०५/१२/२०१९

Article about forming Government in Maharashtra by three political parties.


एक जगह जब जमा हो तीनो ....  
शेवटी महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार स्थापन 
झाले. स्थापने नंतर शिवसेनेने हिंदुत्व स्विकारले. काँग्रेसला अनेकवेळा सहकार्य केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 2004 मध्ये एका मुलाखतीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापन करणार का ? 
असा प्रश्न विचारला असता “मै दुकान बंद कर दुंगा” असे उत्तर दिले होते. त्यांना त्यांचीच शिवसेना भविष्यात याच पक्षांसह दुकान वाढवेल असे यत्किंचीतही वाटले नसेल. काहिही करून सत्ता स्थापन करायची विचारसरणी गेली चुलीत आता राजकारणात कदाचित असेच होत राहील. देवेन्द्र फडणवीस यांनी तीन चाकी रिक्षा चालवणे कठीण असते असे म्हटले तर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी "तीन तिघाडा काम बिगाडा" असे वक्तव्य केले होते. आणि खरेच अद्याप नवीन सरकारचे कामकाज सुरु होते न होते तोच नाराज्या , अवास्तव मागण्या , नोकर भरतीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून सुरु केलेले पोर्टल बंद करणे, विकासाच्या योजना पडताळणी सुरु करणे हे सर्व सुरु झाले आहे. काँग्रेसचे नितीन राऊत यांना सुरुवातीला जो बंगला दिला होता तो त्यांना आवडला नाही म्हणून ते नाराज झाले आणि आता त्यांना 
 दुसरा बंगला दिल्या गेला. मंत्रालयातील एका कार्यालयाला सुद्धा पद जाते या अंधश्रद्धेमुळे कुणाचीही पसंती नसते. मागण्यांच्या बाबतीत म्हणाल तर हुसेन दलवाई यांनी सनातन संस्थेवर बंदी घालावी तसेच मिलिंद एकबोटे, सर्वसंगपरीत्यागी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागण्या करून “शिवसेनेचे हिंदुत्व कालही होते , आजही आहे आणि उद्याही राहील” असे विधान सभागृहात करणा-या उद्धव ठाकरे यांच्यापुढे आता मोठा पेच निर्माण केला आहे. विकासाच्या योजना बंद करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दुरदृष्टीपूर्वक विचार करणे जरुरी आहे. आकस भावना, पूर्वग्रह न बाळगता विकास होणे सुद्धा जरुरीच आहे हे ध्यानात घेणे सुद्धा गरजेचे आहे. उपरोक्त मागण्या , नेत्यांच्या नाराजीला आता सरकार स्थापनेच्या प्रारंभीच्या काळातच सुरुवात झाली आहे. पुढे आणखी काय होते ? कुणास ठाऊक. अमर अकबर अँथनी या चित्रपटात तीन वेगवेगळ्या धर्मात वाढलेली एकाच आईची लहान भावंड मुले मोठेपणी एकत्र येतात आणि “अनहोनी को होनी करदे , होनी को अनहोनी..एक जगह जब जमा हो तीनो” याप्रमाणे तिघे बंधू खलनायकाला चारही मुंड्या चित करतात. तसेच भिन्न विचारसरणीचे शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेसाठी विचारसरणीला तिलांजली देऊन “एक जगह जमा” झाले आहेत. त्यांनी विकासाच्या सुरु असलेल्या योजनांच्या बाबतीत मात्र “अनहोनी को होनी” या पद्धतीने कार्य करावे “होनी को अनहोनी” होऊ देऊ नये हीच विकासाभिमुख , सुसंस्कृत महाराष्ट्राला अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा