३०/०४/२०२०

Actor Rishi Kapoor passes away at 67 after a long battle with Cancer, RIP Rishi

......हम परदेसी हो गये 
आज गुरुवार लेख लिहिण्याचा 

दिवस  म्हणून कालच एक लेख लिहून 

झाला  होता. परंतू आजच्या अचानक आलेल्या बातमी मुळे धक्का बसला आणि पुनश्च लिहायला बसलो. कारण ती बातमी सुद्धा तशी होतो. ऋषी कपूरच्या निधनाची.  आज सकाळी 10 च्या सुमारास मोबाईल हाती घेतला आणि ऋषी कपूरच्या निधनाचे वृत्त दिसले. काल इरफान गेला आणि आज ऋषी.  खरे तर हे अभिनेते आपले कुणी नसतात , काही नाते नसते परंतू त्यांच्या अभिनयामुळे , त्यांनी केलेल्या मनोरंजनामुळे त्यांच्याशी एक अनामिक नाते जुळते. अनेकवेळा मग त्यांच्या चुकीच्या गोष्टींकडे सुद्धा आपण डोळेझाक करतो . ऋषीला खरे तर सिनेमात यायला काही स्ट्रगल करावा लागला नाही. अभिनय रक्तातच होता. आजोबा पृथ्वीराज,वडील राज,काका शम्मी आणि शशी.  अशा अभिनेत्यांच्याच मांदियाळीत तो वाढला. तू कितने बरस का ? विचारल्यावर 17 बरस का” असे उत्तर देणारा तारुण्यात पदार्पण करणारा ऋषी वडीलांनी निर्माण केलेल्या बॉबी या सिनेमातून हिरो म्हणून आला आणि आपल्या मेहनतीने त्याने अनेक चित्रपट केले, त्यात चांगला अभिनय केला,नृत्ये, संगीत असे चित्रपटांच्या सर्वांगाचे ज्ञान असलेला हा अभिनेता लव्हर बॉय म्हणून प्रसिद्धीस आला. त्या काळात अनेक नवीन अभिनेत्रींचे लॉचिंग ऋषी कपूर सोबतच व्हायचे. अनेक हिट चित्रपट त्याच्या नावे असली,त्याची अनेक गाणी गाजली असली तरी राजेश खन्ना या त्याच्या समकालीन अभिनेत्यासमोर त्याची कारकीर्द थोडी झाकोळली गेली. त्याच्या काळात अमिताभ, धर्मेंद्र , राजेश खन्ना , असे एकाहून एक कलाकार तेजीत असतांनाही स्वत:चा ठसा त्याने उमटवला होता. त्याने घातलेले स्वेटर , कपडे
आकर्षक असायचे राजेश खन्ना प्रमाणेच अनेक तरुणी या चॉकलेट हिरोच्या फॅन होत्या. त्याच्या पत्नीसह नितू सिंग सोबत त्याची जोडी खुप गाजली. ऋषी कपूरच्या काळात आम्ही  अगदी शाळकरी होतो 

परंतू डफली वाले डफली बजा या सरगम चित्रपटातील गाण्यात डफली ऋषीच वाजवतो आहे असे वाटत होते. डफली वाजवण्याचा जो अभिनय त्याने केला तसा इतर कुण्याही अभिनेत्याला डफली वाजवतांनाचा अभिनय कधी करता आलाच नाही. ऋषी डफली वाजवायचा तर इतर अभिनेते त्या डफली वर निव्वळ हात , बोटे फिरवायचे. तसेच दर्देदिल दर्दे जिगर” या  कर्ज  चित्रपटातील गाण्यात prelude मधील व्हायोलीन वाजवण्याचा अभिनय सुद्धा त्याने खूपच सुंदर केला होता. चेहरा है या  चांद खिला है या सागर मधील गाण्याच्या आधी वाजवलेल्या गिटारबाबत सुद्धा तेच म्हणता येईल. या  सर्वातील अभिनय करतांना त्याला विशेष कष्ट घ्यावे लागले नाही. आपल्या संगीताच्या ज्ञानामुळे त्याला ते सहज शक्य झाले. त्याच्या गाजलेल्या चित्रपटांची व गाण्यांची यादी खूप मोठी आहे. सदैव हसमुख दिसणारा हा  अभिनेता कॅन्सरने ग्रस्त होईतो कार्यरत होता. जुन्या पिढीला तर ऋषी ज्ञात आहेच परंतू नवीन पिढीतील मुले सुद्धा ऋषीला चांगले ओळखतात. काळ कोणासाठी थांबत नाही , 25 मार्चला आपण सर्व लवकरच कोरोनातून मुक्त होऊ असे व्टीट करणारा ऋषी तो दिवस बघण्यासाठी न थांबता हम तो चले परदेस हम परदेसी हो गये  म्हणून आपल्यातून निघून गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा