०२/०५/२०१९

Naxal attack in Gadchiroli leaves 15 security personnel dead... article related to this news


नक्षल्यांचा कायमचा बिमोड करा                       
     काल गडचिरोली जंगलात भुसुरुंग लाऊन सीआरपीएफ जवानांची गाडी नक्षल्यांनी उडवली. 15 जवान शहीद झाले. किती जवान आपण गमावत आहोत. या नक्षल्यांचा कायमचा बंदोबस्त नाही का करता येणार ? आता गेल्या महीन्यात छत्तीसगड मध्ये सुद्धा याच पद्धतीने भाजपा आमदाराची गाडी उडवण्यात आली. या नक्षल्यांं जवळ ही स्फोटके , अत्याधुनिक शस्त्रास्त्रे येतात तरी कशी? आपल्या सुरक्षा यंत्रणा , गुप्तचर यंत्रणा यांना याचा सुगावा कसा लागत नाही ? सुगावा असल्यास त्या शस्त्र पुरवठादारांवर कारवाई करण्यास कुणी अटकाव अथवा दबाव आणते आहे का ? या सर्व बाबी स्पष्ट होणे जरूरी आहे. नक्षल्यांना शस्त्रे, स्फोटके या कामात मदत करणारे हुडकून काढणे जरूरी आहे. ते सापडले की त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची नितांत गरज आहे. यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करणे जरूरी असल्यास तसे करावे परंतू आपल्या जवानांचा हकनाक बळी जाता कामा नये.आपले जवान हे नक्षल्यांंपासून संरक्षण करण्यासाठी तैनातीवर जात असतात. ते नक्षल्यांवर प्रतिकारात्मक हल्ले करतात. नक्षली मात्र थेट हल्ले करतात. गतवर्षी 40 नक्षल्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता. यंदा गडचिरोली भागात चांगले मतदान सुद्धा झाले. यामुळे कदाचित कालचा हा हल्ला झाला असण्याचा कयास आहे. आपले काही तथाकथीत बुद्धीवादी, पत्रकार, वृत्तपत्रे जवान शहीद झाल्यावर मूग गिळून गप्प असतात मात्र नक्षली मारल्या गेले की यांना “धक्कादायक” वाटते.मानवाधिकाराची आठवण येते.  दिग्विजयसिंग सारखे अतिरेक्यांना सन्मानाने संबोधणारे नेते "निवडणूकीत नक्षलवाद्यांची मदत घेऊ" अशी विधाने सर्रास करणारे नेते आपल्या देशात आहेत ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. “नक्षलबारी” या पश्चिम बंगाल मधील एका खेड्याच्या नावावरून "नक्षल" व त्यावरून "नक्षलवाद" हा शब्द रुढ झाला. 1969 मधे माओवाद भारतात आला. चीन मधला नेता माओ त्याच्या विचारांची भारतात आज खरच गरज आहे का ? 60 च्या दशकात असेलही असे आपण गृहीत धरू. परंतू आता आहे का ? आपल्या देशात सुद्धा अनेक थोर नेते होऊन गेले परंतू त्यांच्या विचारांचे इतर देशात कुणी अनुसरण करते का ? मग आपण इतरांचे विचार दुस-याची हत्या करण्या इतपत का आत्मसात करावे? माओचे विचार आजच्या घडीला उपयुक्त आहेत का ?  त्याचे विचार अनुसरून आपण आपल्याच देशातील सरकारी यंत्रणे विरुद्ध यलगार पुकारून कुटुंबे उध्वस्त करणे हे योग्य आहे का? तुमच्या काही मागण्या असतील त्या आपल्याच देशातील नेत्यांच्या अहिंसा,सत्याग्रह यांसारख्या आंदोलनांद्वारे नाही का पूर्ण करता येणार ? यांवर विचार व्हावा तसेच ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या म्हणण्यानुसार प. बंगाल , छत्तीसगड , महाराष्ट्र , ओरीसा , बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश या भागात पसरलेल्या या नक्षली चळवळीवर एकाच वेळी हल्ला करून त्यांना जेरीस आपणायला हवे.  
सरकारने नक्षली व त्यांना पाठबळ देणारे शहरी नक्षली समर्थक या प्रश्नावर प्राथमिक तत्वावर लक्ष घालून त्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत जरूरी आहे. अजून किती जवान आपण गमावणार ? किती कुटुंबे उध्वस्त होऊ देणार ?     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा