१६/०६/२०१८

Article reminds the serial "Phir Wohi Talash" a television show by director Lekh Tandon broadcast on Doordarshan in 1989–1990.


फिर वही तलाश




भारतातील टीव्हीवर जेंव्हा फक्त दूरदर्शन दिसायचे त्या काळातील लोकांना विशेषत: विद्यालयीन व महाविद्यालयीन तरुणांना फिर वही तलाश नावाची मालिका शीर्षक वाचताक्षणीच आठवली असेल. त्याकाळात दूरदर्शनवर एकापेक्षा एक सरस अशा दर्जेदार कथानक असेलेल्या  मालिका असत. पोलीस अधिकारी बनण्याची महत्वाकांक्षा असलेल्या तरुणीची उडान , भारत पाकिस्तान फाळणीवर आधारीत तमस , कथानकाला काश्मीरची  पार्श्वभूमी असलेली गुल गुलशन गुलफाम, बुनियादहमलोग. चॅनल जरी एकच असले तरी उत्कृष्ट कथानक, दिग्दर्शन असलेल्या आणि विशेष म्हणजे आटोपशीर कथानक असलेल्या कमी भागांच्या व आठवड्यातून एकच दिवस दिसणा-या या मालिका असत. रिपीट टेलीकास्ट नसल्याने दर्शक मालिकेची आतुरतेने वाट पहात असत. फिर वही तलाश ही त्यापैकीच एक मालिका, एका डॉक्टर बनू ईच्छीणा-या गरीब मुलाची ही कथा. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस व्यतीत करणारा, डॉक्टर बनण्यासाठी शहरात येणारा व एका बंगल्याच्या आऊट हाऊस मध्ये राहणारा, गरीबीमुळे कॉम्प्लेक्सअर्थात न्यूनगंड असणारा एक तरुण व त्याच्यावर अव्यक्त प्रेम करणारी घरमालकाची कन्या पद्मा (#PoonamRehaniSarin), ते समजूनही आपल्या गरीब परिस्थितीमुळे पद्माला टाळणारा लाजाळू नरेंद्र (#Ashwinikumar) , पद्माची अवखळ मैत्रीण शहनाज यांच्या सर्वांच्या सुरेख अभिनयामुळे ही मालिका खूप गाजली होती. शहनाजची भूमिका








करणारी #NeelimaAzeem निलिमा अजीम व सलीमची भूमिका करणारा राजेश खट्टर #RajeshKhattar हे दोघेच ते काय नंतर इतर सिनेमा व मालिकांत दिसले. नरेंद्र देखणा नसूनही त्याच्यावर भाळणारी सुंदर पद्मा, पद्माचे कडक वडीलपद्माची आत्या व इतर सहकलाकार सर्वानी आप-आपल्या भूमिका सुरेख वठवल्या होत्या. त्यामुळेच ही मालिका अजूनही चांगली स्मरणात आहे. मालिका लक्षात राहण्याचे आणखी एक कारण मालिकेचे दिग्दर्श हे जुन्या जमान्यातील आम्रपाली, प्रोफेसर, अगर तुम ना होते या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक #LekhTandon लेख टंडन यांनी केले होते. कथानकदिग्दर्शन, अभिनय या सर्वांमुळे कलाकार नवखे असूनही या मालिकेची भट्टी मात्र छान जुळून आली होती.
कभी हाद्सो की डगर मिले,
कभी मुश्किलो का सफर मिले,
यह चिराग है मेरी राहके
मुझे मंझीलोंकी तलाश है
या मालिकेचे हे श्रवणीय शीर्षक गीत तेंव्हा फार लोकप्रिय झाले होते. 1990 च्या दशकात दूरदर्शनवर झळकलेली ही मालिका पुन्हा कधीही पहाण्यात आली नाही. मालिकेचे पुन:प्रक्षेपण झालेही असेल तर त्याची काही माहिती नाही कारण दूरदर्शन वाहिनीचा क्रमांक सुद्धा आता कुणाला माहीत नसतो. भरमसाठ वाहिन्यांच्या भाऊगर्दीत दूरदर्शन हरवले आहे.  वाहिन्यांचा निव्वळ सुळसुळाट झाला आहे परंतू दर्जेदार कथानकाच्या मालिकांची मात्र वानवा आहे. नव-याची दुसरी बायको, सांस-बहु, नवरा बायकोच्या मध्ये येणारी एखादी व्दाड स्त्री. थोड्याफार फरकाने असेच कथानक असणा-या मालिका असतात. शिवाय त्यांच्या लांबीला काही मर्यादा नाही. घरोघरी या असल्या तद्दन भिकार मालिका पहिल्या जातात, ते सुद्धा जेवण करतांना. दर्जेदार लेखक, दिग्दर्शक कुठे लोप पावले ? की दर्शकांचीच रुची  आता बदलली आहे? काळ बदलला, नवीन तंत्रज्ञान आले, अनेक वाहिन्या आल्या त्या वाहेन्यांवरून सादर होणा-या कार्यक्रमांमुळे त्यांचा टीआरपी ठरू लागला, बिग बॉस सारखे काहीही खेळ करणे सुरु झाले टीआरपी च्या नादात दर्जेदार कार्यक्रम, दर्जेदार मालिका लोप पावल्या व दर्शकांची मात्र दर्जेदार मालिका, चित्रपट, नाटक यांच्यासाठी फिर वही तलाश सुरु झाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा