सदैव स्मरणीय कर्मवीर पर्रीकर
मनोहर पर्रीकर गेले. असंख्य भारतीयांच्या हृदयाचा
ठोका चुकला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने पिडीत
होते. खरे म्हंटले तर इतरांना ते पिडीत वाटत होते परंतू पर्रीकरांनी मात्र त्या भयंकर
आजाराची पिडा मानली नाही. विदेशात उपचार घेऊन आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
मुशीतून तयार झालेला हा हाडाचा कार्यकर्ता पुनश्च कामाला लागला. नाकात नळी घेऊन
राज्याच्या कार्यासाठी कधी विधान भवनात अर्थसंकल्प सादर करतांना , तर कधी पुलाची
पाहणी करतांना तर कधी गंभीर व्याधीने ग्रस्त असूनही सभेत उपस्थितांना “How is the
‘Josh’ ?” असा प्रश्न विचारतांना देशातील जनता या सच्च्या नेत्याला , कामसू मुख्यमंत्र्याला
अवाक होऊन पाहत होती. IIT मुंबई मधून अभियंता झाल्यावर राष्ट्रकार्यासाठी संघकार्य
अंगिकारलेले पर्रीकर पुढे भाजपा मध्ये प्रवेशित झाले.गोव्याचे मुख्यमंत्री सुद्धा
झाले. स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रज भारतातून हद्दपार झाले तसाच राजकारणातून
साधेपणा हद्दपारच झाला. ज्याप्रमाणे भारतातून पाकीस्तान वेगळा झाला त्याचप्रमाणे
राजकारणातून साधेपणा, प्रामाणिकपणा सुद्धा वेगळा झाला (लालबहादूर शास्त्री व इतर
काही तुरळक अपवाद वगळता) मनोहर पर्रीकर मात्र यास अपवाद ठरले. सरकारी बंगल्याचा
कार्यालय म्हणून वापर , खाजगी काम असेल तर स्वत:ची स्कूटर व शासकीय कार्य असेल तरच
सरकारी वाहन. विविध प्रसंगी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभ्या राहिलेल्या पर्रीकरांना
कित्येकांनी पाहिले आहे.बारा महिने तेरा त्रिकाळ हाफ शर्ट व पँट हाच पोशाख. त्यांच्या
मुलाच्या लग्नात आमंत्रित सुटा-बुटात मिरवत आले होते परंतू पर्रीकर मात्र आपले शर्ट
व पँट याच पोशाखात. त्यांच्या साधेपणाचे आणखी अनेक किस्से आहेत. साधे ग्रामपंचायत सदस्य,
जि.प. सदस्य,न.प. सदस्य म्हणून निवडून आले तरी या सदस्यांचा केवढा बडेजाव असतो. गाड्या
काय, त्यावर पदनाम काय . पर्रीकर मात्र साध्या स्कूटर तर कधी इनोव्हा गाडीत फिरत.
विमान असले तर इकॉनामी क्लासने प्रवास , दिल्लीतील वातावरण थंड असूनही त्यांचा पहराव
मात्र साधाच. उगीच नेता म्हटले की ते जॅकीट, कुर्ता- पायजामा असा दिखावा करण्याची त्यांना
कधी गरज नाही पडली .संरक्षण मंत्री म्हणून अल्प काळातही पर्रीकरांनी आपला ठसा उमटवला.
मग ते लष्कराची अत्याधुनिकता असो, सर्जिकल स्ट्राईक असो की वन रँक वन पेन्शन.
पर्रीकरांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी म्हणून राहुल गांधी गेले परंतू कुणाच्या
आजारपणाच्या भेटीचा सुद्धा गालिच्छ राजकारणासाठी
कसा उपयोग करायचा हे राहुल गांधींनी दाखवून दिले. परंतू चणाक्ष जनतेला राहुल गांधींचा
हा कावा लक्षात आला. गंभीर आजार असूनही रजा न घेता कर्तव्यतत्पर राहून मनोहर पर्रीकरांनी
जनतेला व नेत्यांना मोठी प्रेरणा दिली आहे. सतत कार्यशील राहणारे अगदी गंभीर आजाराने
ग्रासले असले तरीही हार न मानणारे पर्रीकर खरे कर्मवीर आहे. ते जनतेच्या सदैव स्मरणात
राहील. जनता , राजकारणी , नवीन पिढीतील नेते यांनी पर्रीकरांचा आदर्श बाळगला तर हा
देश अल्पावधीत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही.
“कर्त्यव्याच्या पुण्यापथावर
मोहांच्या फुलबागा, मोही फसता मुकशील वीरा मुक्तिच्या वाटा ,
कर्तव्याने घडतो माणूस ,
जाणून पुरुषार्था“
श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला हा उपदेश
या गीतांच्या ओळीत व्यक्त होतो या ओळींप्रमाणेच मनोहर पर्रीकर मोहांच्या फुलबागांत
फसले नाही व कर्तव्याने ते घडले व अल्पायुषात पुरुषार्थ केला. यांमुळेच हे कर्मवीर
मनोहर पर्रीकर जनतेच्या सदैव स्मरणात राहतील.
खुप छान लिहिलय आपण स्व.कर्मविर पर्रिकारांबद्दल, कर्मविरच म्हटले पाहिजे ह्या महान व्यक्तिमत्वाला कारण त्यांनी त्यांच्या जीवनात कर्मालाच प्राधान्य दिलं आहे ,ज्या शब्दात आपण हा लेख लिहिला आहे खरोखरच वाचणाऱ्यांच्या मनात अगदी त्यांच्याविषयी आदर भावना व प्रोत्साहन मिळते ....
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवाअटल बिहारी वाजपेयी, मनोहर पर्रीकर, आणि नितीनजी गडकरी हे माझे राजकारणातील आवडते नेते आहेत....
उत्तर द्याहटवा