२३/०८/२०१८

Former Prime minister of India Atal bihari Vajpayee, didn't left behind property for his family, he donated his home for library. Article elaborates his virtues

अपने दम पर खडे रहो....













16 ऑगष्टला अटलजी गेले. लोकसत्ताने अग्रलेखात लिहिले की ,”वाजपेयी ही हळूहळू नष्ट होत असलेली एक सर्वसमावेशी भारतीय प्रवृती आहे” खरेच सर्वसमावेशी वृत्ती ही लोप पावत चालली आहे. वाजपेयीं सारख्या नेत्यांमुळे ती वृत्ती टिकून होती. 66 दिवसांपासून एम्स मध्ये दाखल असलेल्या माजी लाडक्या पंतप्रधानास जेंव्हा लाईफ सपोर्ट सिस्टीम वर ठेवल्याच्या बातम्या आल्या तेंव्हा करोडो देशवासीयांच्या हृदयाचा ठोका चुकला. 16 ऑगष्ट ला संध्याकाळी जेंव्हा त्यांची निधन वार्ता आली तेंव्हा हा “जीता जागता राष्ट्रपुरुष” असलेला भारत देश सुन्न झाला. नेहरूंच्या काळापासूनचा साक्षीदार असलेल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या या बुद्धीमान नेत्याने आपल्या कवी मनाने, संवेदनशील वृतीने, वाक्चातुर्याने, उपजत असलेल्या सर्वसामावेशी वृतीने सर्व भारतवासीयांच्या मनावर अनभिषिक्त पुढे अभिषिक्त असतांना अधिराज्य केले. राजकारण हे समाजकारण असलेल्या काळात वाजपेयी खासदार झाले. दिल्लीतील आपल्या निवासस्थानापासून ते संसदेपर्यंत ते पायी जात. सहा महिन्यानंतर जेंव्हा सहा महिन्यांचे एकत्रित मानधन मिळाल्यावर ते रिक्षाने संसदेत गेले होते. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी आपले निवासस्थान त्वरीत सोडले होते. अखिलेश यादव व महाराष्ट्रातील नेतापुत्रांना जेंव्हा सरकारी निवासस्थान सोडण्याची वेळ आली होती तेंव्हा त्यांनी त्यांच्या निवासस्थानाची कशी अवस्था केली होती हे देशानी पहिले आहे. वाजपेयी निर्भीड, निर्मोही, निस्पृह होते. राजकारणात निव्वळ पैसे मिळवण्यासाठी दाखल होण्याच्या व तसे जाहीर बोलूनही दाखवणा-या सद्य स्थितीतील नेत्यांनी अटलजींना केवळ श्रद्धांजली देऊन उपयोग नाही तर अटलजींचा एखादा गुण आत्मसात केला तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. प्रदीर्घ काळ राजकारणात राहून सुद्धा वाजपेयी त्यांच्या मागे काही मोठी इस्टेट ठेऊन नाही गेले. आता तर कमिशनचे रेट ठरलेले असतात,
सरकारी नोकर तर पैस्यासाठी एवढे आसुसलेले असतात की प्रोबेशन पिरेड मध्येच त्यांचा भ्रष्टाचार सुरू होतो. रामाचा दाखला देत “मै डरता हुं तो बदनामी से डरता हुं” असे म्हणणा-या निष्कलंक वाजपेयी यांनी मात्र त्यांच्या कुटुंबियासाठी काही लाभ घेतले नाही, सरकारी सुविधा लाटल्या नाही. बहिणीकडे गॅस नव्हता तर खासदारांच्या कोट्यातून गॅस मिळत असूनही अटलजींनी बहिणीला गॅस कनेक्शन मिळवून दिले नाही व बहिणीने सुद्धा त्यांना मागितले नाही. मूत्रपिंडावर उपचार करण्याची गरज असतांना केवळ पैसे नव्हते म्हणून वाजपेयी विदेशात जाऊ शकत नव्हते तेंव्हा राजीवजींनी त्यांना एका शिष्ट मंडळात घेतले व न्यूयॉर्क दौरा असतांना वाजपेयींना तेथे पाठवून उपचार करून येण्यास सांगितले. अटलजी बालपणी ग्वाल्हेर येथे असतांना अकोल्याचे नारायणराव तरटे हे तेथे संघ प्रचारक म्हणून होते. नारायणरावांनी अटलजींना संघात आणले, अटलजींवर संघाचे संस्कार झाले, पुढे श्यामाप्रसाद मुखर्जी व दीनदयाल उपाध्याय यांच्या संपर्कात आल्यावर बालपणी झालेले संस्कार अधिकच दृढ झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हे गुण उपजत होतेच ते अधिक वृद्धिंगत झाले .एवढे की खासदार असतांना सुद्धा स्वत:चे कपडे ते स्वत: धुत असत अशी आठवण संघाचे जेष्ठ विचारवंत मा.गो.वैद्य सांगतात.आपण जेवढे उदारमतवादी आहोत,सर्वसमावेशक आहोत तेवढेच कणखर सुद्धा असू शकतो हे त्यांनी कारगिल युद्ध  व अणुचाचणी वेळी दाखवून दिले आहे. अणुचाचणी नंतर पाकड्यांनी अमेरिकेकडे कांगावा केला, वाजपेयी यांना अमेरिकेत बोलावले गेले तेंव्हा वाजपेयी यांनी ते झुगारून लावले व आपला बाणेदारपणा जगाला दाखवून दिला. पाच दशके पत्रकारिता, साहित्य, राजकारण असा प्रवास करूनही वाजपेयी यांनी स्थावर,जंगम अशी काही मालमत्ता जमा केली नाही. कमावले ते जनतेचे प्रेम. जमीन जुमला तर मिळवलाच नाही उलट स्वत:चे वडीलोपार्जित घर वाचनालयासाठी उपयोगात आणले. माझ्या कडून काही अपेक्षा ठेऊ नका असा परखड संदेश त्यांनी आपल्या आप्तस्वकीयांना दिला होता. “अपने दमपर खडे रहो, या भांग पीकर पडे रहो” असे त्यांनी कुटुंबीयांना म्हटले होते. पुढच्या सात पिढ्यांची चिंता वाहणा-या, त्यांच्यासाठी अवैध मार्गाने माया जमवून त्यांना दुबळे बनवणा-या सद्यस्थितील भ्रष्ट राजकारण्यांना, नोकरदारांना सुद्धा अटलजींचा हा संदेश समर्पक नाही का ?.                  


७ टिप्पण्या:

  1. It's a very well written article! The writer has got a captivating style of writing. I have been following the articles written by Mr Vinay Varangaokar; his writing skills and his thorough homework on the subject increase the readability of his articles!

    उत्तर द्याहटवा
  2. जगदीश उपासने२४/८/१८, १२:३१ PM

    सुरेख.

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर वृत्त 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. टूटे हुए तारो से फूटे बसंती स्वर,
    पत्थर की छाती में उग आया नव अंकुर
    झरे सब पीले पात,कोयल की कुहुक रात
    प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूं
    गीत नया गाता हूं,गीत नया गाता हूं

    उत्तर द्याहटवा