०२/०३/२०१९

Contradictory statements by leaders and so called intellectuals after Pulwama attack

हे वागण बरं नव्हं !

पुलवामा हल्ला, त्यानंतरचे पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर भारतीय वायुदलाचे हल्ले, पाकिस्तानची  विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसणे, त्यांच्यावर मारा करतांना आपले पायलट विंग कमांडर अभिनंदन  पकडल्या जाणे, व त्यांचे पाकिस्तानातून सुखरूप परत येणे. या सर्व घडामोडी गेल्या 14 फेब्रुवारी नंतर घडल्या परंतू या घडामोडी सुरु असताना आपल्या देशातील तथाकथीत बुद्धीजिवी,काही नेते, व सोशल मिडीया वरील उपटसुंभ यांची कीव करावी अशी वक्तव्ये येत होती. हे सर्व केवळ मोदी विरोध म्हणून जिभ सैल सोडून वाटेल ते बरळत सुटले. या सर्वांत ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, सिद्धू व आपले राजसाहेब, यांचा समावेश होता. पुलवामा घटनेचे राजकीय भांडवल केले जात आहे ,ममता बॅनर्जी यांची पुराव्यांची मागणी, सिद्धूला इम्रान खान शांतीदूत वाटायला लागला. राजसाहेब यांनी तर कहरच केला. राजसाहेब म्हणाले की की ”अजित डोवाल यांची चौकशी करा म्हणजे ते मोदींबाबत खूप काही सांगतील” यांसारखी वक्तव्ये पाकिस्तानी वृत्त वाहीन्यांवर दाखवली गेली. विशेष म्हणजे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केल्या गेले याबाबत एकाही देशाने भारताची निंदा केली नाही परंतू आपले महाभाग मात्र केवळ मोदी विरोध म्हणून गरळ ओकत सुटले होते. हे असे आपले नेते, या अशा यांच्या त-हा. पक्षभेद दूर सारून बांगलादेश निर्मिती वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हणून त्यांचे कौतुक केले होते. सद्य स्थितीत विरोधी पक्षीय मोदींचे कौतुक तर सोडाच उलट पाकड्यांचे गोडवे गात आहेत व मोदींची निर्भत्सना करीत सुटले आहेत .याच दरम्यान पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्या मात्र मोदींची तारीफ करतांना दिसत होत्या. तशा चित्रफिती सुद्धा प्रसारित झाल्या. तिकडे पाकीस्तानचे विरोधी पक्षनेते युद्धजन्य परिस्थितीत आपण एक आहोत आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत असे विधान करीत होते आणि आपल्याकडील हे उपरोक्त लोक पाकड्यांची री ओढीत होते, “से नो टू वॉर”, “युद्ध नको बुद्ध हवा“ सारखे हॅश टॅग फिरवीत होते.यांना अतिरेकी आपल्या लोकांना,जवानांना मारतात ते दिसत नाही ,यांना बुद्ध गरजेपुरता तेवढा हवा.बुद्धाची शिकवण, बुद्धाच्या आज्ञा हे लोक कितपत अनुसरतात कुणास ठाऊक. ती शिकवण त्यांना ठाऊक तरी आहे का ? तिकडे अभिनंदन शत्रूच्या तावडीत होता आणि इकडे आपल्या काही वृत्तवाहिन्या त्याचे घर, नांव अशी इत्यंभूत माहिती रंगवून-रंगवून सांगत होत्या. आपल्या देशात हे असे लोक आहेत म्हणूनच आपण मागे आहोत, जगात आपली नाचक्की होत असेल,हसे होत असेल. राष्ट्रीय आपत्तीत इतर देशात सर्व जनता, पक्ष सरकारच्या पाठीशी असतात.पाकिस्तानने सुद्धा तेच दाखवून दिले. भारतात मात्र अजब तऱ्हा आहे. इतिहासात सुद्धा हेच झाले आहे. संभाजी राजांची माहिती आपल्याच लोकांनी औरंग्यास दिली होती आणि ते पकडले गेले. त्यापूर्वी जयचंदने घोरीस आमंत्रित केले होते. यासारखे इतरही अनेक दाखले आहेत. यावेळी आपले लोक असेच पाकड्यांच्या बाजूने झुकतांना पाहून दु:ख झाले.त्याहून दु:ख झाले ते राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे.राज यांच्यावर महाराष्ट्रीय जनतेचे आजही प्रेम आहे परंतू त्यांच्याकडे काही कार्यक्रमच नसल्याने ते हल्ली गोंधळून गेल्यासारखे दिसत आहे. सरकार, मोदी यांच्यावर जरूर टीका करा .परंतू उचित प्रसंगी अटलजी जसे पक्षभेद विसरून कौतुक करीत त्याप्रमाणे कौतुक सुद्धा करायला हवे. सक्षम नेत्यास त्याने आणखी हुरूप येतो, शत्रूला एकता दिसते, जनतेला नेत्यांतील प्रगल्भता दिसते व जगाला देश मजबूत असल्याचे दिसून येते. देशातील युद्धजन्य परिस्थितीत या तथाकथित बुद्धीजीवींना, उपरोक्त नेत्यांना असे अजब वागतांना पाहून हे वागण बरं नव्हं ! हेच सांगावेसे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा