२०/०८/२०१९

Legendary music composer Khayyam passed away, article about his songs and works

“हमे आपसे भी जुदा कर चले.....” 

प्रतिभावंतांचे इहलोक सोडून जाणे मोठे वेदनादायी असते. कालचे  एक प्रतिभावान संगीतकार खय्याम यांचे जाणे संगीत रसिकांसाठी  असेच दुख:दायी होते. कैफी आझमी ,साहीर, मजरूह यांसारख्या प्रख्यात  गीतकारांच्या अवीट मधूर अशा गीतांना सर्वांगसुंदर चाली लावणारे खय्याम यांचे जाणे म्हणजे संगीत क्षेत्राची अपरीमित अशी हानी आहे. हिन्दी चित्रपटसृष्टीमुळे अनेक  प्रतिभावंतांना आपली प्रतिभा जगापुढे आणण्याची संधी मिळाली. प्रतिभेपुढे सर्वच नतमस्तक होतात. याची प्रचिती राष्ट्रपती कोविंद यांनी लता मंगेशकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली यावरून येते.  खय्याम सुद्धा तसेच प्रतिभावान. चित्रपटसृष्टीमुळे गीतकार , अभिनेते , संगीतकार इ. अनेक प्रतिभासंपन्न प्रकाशझोतात आले. 1950 ते 60 च्या काळात चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या संगीतकारांमध्ये खय्याम सुद्धा एक होते. मोहम्मद जहूर हाश्मी यांनी प्रख्यात शायर उमर खय्याम यांच्या नावातील खय्याम हे नांव धारण करून संगीत देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांची गती कासवाची होती. परंतू 50-60 च्या दशकात “वो सुबह कभी तो आयेगी”, “ ठहरीये होश मे आऊ” , “जीत ही लेंगे बाजी हम तूम” अशी त्यांची गीते गाजत होती परंतू बर्मनदा, “एस जे“ आदी संगीतकारांच्या मानाने त्यांची दौड धीमी होती. एका पेक्षा एक सरस अशी गाणी मात्र ते देत होते 70 च्या दशकात “मै पल दों पलका शायर हूं“ ,
“मोहोब्ब्त बडे काम की चीज है” , 80 च्या दशकात “ये मुलाकात एक बहाना है” ,“आंखोमे  हमने  आपके  सपने  सजाये” हलके-फुलके “गापुची गापुची  गम  गम” उमरावजान  मधील “दिल  चीज कया है” ,“इन  आंखोकी मस्ती”  ही  गीते  तर अजरामर  झाली  आहेत.  “चाँदनी रातमे एक बार तुम्हे देखा है” “आंखोमे हमने आपके सपने”,  नूरीतील गीतेरजिया सुलतान मधील “ऐ दिले नादान“ व त्यातील मुगलकालीन संगीत अप्रतिम,चीरस्मरणीय व श्रवणीय आहे. खय्याम यांचे वैशिष्टय म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेले काही सिनेमे जरी यशस्वी झाले नसले तरी खय्यामचे संगीत मात्र यशस्वीच राहीले आहे. गजलांच्या जवळपास जाणा-या परंतू तितक्याच शास्त्रीय संगीताचा आधार असलेल्या, हृदयाला भीडणा-या चाली लावणारे संगीतकार म्हणून त्यांची ख्याती होती. राजेश खन्नाने तर त्यांच्या संगीतावर खुश होऊन त्यांना कार भेट दिली होती असा किस्सा आहे.किशोरकुमार, लता मंगेशकर यांनी त्यांच्या संगीत निर्देशनात अनेक हीट गाणी दिली. खरे तर जुन्या पिढीतील हे सर्व आताच्या नवीन पिढीला काही माहीत सुद्धा नसेल परंतू चाळीसीतील किंवा त्यापेक्षा वडील मंडळींनी  जुनी गाणी ऐकली आहेत. या गीतांचा करीष्मा मात्र अद्याप कायम आहे. आज तसे संगीत नाही, नवीन पिढीतही अनेक गुणी कलावंत आहेत. परंतू लोकांची अभिरुची बदलली आहे. खय्याम यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मिळाला होता. त्यांनी संगीत क्षेत्रासाठी एक ट्रष्ट सुद्धा स्थापन केला व त्याला त्यांनी स्वकमाईतील मोठा वाटा देणगी म्हणून दिला आहे. जुन्या पिढीतील अनेक प्रतिभावंत आपल्यातून गेले काल खय्याम सुद्धा गेले त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकता-ऐकता “हमे आपसेभी जुदा कर चले.....” ही त्यांनीच संगीतबद्द केलेल्या गीतातील ओळ आठवत होती. 

२ टिप्पण्या: