०१/०४/२०१९

Januna Lake dried this year , its very sorrowful for Khamgaon natives , article describe this


तलावाने डोळ्यात पाणी आणले 
     आठ दिवसांपूर्वी माध्यमांवर आपल्या होय आपल्याच जनुना तलावाची विदारक , दु:ख आवेग रोखता येणार नाही अशी चित्रे आणि चित्रफित झळकली. जनुना तलाव म्हणजे खामगांवकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. कित्येक वर्षे या तलावांनी खामगांवकरांची तहान भागवली. इंग्रज कालीन हा तलाव म्हणजे खामगांव शहराच्या वैभवाची साक्ष. “कॉटन सिटी” असलेल्या या शहरात अनेक विहिरी आणि जनुना तलाव यांमुळे वैभव व जल समृद्धी होती. परंतू इंग्रज गेले त्या नंतर हळू-हळू काळ बदलला , शहराची लोकसंख्या वाढली , दुरदृष्टीहीन राजकारण आले. प्रशासनाने खामगांव शहराची तहान भागवणा-या विहीरींकडे आणि अर्ध्या खामगांव शहराची तहान भागवेल अशा या जनुना तलावाकडे साफ दुर्लक्ष केले. अनेक विहिरी आज कचरा कुंड्या झाल्या आहेत. आणि आता जनुना तलाव कोरडा ठण 

पडला आहे. याला प्रशासनाकडे “तीव्र उन्हाळा” वगैरे अशी कारणे आहेतच. परंतू वर्षभर या तलावावर पोहायला म्हणून जाणारे आम्ही या तलावातून वाया जाणारे हजारो लिटर पाणी डोळ्यादेखत वाहून जातांना पहात होतो. या वाया जाणा-या पाण्या बाबत विचारणा केली तर “तलावात मोठा साठा  आहे त्यामुळे प्रेशर कमी होणे गरजेचे असते म्हणून हे पाणी सोडले जाते” असे सांगण्यात आले होते. लाखो लिटर पाणी वाया गेले. माझ्या लहानपणापासून म्हणजे गेल्या 40 वर्षात हा तलाव पहिल्यांदाच असा कोरडा ठण झालेला मी पहात आहे. त्यापूर्वी हा तलाव आटल्याचे जेष्ठ नागरिक सांगतात. कोरड्या तलावाची ती चित्रे पाहून सर्वांनाच अतीव वेदना झाल्या. अनेक मित्रांचे फोन आले. आमच्या शालेय जीवनात मोबाईल, टीव्ही असा विरंगुळा नव्हता त्यामुळे कित्येकदा तरी वाटेतल्या वडाच्या पारंब्याना लोंबकळत आम्ही जनुना तलाव गाठत असू. सुंदर रमणीय बगीचा, भव्य वृक्षांची दाट छाया, वन्य प्राणी पाहिले व तद्नंतर वन भोजन झाले की त्या तलावात आम्ही यथेच्छ डुंबत असू. कुणी नातेवाईक आले तर त्यांना सुद्धा शिल्पे असलेल्या भव्य प्रवेशव्दाराच्या या तलावाच्या बगीचात घेऊन जात असू. “पाणवठे जतन करावे, वने राखावी” असे सांगणा-या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आम्ही व आमचे सांप्रत कालीन लोकप्रतिनिधी मात्र शिवरायांचे काय अनुसरण करीत आहोत? जे आहे ते सुद्धा आपण गमावण्याच्या मागे लागलो आहोत. जनुना तलावाची आपण उपेक्षा केली त्याचे तळ आज उघडे झाले आहे. त्याच्या भिंतीवरील लोखंडी पाईप काढून नेणारे आम्ही, उद्या कदाचित इंग्रजांनी बांधलेल्या त्या भक्कम दगडी भिंतीच्या फाड्या सुद्धा काढून घेण्यास कमी करणार नाही. प्रशासन ढिम्म आहे . विना मुख्याधिका-याची ही आपली नगर परिषद निव्वळ इमारतीच्या दुष्टीने समृद्द दिसते. नळाला पाणी नाही, कचरा कुंड्या झालेल्या विहिरी, आणि आता शुष्क झालेला खामगांव शहरात जल समृद्धी असल्याचा एकमेव पुरावा असलेला जनुना तलाव या सर्वांमुळे खामगांवकरांच्या डोळ्यात पाणी आले आहे. माध्यमांवरील जनुना तलाव शुष्क झाल्याचे ते फोटो पाहून खामगांवकरच नव्हे तर मुळचे खामगांवचे परंतू आता चरितार्थासाठी देश विदेशात गेलेल्या अनेकांच्या संवेदनशील प्रतिक्रिया आल्या , दुरध्वनी आले. परंतू या आटलेल्या तलावाबाबत प्रशासनास काही वाटले की नाही. या आटलेल्या तलावाचे खोलीकरण करावे, नाम किंवा पाणी फाउंडेशन यांच्याशी संपर्क करून काही करता येईल का हे त्यांच्या मनात आले की नाही देव जाणे ? स्थानिक प्रशासन , खामगांवकर , सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी निरनिराळ्या प्रसंगी रॅल्या , मिरवणुका , प्रदर्शने करून आपली शक्ती दाखवण्यापेक्षा खामगांवच्या पाणी समस्येसाठी एकत्र येऊन भावी पिढीसाठी काहीतरी उपाययोजना करायला नको का ? नळाला पाणी येत नाही , मीटरचे नळ धूळ खात पडले आहे , ज्याच्याकडे पाहून “चला पाणी आहे” असा दिलासा  वाटत होता तो तलाव सुद्धा आता शुष्क झाला. खामगांवच्या नेत्यांनी या पाणी समस्येकडे जातीने लक्ष घालणे जरुरी आहे कारण पाणी समस्येमुळे नागरिकांच्या, गृहीणींच्या डोळ्यात आलेले पाणी भविष्यातील निवडणूकांत तुमच्या तोंडचे पाणी न पळववो.
ता.क.-हा लेख लिहून होतो न होतो तोच प्रश्नकाल या वर्तमानपत्रात "रोटरी क्लब लोकसहभातून जनुना तलावातील गाळ काढणार" ही गर्मीत थंडावा मिळावा तशी सुखावह बातमी वाचनात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा