२९/०३/२०२०

Remembering Dr Kotnis, a Renown Doctor of India in 1940s who served for chinese and chinese soldiers

कोरोना, डॉक्टरांची अविरत सेवा आणि आठवण डॉ कोटणीसांची  
कोरोना Covid-19 या विषाणू निर्मितीमुळे जगभरातून चिनवर मोठ्या प्रमाणात  टीका होत आहे. 2017 मध्ये डोकलाम सीमेवर चीनने सैन्य आणले त्यावेळी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालावा असा सूर भारतात उमटला होता. Covid-19 मुळे सध्या तसाच सुर उमटू लागला आहे. चीनने आपली बाजारपेठ एवढी काबीज केली आहे की "किती वस्तू बहिष्कृत कराल असा लेख त्यावेळी लिहिला होता. 1949 मध्ये म्हणजे आपल्या नंतर दोन वर्षानी स्वतंत्र झालेल्या चीनने आपल्याला मागे टाकून उत्पादन क्षेत्रात गरुड झेप घेतली. सावरकर , सरदार पटेल यांनी चीनचा धोका ओळखला होता पटेलांनी तर नेहरूंना तसे पत्र सुद्धा दिले होते तरी हिंदी चीनी भाई भाई नारा पंडीत नेहरू देत राहिले आणि चीनने मात्र आपल्यावर आक्रमण केले. त्यानंतरही चीन कुरापती काढत आला व सतत कुरापती काढतच असतो. Covid-19 हा व्हायरस निर्माण करून तर चिनने संपूर्ण जगास वेठीस आणले. भारतात सुद्धा या विषाणूने बाधितांची संख्या वाढत आहे. मा पंतप्रधानांनी केलेल्या LockDown मुळे व जनतेला हात जोडून घरीच राहण्याच्या केलेल्या आवाहनामुळे कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आहे. देशातील डॉक्टर्स , नर्सेस, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी , पोलीस , प्रशासन सर्वच अविरत सेवा देत आहेत. अनेक लोक बरे होऊन त्यांची सुट्टी सुद्धा होत आहे. 
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी झुंज देत असलेल्या, अविरत सेवेत असलेल्या डॉक्टरांना पाहून आठवण झाली ती डॉ.कोटणीस यांची. डॉ व्दारकानाथ शांताराम कोटणीस एक विस्मृतीत गेलेले नांव. सोलापूर येथे 10 ऑक्टोबर 1910 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 1937 मध्ये जपानने चीनवर हल्ला केला त्यावेळी चीनी कम्युनिस्ट जनरल झु डे यांनी पंडीत नेहरू व सुभाषचंद्र बोस यांना काही डॉक्टर्स पाठवण्याची विनंती केली होती. 28 वर्षीय डॉ कोटणीस हे त्याकाळी वैद्यकीय निपुण म्हणून ओळखले जात असत. त्यामुळे ते चीनला रवाना झाले आणि चीनच्या कानाकोप-यात फिरून त्यांनी तेथील रुग्णांची जीवापाड सेवा केली.त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या क्यो क्विंगलन नावाच्या एका नर्सच्या प्रेमात ते पडले. विवाह केला. पुढे माओच्या आर्मीत रुजू झाले सैनिकांची सुश्रुषा केली.  प्रतिकूल हवामान, सतत कार्य, अपुरे अन्न पाणी , हे सारे त्यांच्या अंगाशी आले आणि 9 डिसेंबर 1942 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
चित्रपती व्ही. शांताराम  यांनी डॉ कोटणीस यांच्या जीवनावर आधारीत " डॉ कोटणीस की अमर कहानी" हा चित्रपट 1946 मध्ये निर्मित केला होता. 40च्या दशकातील हा चित्रपट काही पाहण्यात आला नाही परंतू कोटणीस यांचेबाबत त्या चित्रपटाबाबत वडीलांकडून ऐकले होते. चित्रपटाच्या कथेत प्लेगवर उपचार करण्यासाठी डॉ कोटणीस स्वत:वर प्रयोग करतात असे आहे. हा चित्रपट खूप गाजला व त्याला  सुवर्ण कमळ हा राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता.  
डॉ कोटणीस यांच्या मृत्यूनंतर चीनमध्ये मोठा शोक व्यक्त करण्यात आला होता. "सैन्यानं एक चांगला सहकारी आणि देशानं एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवण सदैव आपल्या मनात तेवत ठेवूया," असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी कोटणीसांना आदरांजली वाहताना काढले होते. चीनचे तत्कालीन पंतप्रधान भारत भेटीस आले असता त्यांनी कोटणीस यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. आजही चीनमध्ये डॉ. कोटणीस यांच्याबद्दल मोठी आदराची  भावना आहे. त्यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली. चीन व भारत या दोन्ही देशांत त्यांची स्मारके आहेत.दोन्ही देशांनी त्यांच्यावर टपाल तिकीट सुद्धा काढले होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी क्यो क्विंगलन यांचे डालियन या शहरात निधन झालं. वैद्यकीय शिक्षण घेत असताना वयाच्या 24 व्या वर्षी या दाम्पत्याच्या मुलाचा सुद्धा मृत्यू झाला.
डॉ कोटणीस यांची निस्वार्थ सेवा , त्याग , त्यांचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे शिवाय चीनने विषाणू निर्मिती करून छुपे जैविक युद्ध न करता व डॉ कोटणीस यांच्याप्रती केवळ दिखाऊ आदर सन्मान न दाखवता डॉ कोटणीसांच्या अंगी असलेली संवेदना, निस्वार्थ सेवावृत्ती याचा जागतिक शांतीसाठी अंगीकार करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा