०७/०६/२०१८

Article about sad demises of 6 eminent leaders of Maharashtra during last 12 years



12 वर्षातील राजकीय हानी 
हाराष्ट्रातील राजकारणात मातीशी नाळ असणारे नेते जे काही प्रमुख नेते होते, जे खेडोपाडी हिंडले होते, ज्यांनी जनतेच्या समस्या जवळून पाहिल्या होत्या असे नेते आता फार कमी आहेत व अशा नेत्यांची संख्या दिवसेंदिवस  कमीच होत आहे. निव्वळ चमकोगिरी करणा-या व पक्षनिष्ठ नसणा-या नेत्यांचा राजकीय पटलावर उदय होत आहे. महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबत बोलायचे झाल्यास 2006 ते 2018 या 12 वर्षात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांवर काळाने घाला घातला. हे सर्व नेते मोठे होते, जनेतेतून पुढे आले होते , स्वकर्तुत्ववान होते , जनतेच्या समस्यांची चांगली जाण असलेले नेते होते. ते गरीबीतून वर आलेले होते. 12 वर्षांपूर्वी मे महिन्यात 2006 मध्ये #PramodMahajan प्रमोद महाजन यांची वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी हत्या झाली. त्यांच्या हत्येमुळे भाजपाची मोठी हानी झाली. भावी पंतप्रधान म्हणून ओळखल्या जाणारे महाजन जर असते तर आजचे राजकारण कदाचित वेगळे असते. त्यानंतर 2012 या वर्षी कॉंग्रेसचे लोकप्रिय नेते #VilasraoDeshmukhविलासराव देशमुख हे सुद्धा वयाच्या 67 व्या वर्षी गेले. विलासराव सुद्धा सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले मातीशी नाळ असणारे, सर्व पक्षातील नेत्यांशी सलगी असणारे नेते होते. विलासरावांनंतर काही महिन्यातच आपल्या ‘रिमोट’ ने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकारण हालवणारे हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे #BalasahebThakre निवर्तले. आपली भाषणे, लेखणी, व्यंगचित्रे यांनी विरोधकांना भंडावून सोडणा-या बाळासाहेबांची जादू निराळीच होती.युती सरकार  सत्तेत येण्यास बाळासाहेबांचा करिश्मा हे एकमेव कारण होते. बाळासाहेबांच्या जाण्यानंतर दोनच वर्षानी 2014 मध्ये भाजपाच्या दणदणीत विजया नंतर “माधवं” फॉर्म्युल्या व्दारे सोशल इंजिनियरिंग करणारे भाजपाचे उपमुख्यमंत्री राहिलेले, युती टिकवण्यास सतत झटणारे गोपीनाथ मुंडे #GopinathMunde यांचे अपघाती निधन झाले त्यांच्या जाण्याने जनसामान्यांना मोठा धक्का पोहोचला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2015 मध्ये आर आर पाटील वयाच्या 58 व्या वर्षी गेले. तासगावातील शरदरावांनी अचूक हेरलेला हा प्रामाणिक चहेरा राष्ट्रवादीचा चेहरा होता. निष्कलंक, सकारात्मक राजकारणी असेलेले, मातीशी जुळलेले आर आर पाटील #RRPatil सुद्धा अकाली गेले आणि नुकतेच भाऊसाहेब फुंडकर #BhausahebFundkar या शेतकरी पुत्र असलेल्या, तळागाळातील जनतेशी जुळून असलेल्या भाजपातील ज्येष्ठ नेत्याचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजपा व फुंडकरांच्या कमर्भूमीची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने बुलडाणा जिल्ह्यातील भाजपा मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोनच वर्षापूर्वी मंत्रीपद मिळाले होते, मुलगा आमदार केंद्रात भाजपा ,राज्यात भाजपा म्हणजे आपल्या मतदारसंघात मोठा विकास करण्याची संधी त्यांच्याकडे आली होती खामगांवकरांना विकासाचे तसेच जिल्हा होण्याचे वेध लागले होते. भाऊसाहेबांना नेमके चांगले दिवस आले असतांनाच , त्यांच्या इतक्या वर्षाची मेहनत सफल होण्याची वेळ असतांनाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. 2006 ते 2018 या काळात प्रमोद महाजन, विलासराव देशमुख , बाळासाहेब ठाकरे , गोपीनाथ मुंडे , आर आर पाटील  व परवा भाऊसाहेब फुंडकर असे सर्व मातीशी जुळलेले, विकासाभिमुख, पक्षनिष्ठ असे नेते गेले. हे नेते असते तर राजकारणाची दिशा काही वेगळी असती. परंतू शेवटी नियतीला जे मंजूर असते तेच होत असते. दिवसेंदिवस राजकारणातून मातीशी नाळ असलेले नेते कमी होत आहेत. राजकारण म्हणजे स्वत:चा विकास अशी वृत्ती असणारे नेते पुढे येत आहेत या पार्श्वभूमीवर गेल्या 12 वर्षात या सहा प्रमुख नेत्यांचे निधन म्हणजे एक मोठी राजकीय हानी होय.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा