१०/०२/२०२०

Article on the occasion of Valentine Day with memories of Vasu-Sapna's "Ek Duje Ke liye" Movie,

वासू - सपना 
     आता पन्नाशीच्या घरात असलेल्या सर्वांनाच वासू-सपना वाचताच 80 च्या दशकात झळकलेला कमल हासन व सुंदर रती अग्निहोत्री यांचा “एक दुजे के लिये” हा चित्रपट झरकन डोळ्यांसमोर तरळून गेला  असेल.  आम्ही त्यावेळी अगदीच शाळकरी. हायस्कूल मध्ये प्रवेशित झाल्यावर सिंधी गल्लीतून आमच्या शाळेच्या बाजूने विद्युत विभागाच्या कार्यालया समोरून येणारा जो रस्ता आहे त्या बाजूने वर्ग खोल्यांची मागील बाजू आहे. यातील एका वर्गाच्या मागच्या बाजूस “वासू-सपना” अशी काळ्या अक्षरात लिहिलेली नांवे आम्हाला दिसत. कारण बरेचदा तेथून येणे-जाणे होत असे. कोळशाने लिहिलेली ती नांवे त्या भिंतीवर कितीतरी वर्षे तशीच होती. अनेकांच्या हे स्मरणात असेल. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा तो प्रताप असावा. कारण त्यावेळी त्या वर्गांत कनिष्ठ महाविद्यालयाची मुले बसत. येता-जाता ती नांवे सहज दृष्टीस पडत. परंतू हे वासू-सपना काय आहे? ते का लिहिलेले आहे हे मात्र काही कळत नसे. पुढे कधी तरी “एक दुजे के लिये” हा गाजलेला, दु:खद प्रेमकथा असलेला चित्रपट पाहण्यात आला. त्यावेळी गोव्याच्या समुद्र किना-यावर चित्रित झालेल्या या चित्रपटात नायक-नायिकांनी आपली नांवे किना-यावरील एका मोठ्या शिळेवर लिहिलेली दाखवली आहेत. ते दृश्य दिसले आणि आमच्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेल्या त्या वासू-सपना नावांची लिंक लागली. 1981 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट खूप गाजला होता. स्वातंत्रोत्तर काळात झालेली भाषावार प्रांतरचना ही अनेक भारतीयांना रुचली नव्हती. भाषांमुळे राज्या-राज्यात तेढ निर्माण होईल असे अनेकांचे भाकीत होते. बेळगांव प्रश्न आजही सुटलेला नाही. इतरही काही राज्यात असे प्रश्न आहेतच. या प्रेमकथेला दिग्दर्शकाने याच भाषावादाची जोड दिली आहे. हिंदी भाषिक व तमिळ भाषिक कुटुंब गोव्यात एकमेकांचे शेजारी असतात. त्यांच्यात मतभेद असतात. त्यातच तमिळ भाषिक नायक “वासू” व हिंदी भाषिक नायिका “सपना” यांच्यात अनुराग निर्माण होतो. दोघांच्याही कुटुंबियांना हे पटत नाही. परंतू वासू-सपना मात्र ठाम असतात. प्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांना एक वर्ष विभक्त राहण्याची अट घातली जाते. या अटी मागे ती दोघे 
एका वर्षात प्रेम वगैरे सारं विसरून जातील हा हेतू असतो. अशा अटी वगैरै आताची शिघ्रकोपी पिढी स्विकारून प्रेमासाठी त्या पुर्ण करू शकतील का ? चित्रपटात वासू-सपना काही अपरीहार्य परीस्थितीत आत्महत्या करतात. त्यांच्या आत्महत्येचे कारण ते दोघेही अत्याचारामुळे मरणासन्न झालेले असतात हे असते, प्रेमातील अपयश नव्हे. हे येथे नमूद करणे जरूरी आहे कारण सद्यस्थितीत प्रेमात अपयश आल्याने काही विकृत कोणत्या थराला जात आहेत हे आपण पहातच आहोत.  
वासू-सपनाच्या एक दुजे के लिये या सुपरहिट चित्रपटाची प्रेमकथा ही अशी होती. “जिसने हमे मिलाया, जिसने जुदा किया उस वक्त, उस घडी, उस डगर को सलाम“ अशी लता व एस.पी बालसुब्रमण्यमच्या आवाजातील सुमधुर गीते आणि संगीत अद्याप रसिकांच्या स्मरणात आहे. उद्या "व्हॅलेंटाईन डे" वासू-सपनाचे स्मरण झाले. प्रत्येक पिढीत वासू-सपना असतातच. परंतू आता किती बदल झाला आहे. प्रेमासाठी, प्रेम सिद्ध करण्यासाठी परीक्षा देणारे वासू-सपना या पिढीत आहेत का ? प्रेमाला नकार दिला तर अ‍ॅसिड हल्ला करणारे, हिंगणघाटच्या विकेश नगराळे सारखे पेट्रोल टाकून जाळणारे विकृत तरूण, चाकू हल्ला करणारे यांचे प्रेम खरेच प्रेम आहे का ? जिच्याप्रती तुमच्या मनात हळुवार अनुरागाची भावना आहे तीच्यावर अ‍ॅसिड, पेट्रोल टाकले तरी कसे जाते ? “हमे प्यार निभाना आता है” अशा भारतासारख्या देशात प्रेम दिवस साजरा करण्यासाठी एखाद्या विशिष्ट दिवसाची गरज आहे का ? मीरा, राधाच्या देशातील आपल्या तरुणांना प्रेम काय हे कळलेच नाही का? आज मुलांना सुद्धा धडे देण्याची, संस्कारांची गरज आहे. प्रेम यशस्वी होत नसेल तर त्या प्रेमाला
वो अफसाना जिसे अंजाम तक
लाना ना हो मुमकिन , उसे एक
खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा
या वरील ओळींसारखी उदात्त प्रेमाची भावना आता जणू लोपच पावली. अ‍ॅसिड हल्ले करणा-या या तरुणांना त्यांच्या प्रेमाला “तू मेरी नही हो सकती तो किसी और की भी नही“ अशा शाहरुख टाईप प्रेमाला एक चांगला “खुबसुरत मोड” नाही का देता येणार का ? व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर तरुणांनी प्रेमाबाबत चिंतन करणे जरुरी आहे. प्रेम काय आहे तर “एक अहसास है ये रूह से मह्सुस करो” हे ध्यानात घ्यावे. प्रेमाच्या या जाणीवेला रूह अर्थात आत्म्यापासून जाणायला नको का ? प्रेमप्राप्ती करीता, ते ओरबाडून, हिसकावून घेण्याच्या विकृतीतून हल्ले करण्याऐवजी. प्रेमासाठी वासू-सपना सारखी परीक्षा द्यावी. जर प्रेमाला “अंजाम तक”  नेणे शक्य नसेल तर निदान त्याला “खुबसुरत मोड” तरी तरुणांनी द्यावा. हीच व्हॅलेंटाईन डे अनुषंगाने सदिच्छा.

1 टिप्पणी:

  1. Khar aahe jyavar aapan prem karato tyana dukhi kase karata hech kalat nahi aani khamgaon madhe vasu sapana kon hote he mala pan mahiti nahi sundar lekh

    उत्तर द्याहटवा