२५/०७/२०१९

Article about social club works in Khamgaon

शहरासाठी “सिंहाचा” वाटा
         खामगांव शहर हे बुलडाणा जिल्ह्यातील मोठे शहर आहे. या शहरास मोठा सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसा लाभला आहे. पाचलेगांवकर महाराजांनी केलेला हिंदू संघटन यज्ञ ,त्यास वि. दा. सावरकर उपस्थित होते. मराठी साहित्य संम्मेलन येथे झाली आहेत, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे पदस्पर्श या भूमीला लाभले आहे. राष्ट्रीय शाळेत गेले की खामगांवी आलेल्या अनेक थोर नेत्यांची नांवे संस्थेच्या प्रवेशव्दारीच दिसून येतात. संस्थेत भेट देणा-या प्रत्येकाची नजर तो फलक खिळवून ठेवतो. स्वतंत्रता आंदोलनात सुद्धा येथील डॉ एकबोटे, डॉ पारसनीस, श्री झुनझुनवाला यांनी व त्यांच्या समवेत अनेक अन्य सहका-यांनी सहभाग नोंदवला. स्वातंत्रोत्तर काळात शहराने आपला हा सांस्कृतिक वारसा जपला, सामाजिक भान जपले. शहर हळू-हळू विस्तारले. अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्था उदयास आल्या. रोटरी क्लब , लायन्स क्लब स्थापन झाले. या क्लबने अनेक कार्यक्रमांचा वसा हाती घेतला. अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जाऊ लागले. कुठल्याही प्रकारच्या विकासात सरकारची जशी महत्वपूर्ण भूमिका असते तशीच ती सामाजिक संस्थांची सुद्धा असते. यानुसारच खामगांवात हे दोन्ही क्लब कार्यरत आहेत. यंदा जनुना तलाव आटला त्याची सफाई व गाळ काढण्याचे कार्य रोटरीने जन सहभागातून तडीस नेले.तलावातील गाळ कित्येक शेतक-यांच्या कामात आला. पावसाळ्यापूर्वी लायन्स क्लबने नाल्याची सफाई करून ठेवली व त्यातील निघालेल्या कच-याची योग्य विल्हेवाट लावली. फरशी नाल्याला पूर गेला परंतू क्लबने नुकत्याच केलेल्या सफाईमुळे कुठे पाणी साचल्याचे , नाल्याच्या लगतच्या घरात पाणी जाण्याचे , भिंत पडणे यांसारखी वृत्ते आली नाहीत.दोन्ही क्लबने
शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण केले. केवळ वृक्षारोपणच नव्हे तर त्यास वृक्ष संरक्षक लावले व त्या वृक्षांच्या संगोपनाकडे सुद्धा क्लबचे लक्ष असते हे मी स्वत: अनुभवले आहे. या दोन्ही क्लबने शहरासाठी हाती घेतलेल्या या वस्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सामाजिक जाणीव निर्माण होते आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर कार्य करणा-या या दोन्ही क्लबच्या खामगावच्या शाखांची दखल नक्कीच घेतली जाईल. यंदा चांगला पाउस झाला तर जनुना तलावाचा जलसाठा नक्कीच वाढेल. त्यानंतर खामगांव नगर परिषदेने या पाण्याचा वापर कसा करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोटरी,लायन्स या दोन्ही क्लब सोबतच शहरातील तरुणाई , मुक्तांगण तसेच इतरही सामाजिक संस्था त्यांच्या-त्यांच्या परीने सामाजिक भान जपत आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणे येथे शंक्य नाही. येथे जरी तो झाला नाही तरी खामगांवकर जनतेच्या मनात मात्र त्यांचे नांव राहील. स्वयंस्फुर्तीने एकत्र येऊन निर्माण झालेल्या शंभो-शंभो गृपने सुद्धा जनुना तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लावले. आपण ज्या शहरात राहतो ते शहर चांगले असावे, स्वच्छ असावे यासाठी नागरिकांमध्ये जी भावना रुजायला हवी ती रोटरी व लायन्स क्लब रुजवत आहे. भविष्यात हे शहर जलयुक्त, वृक्षसमृद्ध, हिरवेगार झाले तर यात Lions Share अर्थात सिंहाचा वाटा हा निश्चितच या सामाजिक संस्थांचा राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा