२३/०१/२०१९

Article about hacker Sayed Suja statement about EVM hacking in London press conference

हे इव्हीएम हॅक होत अशीन का राजेहो ?

     परवा बाहेर गावाहून येता-येता एका खेडे गांवातील चहाच्या दुकानावर चहा घेण्यासाठी म्हणून थांबलो. आम्हा मित्रांची “चाय पे चर्चा” सुरू झाली.विषय अर्थात राजकारणाचा, इव्हीएम हॅकचा. इंग्लंड मध्ये आशीष रे या पूर्वी  नॅशनल हेरॉल्ड मध्ये लिहिणा-या एका पत्रकाराने पत्रकार परीषद आयोजित केली होती. त्यात कुठल्यातरी बादरायण संबंधाने कोंग्रेसचे कपिल सिब्बल सुद्धा होते. या परीषदेत सय्यद सुजा नामक हॅकर बोलला की भारतात म्हणे इव्हीएम हॅक होते. ज्यांच्या मृत्यू अहवालात अपघातामुळे मानेत दुखापत झाल्यामुळे मृत्यू अशी नोंद असलेल्या गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू नसून त्यांची हत्या झाली आहे व त्या हत्येचे कारण सुद्धा इव्हीएम हॅक हेच आहे असे हा सुजा म्हणाला. या बाबत आमची चर्चा सुरू होती. तो ग्रामीण मध्यम वयाचा चहावाला चहा बनवत होता. परंतू त्याचे कान आमच्याच बोलण्याकडे आहे हे जाणवले. आमची चर्चा पुढे सरकतच होती. “च्या घ्या सायेब”,तो म्हणाला.यक विचारू का सायेब “हे इव्हीएम खरच हॅक होत अशीन काहो?. सद्यस्थितीत हा खरे तर सर्वांचाच प्रश्न आहे.चहा पितांना आमची चर्चा थोडी मंदावली.”म्या म्हनतो सायेब याईनं हे मताईची मशीन आणलीच काउन हो?,विदेशात त म्हने सोडली त्याईन वापरन आम्ही त्याच्याकडे पाहीले.“त्या राजस्थानात अन त्या मध्य प्रदेशात,आन लगे त्या छत्तीसगड मध्ये बी असच झालं आशीन का हो? नीरा इव्हीएम हॅक, इव्हीएम हॅक करायले लागले.”आम्ही त्याला चहा पित असल्यामुळे मंद स्मित करून प्रतिसाद दिला तर मग तो अजूनच खुलला.निवडणूक आयोग त म्हनते हे मशीन काई हॅक नाई करता येत. मंग कस काय हा सय्यद सुजा असं म्हनते,आजलोक काय झोपला होता काय हयो गडी?जवा मुंडे सायेब गेले तवा कुटी गेलता हा? बरं इव्हीएम हॅक होते म्हनते त मंग त्या मतपेट्या कोन्या सुदया होत्या हो? त्या बी त राजा याईचे लोक डारेक्टच हॅक करत ना हो.अन लगे ठप्पे बी मारत,एकच मानूस लय ठप्पे मारे.राजेहो आपले लोक काई सुधरत नाय ना हो.राजा भारतात बनेल मशीन ते बी काय ते गोपनीय का काय लय सुरक्षेत बनवेल त्या मशीनीत जुगाड होते हे त्या इंग्लंडातला तो जुगाडी सांगते. त्यालेच धरा न म्हनं पयले, हे अस जुगाड करून देन काय बरबर होय का राजा?. त्याचे ते ग्रामीण भाषेतील परंतू पटेल असे ते बोलणे ऐकून आम्ही सुद्धा चकीत झालो. खरे होते त्याचे या भारतात हे असेच होत राहणार का? पूर्वी मतपेट्या हॅक अर्थात पळवून नेल्या जात,एकच माणूस,किशोरवयीन मुले मतपत्रिकेवर शिक्के मारून येत असत. आता हे इव्हीएम हॅकींगच्या चर्चा.भारतात काय असेच सुरू राहणार का?एका ग्रामीण चहावाल्याला पडलेला “हे इव्हीएम खरच हॅक होत अशीन काहो?”हा प्रश्न सर्वच भारतवासीयांना पडला आहे. 2019 च्या निवडणूक निकालानंतर जर सत्तापालट झाला तर सत्तेत येणारे इव्हीएम वर शंका घेतील की नाही ते पाहू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा