३१/१०/२०१९

A new research has found rising sea will sink Mumbai by 2050. Article describe about that,


ये बॉम्बे शहर हादसो का शहर है...
पूर्वाश्रमीच्या बॉम्बे म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई साठी सरकारने एखादी योजना तात्काळ राबवणे किंवा तसे अभियान त्वरीत हाती घेणे आता निकडीचे झाले आहे. मुंबई मध्ये नाना प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हजारो लोकांचे लोंढेच्या लोढे दररोज मुंबई मध्ये दाखल होत असतात. परिणामी एकट्या मुंबई शहराची लोकसंख्या ही एखाद्या छोट्या राज्याच्या लोकसंख्येच्या बरोबरीत आहे. प्रचंड प्रमाणात लोकसंख्या एकवटल्याने त्यांच्या राहण्याची , पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. तसेच सांडपाणी , झोपडपट्ट्या , डंपिंग ग्राउंड तेथे लागणा-या आगी , प्रदूषण , भूमाफिया व त्यांनी बेकायदेशीर निर्माण केलेली रहिवासी संकुले. समुद्र मागे हटवून बनवलेला मरीन ड्राइव्ह त्यामुळे पावसाळ्यात मुंबई मध्ये तुंबणारे पाणी , गटारात होणारे मृत्यू अशा कितीतरी समस्या आहेत. आताशा पालघर येथे वारंवार होत असणा-या जमीन हादरण्याच्या घटना ह्या समुद्र मागे हटवून त्यावर मानवाने केलेल्या अतिक्रमणाचाच परिणाम आहे. तरीही आता सरकार कोष्टल रोड करण्याच्या तयारीत आहेच . शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक समुद्राच्या प्रवाळ भागात निर्माण होत आहे. स्मारकास यत्किंचित विरोध नाही. परंतू कुठेतरी निसर्गाचा विचार सुद्धा केलाच पाहिजे. मुंबई व मुंबई शहराच्या समस्या आठवण्याचे कारण की , न्यू जर्सी , अमेरिकेतील क्लायमेट सेंटर या संस्थेनं एक शोधनिबंध सादर केला ज्यात एक धक्कादायक गोष्टी समोर आली आहे. या संस्थेच्या शोध निबंधात समुद्राची पातळी वाढत असल्याने 2050 पर्यंत जगातील काही महत्त्वाची शहरे समुद्राच्या पोटात जाण्याची शक्यता आहे. असे अनुमान काढले आहे. समुद्राच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्या करोडो लोकांना याचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. व्हिएतनाम , बँकॉक, शांघाय या आशियातील
आर्थिक केंद्र असलेल्या शहरांचा बहुतेक भाग 2050 पर्यंत समुद्राच्या पाण्यात असेल. भारताची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर सुद्धा समुद्राच्या पोटात जाण्याची भीती आहे. 7 बेटांचं शहर असलेल्या मुंबईतील  कुलाबा हे  भविष्यात विरारचा भाग होईल. म्हणजे विरार पर्यंतचा सर्व भाग समुद्र गिळंकृत करेल. त्यामुळे भविष्यात सुरक्षित अशी नवी शहरं वसवण्यावर भर द्यावा लागेल. परंतू या सर्व बाबतची तसेच देशातील इतरही समस्यांबाबत विचार करण्यास इथल्या राजकारण्यांना वेळ मिळेल तेंव्हा ना ! येथे राजकारणाचा विशेष काही अनुभव नसतांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा , त्यासाठी चढाओढ , एका पक्षाने काही केले तर त्यात दुसरा पक्ष आडवी टांग करतो , एकाच पुलाचे दोन-दोन , तीन –तीन वेळा उद्घाटन, एकमेकांबाबत शिवराळ भाषेत चिखलफेक , सत्तेची हाव पूर्ण करण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्याउड्या मारणे, निव्वळ आमची मुंबई आमची मुंबई करायचे आणि मुंबईसाठी प्रत्यक्षात करायचे मात्र काही नाही. या सर्व बाबींतून आपल्या राजकारण्यांना आपला देश , आपली शहरे त्यातील नागरिकांच्या समस्यांना फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे 2050 पर्यंत सुद्धा त्यांना वेळ मिळेल की नाही याची निश्चिती नाही. तेंव्हा नागरिकांनीच दक्षता घेणे जरुरी आहे. मुंबईचा मोह टाळून इतर शहरांत रोजगाराचे पर्याय शोधावे. 2050 चा विचार केला तर हे नैसर्गिक संकट आता केवळ 25-30 वर्षंच दूर आहे. त्यामुळे धोकादायक अशा शहरांमधील लोकांनी इतरत्र स्थलांतरीत होण्याकडे लक्ष द्यावे. सरकार वर विसंबून राहू नये. 
        1661 मध्ये सात वेग-वेगळी बेटे असलेले हे शहर ब्रिटनच्या राजकुमारासह आपल्या कन्येचा विवाह लावून देतांना पोर्तुगिज राजाने आंदण म्हणून भेट दिले होते. तद्नंतर इंग्रजांनी या शहराची सुंदर रचना केली. महानगरपालिका ,रेल्वे स्थानक सारख्या वास्तुशिल्पाचा नमुना असलेल्या इमारती बांधल्या. आपण मात्र हे शहर विद्रूप बनवले. त्या विद्रूपतेने येथे नेहमीच काही ना काही धोके अर्थात हाद्से होत असतात. त्यातच आता येत्या काळात हा समुद्रात बुडण्याचा “हादसा” मुंबई मधे येण्याची शक्यता आहे. व तो टळो ही मागणी ईश्वरा शिवाय करणार तरी कोणाला ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा