३१/०७/२०१८

Mohd Rafi was renowned singer of Hindi film industry, article elaborate about him (originally written on 31 July 2014)


तुम मुझे युं भुला ना पाओगे

            हिंदी चित्रपटसृष्टीमुळे भारतातील अनेक कलाकारांचे सुप्त गुण प्रकट झाले व ते कलाकार सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले. म्हणजेच आताच्या भाषेत सेलिब्रेटीझाले.अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, लता मंगेशकर, नौशाद, सैन्यातून येऊन संगीतकार बनलेला मदन मोहन, पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी सोडून स्टार झालेला डायलॉग किंग स्टाईलबाज राजकुमार, बस कंडक्टरचा नायक झालेला नवीन पिढीचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता रजनीकांत. याच मालिकेत मोडला जातो सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी. लहानपणी रफीच्या गावात एक फकीर येत असे. त्याच्या मागे-मागे फिरून रफी सुद्धा त्याच्यासारखे गाणे गाऊ  लागला. एक दिवस रफी त्या फकीराच्या मागे-मागे गावाच्या बाहेर गेला व बराच काळ पर्यन्त परत आलाच नाही. घरी, गावात सर्वाना चिंता वाटू लागली परंतू रफी नंतर परत आला. परत आला तो आवाजात एक मधाळ गोडवा घेउन. या घटनेनंतर तो फकीर सुद्धा पुन्हा गावात फिरकला नाही. मोठ्या भावाच्या केश कर्तनालयात बसून गाणी म्हणणा-या रफीतील गायन कौशल्य मोठ्या भावानी अचूक हेरले व त्याला घेऊन मुंबईची वाट धरली. अतिशय नम्र, “डाऊन टू अर्थअशा या गायकाने 1950 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले.सुरुवातीला सैगलच्या आवाजाचा मोठा प्रभाव रफीवर होता. परंतू हळू-हळू त्याने स्वतंत्र शैली निर्माण केली व अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. सुरुवातीला एन.दत्ता, नौशाद इ. संगीतकारांबरोबर बैजू बावरा मधील मन तडपत हरी दर्शन को आज”, “ओ दुनिया के रखवालेसारखी अनेक यशस्वी गाणी त्याने दिली. त्यानंतर शंकर-जयकिशन सोबत तर शेकडो हिट गाणी रफीने गायली. शंकर-जयकिशन व रफी हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. 1960 च्या दशकात शंकर-जयकिशनची रफीने राजेंद्रकुमार किंवा शम्मी कपूर यांच्यासाठी गायलेली रफीच्या मधाळ आवाजातील कितीतरी गाणी रसिक आजही गुणगुणतात, ऐकतात. युट्युब वरील त्याच्या गाण्यांच्या व्ह्यूवरुन लाईकवरुन हे सहज लक्षात येईल. जसे दिवाना हुवा बादल”, “ रुखसे जरा नकाब उठावो” , “दिन ढल जायइ गाणी. राजेन्द्र्कुमारचे “बहारो फुल बरसाओतर आजही नवरदेव हनुमंताचे दर्शन घेऊन कार्यालयात आला की बँडवाले वाजवताना दिसतात. रफीच्या अफाट लोकप्रियतेचे  व यशाचे गमक हे सुद्धा होते की सर्वांसोबत त्याची वागणूक अतिशय नम्रतेची असे. त्याच्या चांगुलपणामुळे गायकाच्या रॉयल्टी प्रकरणाहून लता व रफी वाद झाला होता त्यावेळी संगीतकारांनी युगल गीतांसाठी रफी सोबत लताऐवजी शारदा सारख्या सामान्य गायीकेकडून गाणी गाऊन घेणे रास्त समजले होते. शेवटी लताजींना सामंजस्याने वाद मिटवावा लागला होता असा किस्सा सांगितला जातो. रफीने 1950-60 च्या दशकात देव आनंद, दिलीपकुमार, राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, शशी कपूरधर्मेंद्रमनोजकुमार, विश्वजीत, जॉय मुखर्जी या सर्व नायकांच्या यशात रफीच्या आवाजाचा सुद्धा मोठा वाटा आहे. नंतरच्या पिढीत सुद्धा राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जितेंद्र, ऋषी कपूर, नवीन निश्चल यांच्यासाठी सुद्धा रफीने अनेक श्रवणीय गाणी गायली. राजेश खन्ना व किशोरकुमार यांच्या सर्वोत्तम कारकीर्दीच्यावेळी सुद्धा तेरी बिंदिया रेहे अभिमान मधील तसेच क्या हुवा तेरा वादा अशी हिट गाणी गाऊन रसिकांना आपल्या आवाजातील गोडव्याने रफीने मंत्रमुग्ध केलेच होते. रफीने इतर भाषांत सुद्धा गाणी म्हटली आहेत. रफीने 12 मराठी गीते गायली आहेत. यातील हा छंद जीवाला लावी पिसे” , “प्रभू तू दयाळूअशी काही गाणी आहेत. दयाळू या शब्दातील ळूरफीने किती लिलया गायला आहे. कारण मुस्लीम लोकांना हा शब्द उच्चारणे सहसा कठीण असते. मराठी गीतांत सुद्धा रफी हिंदी इतकाच खुलुन गायला आहे. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात सुद्धा फेसबुकवर मो. रफी फॅन क्लबच्या माध्यमातून अनेक रफी चाहते रफीची सुश्राव्य गीते पोस्ट करीत असतात. अनेकदा रफी किशोर मध्ये श्रेष्ठ कोण अशी चर्चा केली जाते. तेंव्हा शरारत चित्रपटात “अजीब दास्तान है तेरी ऐ जिंदगी “या गीतासाठी किशोरकुमारसाठी रफीच्या आवाजाचा वापर करण्यात आला होता. किशोरसाठी रफीने आवाज दीलेली इतरही काही गाणी आहेत, यातच रफीचे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही का? 31 जुलै 1980 रोजी मो.रफी या महान गायकाचे निधन झाले रफी नंतर सुरेश वाडकर, अन्वर, मो. अजीज, शब्बीरकुमार या प्रती रफींना पाचारण करण्यात आले परंतू त्यांना रफीच्या आवाजाची उंची काही  गाठता आली नाही. उलट या प्रतीरफी गायकांचा आवाज ऐकल्यावर रफीची व त्याने शम्मी कपूरसाठी गायलेल्या तुम मुझे युं भुला ना पाओगेया गाण्याची आवर्जून आठवण येते. खरोखरच रसिक श्रोते रफीला व त्याने गायलेल्या गाण्यांना कदापीही विसरू शकणार नाहीत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा