१४/०२/२०१९

Memories of beautiful actress and Marilyn Monroe of Bollywood Madhubala

सौंदर्यवती मधुबाला 

     डिजिटल युग आहे. ब्राउजरचे होमपेज गुगल असल्याने. ब्राउजर सुरु करताच गुगलचे दर्शन होतच असते. तसेच ते आजही झाले. काही वर्षांपासून गुगलने डूडल हा प्रकार सुरु केला. या डूडलद्वारे गुगल अनेक नामांकित, थोर, राष्ट्पुरुष,वैज्ञानिक अशा व्यक्तींची आठवण एक ग्राफिक्सद्वारे करून देत असते. आज सकाळी ब्राउजर उघडताच डूडलवर अप्रतिम सौदर्यवती, रूपवान ,गतकाळातील गुणी अभिनेत्री मुमताज जेहान बेगम देहलवी उपाख्य मधुबाला हिचे चित्र दिसले. व माउस पॉइंटर डूडलवर विसावला. “Madhubala’s 86th birthday” अशी टीप आली आणि "अच्छाजी मै हारी" अशी आशाजींच्या आवाजात रागावलेल्या देव आनंदची काला पानी या चित्रपटात विनवणी करणारी , चलती का नाम गाडी चित्रपटातील "ओल्या साडीचा पदर पिळणारी एक लाडकी भिगी भागीसी" रूपसंपन्न मधुबालाच्या आठवणी ताज्या झाल्या. डूडलवर हिन्दी चित्रपटसृष्टीची मर्लिन मन्रों म्हणून ओळखल्या जाणा-या तिचे ते सुप्रसिद्ध गाणे जब प्यार किया तो डरना क्याया गीतावरील नृत्य करतांनाचे चित्र होते. तसे पाहू जाता आजच्या तोकड्या कपड्यातील नट्यांना सुंदर समजणा-या पिढीला 1950-60 च्या या अभिजात सुंदर अभिनेत्री बाबत फारशी कल्पना नसेल. बालपणीच कुटुंबासाठी अर्थार्जन व्हावे म्हणून तिला कुटुंबीयांनी चित्रपटात दाखल केले. अशोककुमार, दिलीपकुमार,देव आनंद, किशोरकुमार सारख्या तत्कालीन अभिनेत्यांसह तिने अनेक भूमिका वठवल्या. त्यानंतर ती अभिनेत्री झाली. दिलीपकुमार सोबत प्रेमाचे तिचे किस्से गाजले. परंतू पुढे आजाराने ग्रस्त झाल्यावर चलती का नाम गाडी, हाफ तिकीट , झुमरू या चित्रपटात तिच्यासह काम करणा-या किशोरकुमारने तिला असाध्य आजार आहे हे माहीत असूनही तिच्यासह लग्न केले. तिला विदेशात उपचाराकरीता नेले. परंतू 70 चित्रपटात भूमिका करणा-या या अभिनेत्रीस वयाच्या 36 व्या वर्षी मृत्यूस स्वाधीन व्हावे लागले. पडद्यावर मधुबालाला पाहणे हा एक सुखद अनुभव रसिक अनुभवत असतानाच ती रसिकांना धक्का देऊन गेली. सुंदर,अवखळ

मधुबालाचे आजही माध्यमांवर अनेक चाहते आहेत. तिची आजही पाहणारे, ऐकणारे अनेक रसिक आहेत. समाज माध्यमांवर आजही कुणी मधुबालाचे फोटो पोस्ट केले तर त्यांना अनेक लाईक्स मिळतात. 14 फेब्रुवारी या पाश्चात्त्यांच्या प्रेमाच्या दिनी म्हणजेच व्हॅलेंटाइन डे च्या पार्श्वभूमीवर मधुबालाचा जन्म झाला. रसिकांनी ,तिच्या चाहत्यांनी तिला भरपूर प्रेम दिले. ती मात्र प्रेमाच्या बाबतीत उपेक्षितच राहिली. कुटुंबियांच्या धाकात राहून त्यांच्यासाठी पैसे कमवीत राहिली. दिलीपकुमार कडून ते मिळेल ही आशा तिला होती परंतू तेथेही निराशाच तिच्या नशिबी आली.अगदी शेवटी किशोरकुमार कडून तिला ते प्रेम मिळाले परंतू तेंव्हाच तिची शेवटची घटका समीप आली होती. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवालायाप्रमाणे या पृथ्वीवरील या अप्सरेच्या या सुहास्यवदनेच्या प्रेमात  कदाचित ईश्वर सुद्धा पडला असावा. म्हणूनच व्हँलेंटाईन डे च्या दिनी जन्मलेल्या तिला अवघ्य्या 36 व्या वर्षी तिला बोलावणे धाडले गेले. आज मधुबाला हयात असती तर 86 वर्षांची असती. गुगलने आज रसिकांना तिच्या स्मृती करून दिल्या. एक मासिकाने तिला जगातील महान अभिनेत्री असा उल्लेख केला आहे तर वर्ष 2008 मध्ये डाक विभागाने तिच्या स्मृती प्रित्यर्थ तिकीट सुद्धा काढले होते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा