू तयार होण्याची दाट शक्यता. कदाचित त्यांना सीडीआर प्रकरणात अडकविल्या गेले असेल किंवा कदाचित हे मोहामुळे घडले असेल अशा विविध शक्यता आहेत. सत्य काय आहे आणि असत्य काय ? ते विशिष्ट वेळेत पुढे येणारच परंतू चाळीस दिवसानंतर त्यांना परवा 20 हजार रुपयाच्या जामिनावर सशर्त सोडण्यात आले. रजनी पंडीत आता त्यांना झालेल्या चाळीस दिवसाच्या कोठडीतील अनुभवावर एक पुस्तक लिहीणार आहे.त्यातूनही अनेक बाबी उजेडात येतीलच. ज्यांच्या नावाचा अर्थ संध्याकाळ असा होतो त्या रजनी पंडीत #RajaniPandit यांच्या जीवनात तूर्तास तरी पहाटेचे किरण लकाकले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा