१३/०४/२०१९

Irregular water supply problem in city


इस शहरमे हर शक्स परेशानसा क्यूं है ?
दहा दिवासांनंतर नळ येणार म्हणून सकाळीच 5.30 ला उठलो. परिसरातील नागरिकही उठलेच होते. नळ कधी येणार किती वाजता येणार याची काही निश्चिती नाही. वाट पाहिली परंतू पाणी काही आले नाही. मुख्य जलवाहिनीचा कॉक जवळच असल्याने नळाचे पाणी सोडणारा दिसतो का म्हणून निघालो. जातांना महिला , पुरुष चिंताग्रस्त मुद्रेने नळाची आतुरतेने वाट पहात असतांना दिसत होते. काही एकमेकांना विचारपूस करीत होते. मी सुद्धा एक-दोन गृहस्थांशी बोलत कॉक पर्यंत गेलो असता तिथे पाणी साचलेले दिसले. “अरे ! जलवाहिनी फुटली वाटते ! “मी स्वगतच पुटपुटलो व माघारी फिरलो. पुन्हा परेशान नागरिकांना जलवाहिनी फुटली असल्याचे दिसले हे सांगत, पाणी समस्येबाबत थोडाफार संवाद साधून परेशान झालेला मी घरी पोहोचलो. मनात पाणी समस्ये बाबतचे नाना विचार घेऊन. आज रामनवमी समस्त भारतवासीयांच्या हृदयात विराजमान असलेल्या रामाचा जन्मदिवस आणि कित्येक नागरिकांच्या घरात आज पाणी नाही या विचारामुळे दु:ख झाले. शहरात रस्त्यांचे काम सुरु असल्याने जलवाहिनी फुटू शकते याकडे कुणाचे लक्ष असते की नाही? जेंव्हा रस्त्याचे काम सुरु असते तेंव्हा पाणी पुरवठा संबंधीत कर्मचारी तेथे हजर राहतात की नाही हे काही माहित नाही. परंतू त्यांनी जातीने हजर राहून जलवाहिनीची काळजी घेणे आवश्यक नाही का ? जलवाहिनी फुटल्यास त्वरीत दुरुस्त सुद्धा केल्या जात नाही. मजूर नाही, अमूक अडचण, तमूक अडचण सांगितली जाते. रस्त्याचे काम असो वा नसो नेहमी पाण्याच्या काही ना काही अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वर्षातून काही दिवस सुद्धा नियमित पाणी पुरवठा केल्या जाऊ शकत नाही? नळ येण्याची निश्चित वेळ ठरवल्या जाऊ शकत नाही? शहरातील विहिरीतून पाणी पुरवठ्याचे नियोजन होऊ शकत नाही काय ? रस्ते , पाणी , वीज, आरोग्य या सुविधांबाबत संबंधीत विभागांनी दक्ष असले पाहिजे. नागरिकांना मुलभूत सुविधाच जर का मिळत नसतील तर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा उपयोग तो काय?  नागरिक वर्षभर टँकर घेतच आहेत. पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करीतच आहेत. काही नागरिक वर्षभर “लिकेज” च्या ठिकाणांहून दुरून-दुरून पाणी आणतच आहेत. वर्षानुवर्षे हेच सुरु आहे. घरात पाणी नसेल तर किती तारांबळ होते हे जाणा, गृहिणींच्या समस्या जाणा, करा एखादे सर्वेक्षण. अधिकारी , लोकप्रतिनिधी यांनी नागरिकांच्या समस्या विचारण्यास सुद्धा वेळोवेळी गेले पाहिजेअशी काही अपवादात्मक उदाहरणे सुद्धा असावीत. गेली कित्येक वर्षे ज्ञानगंगा धरणातून पाणी पुरवठा होतो. परंतू भविष्यकाळाचा विचार करून एखादा प्रकल्प आणखी होऊ शकतो का ? यावर काही नियोजन आहे की नाही? खामगांव शहरात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक हातपंप नादुरुस्त होऊन पडले आहेत, त्याबाबत सांगूनही काही केले जात नाही.जनता पाण्यासाठी कासावीस आहे परंतू जनतेकडे साफ दुर्लक्ष होत आहे. खामगांव शहरात जवळपास सर्वच भागात नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले आहेत. ही समस्या जर अशीच राहेली तर आफ्रिकेतील केपटाऊनसारखी समस्या निर्माण होईल. लोक शहर सोडून जातील. एकेकाळी पाण्याने समृद्ध असलेले शहर आज भकास वाटते. नटराज गार्डन, जनुना तलाव बगीचा, राजीव गांधी उद्यान अतिक्रमणाने ग्रस्त व पूर्वीसारखे हिरवेगार दिसत नाही. एक गांधी बगीचा तेवढा थोडा बहुत रमणीय आहे. गेल्या काही वर्षात शहरातील लोक दिवस निघाला की चिंताग्रस्त दिसतात. त्यांच्या चे-यावर एक परेशानी असते. त्यांची ही चिंता ही परेशानी का आहे ? “इस शहरमे हर शक्स परेशानसा क्यूं है ?” असा प्रश्न पडतो व या प्रश्नाचे उत्तर शोधू गेल्यास त्यांच्या परेशानीचे कारण “पाणी” हेच आहे हे स्पष्ट होते. मेहेरबान प्रशासकीय अधिकारी , स्थानिक स्वराज्य संस्था यांना जर जनतेविषयी खरोखर आपुलकी असेल तर त्यांनी नागरिकांना भेटी दयाव्यात, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. निदान एवढे जरी केले तरी त्यांची परेशानी थोडी हलकी होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा