३०/०३/२०१८

Article on a song about God Hanuman written by veteran Marathi film maker Dada Kondke


दादा कोंडकेंचे अजरामर भक्तीगीत 
     हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंतांनी फुलून आलेल्या प्रतिभेमुळे लिहिलेली गीते, त्यांचे संगीत, दिग्दर्शन प्रतिभा यांचे अनेक किस्से आहेत. सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर, सी रामचंद्र, हसरत जयपुरी, शैलेन्द्र यांच्या काव्यस्फूर्तीच्या गोष्टी अनेकांना ठाऊक आहेत. मराठीतील “लिजेंड” दादा कोंडके यांचे सुद्धा असे अनेक किस्से आहेत.  दादा कोंडके यांचे चित्रपट म्हटले की विनोद आणि त्यातल्या त्यात द्विअर्थी विनोदच आठवतो. अभिनयाचे कुठलेही प्रशिक्षण न घेतलेल्या दादांनी ऐतिहासिक, पौराणिक आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेले चित्रपट पाहून काहीश्या विटलेल्या प्रेक्षकांना अनेक “सिल्व्हर ज्युबिली हिट” असे विनोदी मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटांनी पिटातील प्रेक्षकांना भरभरून मनोरंजन दिले. सेन्सॉरला सुद्धा त्यांचे चित्रपट डोळे सताड उघडे ठेऊन व कान देऊन पहावे लागत असत. दादांचा तसा एकही चित्रपट आजपावेतो पाहण्याचा योग काही आला नाही. कारण दादांच्या ऐन बहरात असतांना आम्ही लहान होतो व रॉयल्टीचा वाद, कोर्टातील प्रकरणे यांमुळे त्यांचे चित्रपट दूरदर्शन वर येत नव्हते. दादा सुद्धा जात्याच प्रतिभावंत. अभिनयाची प्रतिभा तर होतीच शिवाय त्यास विनोदाची झालर. याच विनोदाच्या बादशाहाची प्रतिभा एकवेळी फुलली आणि सतत हिट विनोदी चित्रपट देणा-या दादांना एकदा प्रवासात असतांना चक्क एक भक्तीगीत सुचू लागले.त्यांनी ताबडतोब पेन आणि कागद हाती घेतला आणि त्यांचा पेन कागदावर सरसर फिरू लागला आणि त्यांच्या लेखणीतून एक अजरामर भक्तीगीत प्रसवले गेले. ते गीत म्हणजे “अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान...” . गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र्वासियांना या गीताने खूप आनंद दिला आहे. “तुमचं आमचं जमल” या चित्रपटातील दादा कोंडके रचीत हे मराठी गीत पंजाबी महेंद्र कपूरने असे ठसक्यात गायले आहे की जणू दादा स्वत:च गात आहे असा भास होतो.जत्रेतील टूरिंग टॉकीजच्या पडद्यावर ग्रामीण भागातील
एक हनुमंत भक्त सुंदर शब्दात, भक्तीरसात बुडून जात हनुमांचे वर्णन करीत हे भक्तीरसाने ओतप्रोत भरलेले गीत गातांना बघून तत्कालिन सिने रसिक सुखावला होता व आजही हेच गीत यु-ट्युबवर पहातांना सुद्धा सुखावतो. आजही हे गीत तितकेच ताजेतवाने वाटते. गीत पहातांना म्हणा किंवा ऐकतांना श्रोत्याच्या डोळ्यासमोर तो वनारी अंजनीसुत हनुमान आणि पूर्ण रामायणच उभे राहते. अनेक देवतांच्या मांदियाळीत गणपती आणि हुनुमान यांचेच भक्त सर्वात जास्त असावेत. गणपती बुद्धी तर हनुमान बल प्रदान करणा-या देवता आहेत. तुलसीदासांचा हनुमान चालिसा आणि रामदास स्वामींचे मारुती स्तोत्र त्यामुळेच आजही म्हटले जातात. रामदास स्वामींनी तर बलोपासनेसाठी म्हणून अनेक ठिकाणी हनुमंताची मंदिरे सुद्धा स्थापन केली. तुलसीदास त्याचे वर्णन “ज्ञानगुणसागर” तर समर्थ रामदास “नेटका सडपातळू” असे करतात. या संतानी केलेले वर्णन दादांनी सुद्धा त्यांच्या लहानपणापासून ऐकले असावे म्हणूनच त्यांनाही या हनुमंताविषयी काव्य स्फुरले. “तळहातावर आला घेउनी पंचप्राण” , “धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा...” अशा सुंदर ओळी असलेले हे गीत पुन्हा-पुन्हा ऐकावेसे वाटते व कितीही वेळा ऐकले तरी त्याचा गोडवा कमी होत नाही. याच गीतात हनुमंताला उद्देशून आणखी एक ओळ आहे. ती म्हणजे “आले किती गेले किती संपले भरारा तुझ्यापरी नावाचा रे अजुनी दरारा”. अगदी असेच दादांना सुद्धा लागू होते कित्येक नट आले आणि गेले परंतू दादा कोंडके या नावाचा दरारा आजही कायम आहे आणि राहणार.
गीत एका 👇
https://youtu.be/X0BFbnAXu-U


1 टिप्पणी: