०९/११/२०१९

Article about Lake overflow... Power of Prayer...


जय बाबा बर्फानी ... तालाबमे भर दे पानी 


प्रार्थनेचे नाना प्रकार असतात. आपली मागणी आपल्या पंथानुसार असलेल्या परंपरेप्रमाणे लोक ईश्वराकडे करीत असतात. हिंदू , मुस्लिम , ख्रिश्चन, शीख, पारसी, बौद्ध , जैन सर्वांचे आप-आपले असे प्रार्थनेचे प्रकार आहेत. क्वचित प्रसंगी या प्रकारात कमी अधिक प्रमाणात आप-आपल्या सोयीनुसार बदल सुद्धा होत असतात. प्रार्थना सुद्धा बदलत असतात किंवा त्यांची नवीन रचना सुद्धा केली जाते , काव्ये केली जातात. ख-या मनाने प्रार्थना करणा-यास सुद्धा एखाद्या प्रसंगी प्रार्थनेच्या स्वरूपात एखादे काव्य , एखादी ओळ स्फुरते आणि मग तीच त्याची दैनंदिन प्रार्थना बनते. प्रार्थना , प्रार्थनेच्या त-हा , प्रार्थनेतील शक्ती , त्यातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा या सर्वाचे स्मरण मनात त्या दिवशी घोळू लागले जेंव्हा मी , माझे मित्रव्दय धनंजय टाले व रितेश काळे जनुना तलावावर पोहायला म्हणून गेलो. मे महिन्यात कोरड्या ठन्न तलावातून निराश मनाने पायी फिरतांना तलाव आता पुन्हा पूर्ण भरेल की नाही ? अशी शंका मनात आली होती. परंतू 31 ऑक्टोबरला जनुना तलावाच्या बागेत प्रेवेश केल्यावर डाव्या बाजू कडून सांडव्यातून पाणी वहातांना पाहिल्यावर अत्यानंद झाला. तलावाच्या भिंतीच्या पाय-यांकडे झपाझप पाऊले पडू लागली. तलावाच्या भिंतीवर गेलो आणि ज्यात आम्ही वर्षभर जल विहार करतो तो तलाव पुनश्च तुडूंब भरलेला पाहून मनी हर्ष दाटला आणि क्षणात आम्ही पोहण्यासाठी झेपावलो. रोटरी क्लबने गाळ काढल्यामुळे साठवण क्षमता वाढलेल्या
तलावातील नितळ , थंड पाण्याने आमचा सारा क्षीण , सारा थकवा घालवला. पाणी कापू लागलो. निम्मा तलाव केंव्हा कापल्या गेला काही समजले सुद्धा नाही. परत काठाकडे फिरलो.  तिथे बाराही महिने पोहणारे पनपालिया , प्रसाद सानंदा , भाटीया , सुभाषभाऊ सदावर्ते इ. आमचे मित्र सुद्धा पोहून पोहोचले होते. त्यांनी प्रार्थनेसाठी म्हणून आवाज दिला. त्यांच्या समवेत सूर्याला अर्घ्य दिले आणि तदनंतर लेखाच्या शीर्षकातील “जय बाबा बर्फानी तालाबमे भरदे पानी” या ओळी म्हटल्या. मला ही प्रार्थना ज्ञात होती. परंतू माझ्या मित्रव्दयांना मात्र त्या ओळी नवीन होत्या त्यामुळे त्यांनी त्या माझ्या कडून पुन्हा जाणून घेतल्या. तद्नंतर आमची प्रार्थना,प्रार्थनेतील शक्ती या विषयावर वर म्हटल्या प्रमाणे चर्चा झाली. ईश्वर, तो आहे किंवा नाही, नास्तिक-आस्तिक, ईश्वराकडे केलेली प्रार्थना सफल होते की नाही ? या बाबत बोलत आम्ही चालत आलो. शेवटी प्रार्थनेत शक्ती असल्याचे आम्हा तिघांचेही एकमत झाले. आपल्या जटेवर गंगेचा भार घेऊन नंतर त्या गंगा मातेच्या धारा धरतीवर सोडणा-या शंकराकडे, अमरनाथ बाबा अर्थात बाबा बर्फानी कडे ...तालाब में भरदे पानी अशी प्रार्थना तलावात वर्षभर पोहणारी आमची मित्र मंडळी करीत असतात. यंदाच्या कडक उन्हाळ्यात आटलेला हा जनुना तलाव पाण्याने तुडूंब भरलेला पाहून तलावातील पाण्याचा व्यक्तीश: आम्हा पोहणा-या मंडळींना पोहण्या व्यतिरिक्त काही फायदा नाही. खामगांवकरांना सुद्धा तलावातील पाण्याचा यत्किंचीतही फायदा होत नाही. तरीही आपले गांव जल समृद्ध असावे यासाठी जनुना तलाव सदैव पाण्याने भरलेला राहावा म्हणून ख-या मनाने ते करीत असलेली प्रार्थना ऐकून कुठेतरी प्रार्थनेत शक्ती असल्याचे आम्हाला वाटले. त्यामुळेच पुनश्च एकदा बाबा बर्फ़ानीचे त्याच प्रार्थनेत “जय बाबा बर्फानी तालाबमे भर दिया पानी“ असा बदल करून आभार मानले. यंदा पाऊस भरपूर झाला परंतू पाऊस होण्यामागे , जलसाठे पूर्ण भरण्यामागे कदाचित सर्वानी केलेली प्रार्थना सुद्धा असेल. व या नित्य प्रार्थनेची शक्तीने तुडूंब भरलेल्या तलावा पाहून त्यात जल विहाराचा आनंद घेऊन आनंदाने तृप्त मनाने आम्ही परतलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा