०८/०८/२०१९

Sushma Swaraj changed bollywood as "Industry"


बॉलीवूडमधेही आणले “स्वराज”      
सोमवार दि. 5 ऑगष्ट रोजी जम्मू  काश्मीर चे 370 कलम हटवण्याची व लड्डाख वेगळा केंद्रशासित प्रदेश करण्याचे सर्व भारतीयांना सुखावणारे वृत्त आले. या वृत्ताचा आनंद साजरा करणे पूर्ण होत नाही तोच मंगळवारी रात्री भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाचे तमाम भारतीय जनतेला दुख:दायी असे दुसरे वृत्त आले. वयाच्या 25व्या वर्षी राजकारणात प्रवेश करणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक असलेल्या श्री हरदेव शर्मा यांच्या या कन्येने. आपल्या अमोघ वक्तृत्वाने, प्रामाणिकतेने , साध्या स्वभावाने , मातृ हृदयाने लवकरच सर्वांची मने जिंकली. 1977 मध्ये  हरियाणामध्ये मंत्रीपदावर पोहोचणा-या त्या सर्वात तरुण महिला मंत्री होत्या. त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री, केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात सूचना व प्रसारण मंत्री , 2009 मध्ये लोकसभा विरोधी पक्ष नेत्या. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री अशी त्यांची कारकीर्द. परराष्ट्र मंत्री असतांना अनेकांना स्वदेशात आणण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले. हमीद अन्सारी , “भारत की बेटी” गीता, व इतर अनेकांचा यात समावेश आहे. सुंदर, सुशील स्त्री असा आपल्या नावाचा अर्थ सार्थ करणा-या ठसठशीत कुंकू लावणा-या, निट–नेटकी साडी नेसणा-या, आपल्या साडीचा पदर जकेटच्या वरून व्यवस्थित घेणा-या सुहास्यवदना सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त आले आणि त्यांच्या बाबतची विस्तृत माहिती
माध्यमांवरून समोर आली. ज्या-ज्या पदावर त्या होत्या त्या-त्या पदावर कार्य करतांना आपल्या कार्यशैलीची छाप त्यांनी उमटवली. परराष्ट्र मंत्री असतांना अनेक अनिवासी भारतीय,पाकिस्तानच्या ताब्यात असलेले लोक,यांना स्वत: वैयक्तिक प्रयत्न करून सोडून आणले.पासपोर्टची प्रक्रिया किती सोपी केली.दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी असतांना सुद्धा त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.यातच आणखी एक कार्य म्हणजे सुषमा स्वराज अटलजींच्या काळात जेंव्हा माहिती व प्रसारण मंत्रीपदी होत्या तेंव्हा त्यांनी एक उल्लेखनीय असा निर्णय घेतला होता.या निर्णयामुळे बॉलीवूडला “इंडस्ट्री”चा दर्जा प्राप्त झाला.चित्रपट निर्माण करतांना भांडवलाची मोठी गरज असते.निर्माते हे भांडवल बाजारातून मोठ्या व्याजदराने मिळवत असत.या भांडवलासाठी मग बॉलीवूड मध्ये “अंडरवर्ल्ड” मधून पैसा येत असे.पैसा देत असल्यानेच मग कोणत्या कलाकाराला चित्रपटात घ्यायचे हे सांगणे,प्रसंगी जबरदस्तीने ,धमक्या देऊन निर्मात्यांना कलाकारांची निवड करण्यास भाग पाडले जात असे. तशी उदाहरणे समोर आली आहेत. या सर्व पार्श्वभूमीचा अभ्यास करून निर्मात्यांना बँकेतून सुलभरीत्या पैसा मिळाला पाहिजे जेणे करून अंडरवर्ल्ड चा पैसा चित्रपटांत येणार नाही किंवा त्यास आळा बसेल हे जाणून निर्मात्यांना बँकेतून पैसा सुलभ रीत्या मिळवण्याची त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली. सुषमा स्वराज यांच्या या निर्णयामुळे बॉलीवूडला इंडस्ट्रीचा दर्जा मिळाला शिवाय अंडरवर्ल्ड मधून येणा-या पैस्याला सुद्धा आळा बसला.यामुळेच चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकार सुषमा यांच्या निधनाने व्यथित आहेत. सुषमा स्वराज यांनी त्यांच्या अनेक निर्णयांमुळे भारतीय राजकारणावर आपली छाप सोडली आहे. त्यातीलच हा सुद्धा एक निर्णय होता. बॉलीवूडमध्ये येणा-या अंडरवर्ल्डच्या पैस्याला रोखून एकप्रकारे त्यांनी बॉलीवूड मध्ये “स्वराज” आणले.          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा