२३/०४/२०२०

Two Sadhus Among Three Men Lynched To Death In Palghar, 110 People Arrested in Maharashtra. Article elaborate this incident

मारून टाकण्याचा अधिकार कोणी दिला ?
बायबल मध्ये एक कथा आहे. एका व्याभिचारी स्त्रीला  शस्त्रधारी जमाव पकडतो व तिला येशू ख्रिस्तांच्या पुढ्यात आणतो. व्याभिचारी स्त्रीला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा असल्याचे तो जमाव भगवान येशूला सांगतो. येशू यावर काय बोलतात हे त्यांना पाहायचे असते. तेंव्हा येशू उठून उभे राहतात व “ तुमच्या पैकी ज्याने कोणी एकही पाप केले नाही त्याने पहिला दगड या स्त्रीला मारावा” असे म्हणतात तेंव्हा जमाव एक-एक करून पांगतो व येशू त्या स्त्रीला पुन्हा पाप न करण्याचे सांगतात.
   पालघर जिल्ह्यात जमावाने निष्पाप साधूंना मारले या घटनेने येशूच्या कथेचे स्मरण करून दिले. बायबलच्या कथेतील त्या व्यभिचारी स्त्रीने तरी पाप केले होते. परंतू या साधूंनी असे काय महत्पाप केले की त्या जमावाने त्यांना मारून टाकावे ? 
परवा रात्री सोशल मिडीयावर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्या अंतर्गत येणा-या गडचिंचले या गावात दोन साधू व त्यांचा वाहनचालक यांना मारण्याचा व्हिडीओ पाहिला. वृत्त खरे आहे की नाही म्हणून त्वरीत मराठी वृत्तवाहिन्या लावून पाहिल्या कुठेही या बाबतचे वृत्त नव्हते. म्हणून मग हिंदी वृत्तवाहिनी लावली असता त्यावर मात्र या घटनेचे वृत्त प्रसारित करणे सुरु होते. 16 एप्रिल ला घडलेल्या त्या घटनेचे वृत्त मराठी वाहिन्यांवर का प्रसारित झाले नाही याचे आश्चर्य वाटले. त्या साधूंना मरेतो मारण्याची ती दृश्ये पाहून सर्वच हादरून गेले , पहाणा-यांचे मन हेलावून गेले. पूर्ण घटना मात्र काही कळत नव्हती. दुस-या दिवशी इ-पेपर मध्ये घटनेचा पूर्ण वृत्तांत आला. कुण्यातरी महंताच्या अंतिम यात्रेसाठी जात असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील 70 वर्षीय महंत कल्पवृक्षगिरी महाराज,35 वर्षीय सुशीलगिरी महाराज व त्यांचा वाहनचालक निलेश तेलगडे यांची गाडी वनविभागाच्या चौकीजवळ गावक-यांनी अडवली तेंव्हा वनविभागाने त्यांना कसेबसे सोडवले परंतू पोलीस आल्यावर सुमारे 200 लोकांच्या जमावाने त्या साधूंवर, पोलिसांवर हा प्राणघातक हल्ला केला.
ते साधू जीव वाचवण्यासाठी तळमळत होते,नि:शस्त्र होते, पोलिसांची मदत घेऊ पाहत  होते परंतू मोठ्या जमावाचा प्रतिकार ते करू  शकले नाही पोलीस सुद्धा हतबल झाले. जबर  मारहाणीमुळे ते दोघे साधू व वाहनचालक असे  तिघे प्राणास मुकले. लॉक डाऊन मध्ये ते साधू निघाले, त्यांनी रीतसर परवानगी घेतली की नाही, जमाव एवढा प्रक्षुब्ध का झाला ? त्या भागातील वातावरण,पोलिसांवर सुद्धा हल्ला करणे हे सर्व तपासांती समोर येईलच. काल याच प्रकरणाचे वृत्त आपल्या रिपब्लिक वाहिनीवर देणा-या अर्णब गोस्वामी यांच्या चालत्या गाडीचा काच फोडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा अज्ञात दुचाकीस्वारांनी प्रयत्न  केला. अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा आरोप कॉंग्रेस पक्ष व सोनिया गांधींवर केला आहे.  
वाधवानला महाबळेश्वरला जाण्याचे पत्र देणा-या, मारहाण करणारे मंत्री असलेल्या व दोन भिन्न विचारसरणीच्या पक्षांच्या कुबड्यांवर चालत असलेल्या व हिंदुत्व अजूनही सोडले नसल्याचे केविलवाणेपणे सांगणा-या मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जरी आरोपींवर गुन्हे नोंदवले असले तरी या हत्या-यांना पुढे काय शिक्षा होते ते पहावे लागेल परंतू या घटने नंतर मेणबत्ती गँग , पुरस्कार वापसी गँग, या देशात भीती वाटते असे म्हणणारे नसिरुद्दीन शहा , सौ अमीर खान , बाटला हाउस एन्काउंटर नंतर सोनिया गांधी रडल्या असे म्हणणारे सलमान खुर्शीद हे साधूंच्या हत्याकांडानंतर अद्यापही चूप का आहेत ? हे सर्व जरी चूप असले तरी यांची चुप्पी मात्र खूप काही सांगून जाणारी आहे. कबीर म्हणतो
जिन घर साधू ना पुजीये , घर की सेवा नाही
वे घर मरघट सारिखे , भूत बसे दिनमाही
येथे साधूंना पूजा , मान तर सोडाच त्यांचा जीवच घेण्यात आला. कबीरच्या दोह्यानुसार हे लोक तर भूतापेक्षाही भयंकर आहे. “संतास रक्षितो, शत्रू निखंदतो” अशा साधू संताना, फकीरांचे रक्षण करणा-या त्यांना नेहमी अभय देणा-या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे असे लोक ! या अशा भेकड नि:शस्त्रांवर , ते सुद्धा साधूंवर जमावाने हल्ला करणा-यांना म्हणावे हिम्मत असेल तर अतिरेक्यांवर हल्ले करा. या अशा जमावाने हल्ले करणा-यांची एवढी हिम्मत कशी होते , कोण आहे यांच्या मागे ? यांना कुणाला जीवानिशी मारून टाकण्याचा काय अधिकार ?   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा