२६/०६/२०२०

Article on Nepal-India border issue and what should be the future strategy of India

आता खमके व्हावे लागेलच
1920 लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर इंग्रजविरोधी लढ्याच्या पटलावर  महात्मा गांधींचा उदय झाला आणि राष्ट्रीय असंतोषाच्या जहाल आंदोलनांऐवजी स्वातंत्र्यासाठी शांतता , अहिंसा या मार्गाने इंग्रज विरोधी निदर्शने सुरु झाली मग  
“क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप:”
अर्थात   
अंत:करणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून हे परंतप (अर्जुन) ऊठ आणि युद्ध कर. अशी शिकवण गीतेतून अर्जुनाला देणा-या श्रीकृष्णाच्या या देशातील तत्कालीन नेते  शांत, मिळमिळीत झाले. शांतता-अलिप्तता करीत त्यांनी केलेल्या अनेक करारांमुळे आज POJK , अक्साई चीन ही परिस्थिती उद्भवली आहे. ती निस्तारण्याचे कशोशीचे प्रयत्न 370 कलाम रद्द करून , लडाखला केंद्रशासित करून , BRO च्या माध्यमातून सीमेलगत विकास करून, हेलीपॅड , विमानतळे तयार करून विद्यमान सरकार करीत आहेच. शांतता, अहिंसा , अलिप्तता हे धोरण साफ चुकीचेच होते हे सिद्ध करण्याचा मुळीच उद्देश नाही परंतू “अति सर्वत्र वर्ज्यते” हे सुद्धा तितकेच खरे आहे. आपल्या या शांततेच्या मार्गाचा स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा अतिरेक झाला. आपण कधी आक्रमक नव्हतो हे मान्य परंतू आपल्या शांततेच्या अतिरेकाने कुणीही येऊन आपल्याला टक्कर देणे सुरु केले. म्हणूनच मग स्वतंत्र झाल्याबरोबरच पाकीस्तानातून टोळ्यांनी आक्रमण केले, 1947, 1965, 1971, 1999 अशी चार वेळा कस्पटाप्रमाणे असणा-या पाकड्यांनी आपल्यावर आक्रमणे केली. अतिरेकी हल्ले तर सुरूच आहेत. विस्तारवादी चीनने तिबेट गिळंकृत केले , अक्साई चीन लाटले. मात्र आपल्याच देशातील तथाकथीत अति बुद्धीमान नेते जे पंतप्रधानांना दोष देत आहेत , डरपोक , सरेंडर (चुकीचे स्पेलिंग करून) अशा शब्दांनी हिणवत आहेत ते हे विसरले की त्यांच्याच पणजोबांच्या नेतृत्वाखाली “हिंदी चीनी भाई भाई” करीत बसलो आणि चीनने 1962 साली आपल्यावर आक्रमण केले पुढे 1967 या वर्षी सुद्धा युद्ध केले. 1962 मध्ये तर आपली काहीच तयारी नव्हती. “हिंदी चीनी भाई भाई” या चीन वरील फाजील विश्वासाने, तुटपुंजी युद्ध सामुग्री असलेल्या, जुनी शस्त्रे असलेल्या व रसद पुरत नसलेल्या आपल्या सैनिकांचा चीनच्या सैन्यासमोर निभाव लागला नाही व परिणामी आपला पराजय झाला. ज्याचे शल्य आजही भारतीयांच्या मनात आहे. पाकिस्तानची चार आक्रमणे , सततचे अतिरेकी हल्ले , चीनची दोन आक्रमणे, बांगलादेशी घुसखोर , रोहिंग्या घुसखोर या सगळ्यात भर म्हणून ज्या प्रभू रामचंद्रांना आपण सर्व मानतो , त्यांच्या सासर असलेल्या व पशुपतीनाथांचे निवास असलेल्या इवल्याश्या नेपाळने सुद्धा आपल्याशी वाद उकरून काढला आहे. नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारच्या पाठीशी चीनी कम्युनिस्ट सरकार आहे हे स्पष्ट आहे. 8 देशांच्या सिमा आपल्या देशाशी जुळलेल्या आहे त्यातील पाकिस्तान , चीन आणि आता नेपाळ यांच्यासह सीमावाद निर्माण झाला आहे. यांच्यासोबतचा वाद आपण कसा निस्तरतो यावर आता पुढील शेजा-यांशी आपले संबंध आधारीत आहेत. आपण यांना आज खमके राहून थोपवू शकलो तरच भविष्यात आपल्या सीमेला लगत ज्यांची सीमा आहे ते देश वचकून राहतील नाहीतर ते सुद्धा आपल्यावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्न करतील. या पार्श्वभूमीवर नेहमीच आपले शांततेचे, बचावात्मक धोरण उगाळत बसून चालणार नाही आपल्या पवित्र्याहून जगाला व आपल्या उपद्व्यापी शेजा-यांना आपल्याशी वाद उकरून काढण्याच्या आधी दहा वेळा विचार करावा लागेल असे आपणास खमके व्हावे लागेल आणि या कामात देशातील सर्वपक्षांना राष्ट्रीय विचाराने एकत्र यावे लागेल. जे पक्ष जे नेते राष्ट्र प्रथम हे मानणार नाही जनतेने त्यांना ओळखून त्यांना धडा शिकवावा तरच या देशाचा निभाव लागेल.

२५/०६/२०२०

Article about India′s ′Made in China′ boycott campaign after Sonam Wangchuk appeal- Part 2

ज्योत तेवतच ठेवावी लागेल (ड्रॅॅगनचा बॉयकॉट आवश्यकच भाग 2)
पारतंत्र्यातही आपण विदेशी मालाच्या होळ्या , बहिष्कार करीत होतो व आजही आपल्याला तेच करावे लागत आहे. स्वदेशी वस्तूंची निर्मिती, आत्मनिर्भर होणे, आपल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक दृष्टीकोन देणे हे आपल्यासाठी आवश्यकच आहे तेंव्हाच आपल्याला संपूर्णपणे चीनी वस्तूंचा बहिष्कार करणे शक्य होईल. हे मागील लेखात आपण पाहिले. चीन स्वत: सीमेवर रस्ते आदी बांधकाम करीत आहे परंतू तेच भारताने केले तर ते मात्र चीनला खपत नाही आणि म्हणूनच गलवान खो-यात चीनच्या सैनिकांनी खिळ्यांनी युक्त असलेल्या काठ्यांनी हल्ला केल्यामुळे आपले 20 जवान हुतात्मा झाले. अनेक जवान जायबंदी झाले. चीनच्या सैनिकांचे सुद्धा नुकसान झाले आहेच परंतू चीनने आकडा जाहीर केला नाही व तो करणार नाहीच. तरीही चीनचे सुद्धा 43 जवान मारले गेल्याचे सांगितले जाते. सैनिक झटापट व आपले जवान हुतात्मा झाल्यावर पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या आधीच डोकलामच्या वेळी चीनच्या दुतावासात गुपचूप जाऊन भेटणा-यांनी लगेचच अकलेचे तारे तोडणे सुरु केले. तसेच गत शनिवारी सर्व पक्षीय बैठक झाल्यावर त्यावर उहापोह सुरु झाला आहे. असो ! शिक्षणतज्ञ , अभ्यासक , विचारवंत सोनम वांगचुक यांच्या boycott made in China”  या अभियानाच्या आवाहनाचा दाखला घेऊन चीनच्या आपल्या जवानांवरील हल्ल्यामुळे चीनी वस्तूंच्या बहिष्काराचे व्यापक व दीर्घ अभियान राबवावे या आशयाचा मागील लेख होता. परंतू आपण पाहतो आपल्या देशात अनेकदा काही आंदोलने, मोहिमा राबविण्याचे आवाहन केले जाते. परंतू अल्पावधीतच ते आंदोलन किंवा ती मोहीम राबवण्याच्या, त्या आंदोलनाला किंवा मोहिमेला पूर्णत्वास नेण्यापुर्वीच जनतेचा जोम ओसरतो आणि ते आंदोलन किंवा ती मोहीम पुन्हा “जैसे थे” स्थितीत येऊन जाते. सद्यस्थितीत चीनमुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळे होत असलेल्या चीनी वस्तूंच्या बहिष्काराचे सुद्धा असे न होवो. राष्ट्रप्रेम हे क्षणीक नसावे, ते हृदयात सतत जागृत असावे त्यानुसार चीनी मालाच्या बहिष्काराचे हे आंदोलन एक दीर्घकालीन आंदोलन झाले पाहिजे. मुकेश अंबानी यांनी सुद्धा जियो या त्यांच्या कंपनी मध्ये चीनी साहित्य न वापरत असल्याचे ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच जगजाहीर केले आहे. जेंव्हा सोनम वांगचुक , मुकेश अंबानी यांसारखे जगमान्यता असलेले लोक भारतीयांना आवाहन करतात तेंव्हा आपण त्यांचे आपआपल्यापरिने अनुसरण करायलाच हवे. तसेच चीनमध्ये नेहमीच व्हायरस निर्माण होत आले आहेत. कोरोना या व्हायरसचे सुद्धा काही “व्हर्जन्स” आहेत शिवाय चीन भविष्यात सुद्धा इतर व्हायरस निर्माण करेलच. चीनी वस्तू आपण किंवा इतर कुण्या देशाने आयात केल्या व दुर्दैवाने चीन निर्मित एखाद्या “Grounded Virus” ने त्या वस्तूसह शिरकाव केला तर ते आपल्याला किंवा आयतकर्त्या देशाच्या चांगलेच अंगलट येऊ शकते. पुन्हा कोरोना सारख्या संकटात नेऊ शकते याचा सर्वानी विचार करणे आवश्यक आहे. चीनी वस्तूंच्या बहिष्काराच्या आंदोलनात जगातील इतर काही देश सुद्धा सहभागी झाले आहेत ही भारताच्या जमेची बाजू म्हणावी लागेल. जर ही बहिष्कार मोहीम काही वर्षापर्यंत सुरु राहिली तर यथावकाश चीनी साहित्य आपल्या बाजारपेठेतून हद्दपार होऊन आपले स्वनिर्मित, स्वदेशी साहित्य विक्रीस वेग मिळेल किंवा तो मिळावा. चीनी वस्तूंच्या बहिष्कारानंतर त्याला पर्याय हा आपल्या जवळ असायलाच पाहिजे. आपल्या लोकांनी रोजगार उभे केले , स्वदेशी उत्पादन वाढवले तर कामगारांना , छोट्या कारागिरांना नवीन कार्य करण्यास उत्साह निर्माण होईल. नवीन रोजगार निर्मिती सुद्धा होईल व भारत ख-या अर्थाने “आत्मनिर्भर” होईल. जरी चीनी हे आपल्या तुलनेत अधिक कामसू आहेत किंवा त्यांचे सरकार त्यांच्या कडून काम करवून घेते , तेथे कामगारांना अधिकार नाही , मानवाधिकाराची वानवा आहे. यांसारख्या काही बाबींमुळे त्यांची उत्पादन क्षमता जास्त आहे. आपल्या देशात तसे नाही परंतू आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी व चीनला निष्प्रभ करण्यासाठी आपल्या जवळ त्यांच्या वस्तूंचा बहिष्कार हाच सर्वात सोयीस्कर उपाय आहे व तसे अनेक तज्ञांचे सुद्धा मत आहे. त्यामुळे चीनी वस्तूंच्या बहिष्काराची जी आता ज्योत पेटली आहे ती आपल्याला तेवतच ठेवावी लागणार आहे. त्या ज्योतीला तेवत ठेवण्यासाठी तिला प्रखर राष्ट्रप्रेमाचे तेल घालावे लागेल.
क्रमश:

१६/०६/२०२०

Article on suicide of an actor Sushant Rajput

जीवनसे ना हार जीनेवाले

जीवनाची क्षणभंगूरता , मृत्यू , अविनाशी आत्मा , यश , अपयश , नैराश्य , जीवन नकोसे होणे. यांसारख्या अनेक शब्दांनी सुशांत राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर डोक्यात धुमाकूळ घातला आहे. आत्महत्या करणा-याची अशी काय मनस्थिती होत असावी की त्याला हे जीवन संपवून टाकावेसे वाटते. अपयश आल्यावर आत्महत्या हा सर्वात सोपा असा उपाय का वाटतो. सुशांत तर तितका अपयशी सुद्धा नव्हता. परवा टीव्ही वर कार्टून पाहू दिले नाही म्हणून एका लहान मुलानी आत्महत्या केली. आत्महत्येची अशी वृत्ते अधून-मधून ऐकू येतच असतात.काही महाभाग तर स्वत: आत्महत्या करतातच शिवाय सोबत कुटुंबियांना सुद्धा मारतात. परंतू ज्या चित्रपटसृष्टीत पैसा आहे, प्रसिद्धी आहे, ग्लॅमर आहे त्या चित्रपटसृष्टीतील अभिनेता जेंव्हा आत्महत्या करतो तेंव्हा मात्र हा पैसा,ही प्रसिद्धी,हे ग्लॅमर हे सर्व आभासी आहे का? दिखाऊ आहे का ? असा प्रश्न पडतो.बिहार मधला एक युवक इंजिनियर बनतो , खगोलशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा मनी बाळगतो ,टीव्ही मालिकेत यश प्राप्त झाल्यावर चित्रपटसृष्टीत पाय रोवू पाहतो आणि एक दिवस आत्महत्या करतो. हे सर्व चकीत करणारे आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेल्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा सर्वसामान्यांना जरी वरकरणी काही दु:ख, नैराश्य दिसत नसले तरी ते असते. परंतू ”जगी सर्व सुखी कोण आहे ?”. तरीही चित्रपट कलावंतांचे जीवन मात्र अनेक घडामोडींनी, मानसिक ताण तणावांनी युक्त असते. कोरोना लॉकडाऊन मुळे अनेक कलाकारांची मानसिक स्थिती ढासळली असण्याची दाट शक्यता आहे. कारण नेहमी पार्ट्या आणि व्यस्त राहणारे हे कलावंत एकाकी होऊन बसले आहेत. हे एकाकीपण अनेकांना नक्कीच खायला उठले असेल. नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहणारे
काही चित्रपट कलाकार प्रसिद्धी पचवतात, तर प्रसिद्धी काहींच्या डोक्यात घुसते. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले काही कलावंत प्रसिद्धी ओसरल्यावर आलेले एकाकीपण सुद्धा पचवतात. परंतू हे सर्वांनाच शक्य नसते. म्हणून मग कुणी मद्याचा आश्रय घेते,कुणी संजय दत्त सारखे अंमली पदार्थांच्या आहारी जाते, कुणी परवीन बाबी,राजकिरण सारखे मानसिक रुग्ण बनते. सुशांतला सुद्धा डिप्रेशनच्या गोळ्या सुरु असल्याचे बोलले जाते.अपयश,नैराश्य हे किंवा शेखर कपूर व कंगना राणावत यांच्या म्हणण्यानुसार सहकलाकारांनी दिलेली वागणूक हे सुद्धा सुशांतच्या आत्महत्येचे कारण असल्याची चर्चा आहे. दबंग या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तर थेट खानावळीं पैकी काहींवर फेसबुक पोस्ट करून टीका केली आहे. सुशांत चांगला वाचक होता, खगोलशास्त्रात त्याला रुची होती त्यामुळे त्याच्या घरी मोठा टेलिस्कोप सुद्धा होता, चंद्रावर भूखंड घेतल्याची सुद्धा पोस्ट त्याने केली होती,नासाच्या अवकाश मोहिमेत सुद्धा सहभागी होण्याची त्याची मनिषा होता. अशी पार्श्वभूमी असल्यावर आत्महत्या करून त्याने जीवन का संपवले ? हा प्रश्न पडतो. आत्महत्या करणे पाप असते हे आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितले जाते. आत्महत्या करणा-याची मानसिक स्थिती काय असते यावर संशोधन सुरुच आहे. सुशांत राजपूत याला युवक, युवती “हिरो” मानत होते परंतू त्याच्या ही कृती मात्र “हिरो” या त्याच्या प्रतिमेस छेद देणारी ठरली. समाजातील यशाच्या शिखरावर असणा-या , आदर्श समजल्या जाणा-या , समाजाला आध्यात्मिक दिशा देणा-या व्यक्तींनी मात्र आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये हेच योग्य आहे. मागे भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येने सुद्धा जनमानसाला मोठा धक्का बसला होता.
या समाजात अनेक उपेक्षित , त्रस्त , अगदी ह्लाकीचे जीवन जगणारे लोक आहेत परंतू तरीही ते जगत आहेत. या जीवनात संकटे येतात त्याचा सामना करणे शिकले पाहिजे, सकारात्मक भावना विकसित करणे जरुरी आहे. जी चित्रपटसृष्टी सुशांतचे कार्यक्षेत्र होती त्या चित्रपटसृष्टीनेच नैराश्य कसे टाळावे , जीवन कसे जगावे यांसारख्या बाबी अनेक गीतातून , कथानकातून दिलेल्या आहेत मग ती जुनी “आदमी वो है जो खेला करे तुफानोसे“ , “गर्दिश मे हो तारे ना घबराना प्यारे” , “जीवनसे ना हार जीनेवाले” अशी गीते असोत, मृत्यू कर्करोगाच्या रूपाने घोंघावत असून आनंदी राहणारा “आनंद” किंवा अगदी काल-परवाचा संकटे आल्यावर “ऑल इज वेल” असा हृदयाला संदेश द्या सांगणारा 3 इडीयट हा चित्रपट असो. कितीतरी जन्मानंतर मानवी जन्म मिळतो असे आपली संस्कृती सांगते. या त्यामुळे या जन्माचा सदुपयोग करावा, जीवनातील संकटांना घाबरून, आपली हार झाली असे मानून, दु:खांमुळे आपल्या आप्तस्वकीयांना दु:खाच्या गर्तेत लोटून जीवनाचा अंत करू नये हे सर्वांनीच ध्यानात घ्यावे.             
जीवनसे ना हार जीनेवाले
हर गम को तू अपनाकर
दिल का दर्द छुपा कर
तू बढता चल, लहराकर
जीवन के सुख दुख बिसराकर

१२/०६/२०२०

Article about India′s ′Made in China′ boycott campaign after Sonam Wangchuk appeal. Part 1

ड्रॅॅगनचा बॉयकॉट आवश्यकच 
     शेवटी चीनने आगळीक केलीच. आपल्या सैनिकांवर हल्ला केल्यामुळे आपले 20 जवान हुतात्मा झाले. तत्पूर्वी शिक्षण क्षेत्रात सुधारणा करणा-या , पर्यावरण बचावासाठी झटणा-या  , तसेच पर्यावरणातील बदल आटोक्यात येण्यासाठी  सर्वांनी साध्या पद्धतीने जीवन जगले पाहिजे यासाठी “ilivessimply” या चळवळीत पुढाकार घेणा-या सोनम वांगचुक यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. चीनची अरेरावी, भारत-चीन सीमेवर सतत कुरापती काढणा-या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन या व्हिडीओच्या माध्यमातून वांगचुक यांनी केले आहे. चीन येन केन प्रकारेण आपले सम्राज्यवादी धोरण राबवत आहे, विविध देशांना कर्ज देऊन त्यांना आपल्या कानाखाली आणणे , नेपाळला चीनी भाषा शिकवण्याचे आवाहन करणे असले प्रताप चीन करीत आहे. भारतासह तैवान,जपान,व्हिएतनाम या देशांशी सुद्धा कुरापती काढतो आहे. हे करण्याचे कारण चीनची अंतर्गत परिस्थिती चांगली नाही. तिथे कामगारांना, जनतेला वेठबिगारी मजुराप्रमाणे वागवले जाते. मानवाधिकार वगैरे काही नाही. कोरोनामुळे चीनमध्ये अंतर्गत तणाव आहे त्यामुळे चीन सरकार बावचळलेले आहे. चीनला क्रांती होण्याची भिती आहे त्यामुळे युद्धस्थितीचा देखावा करून तेथील जनतेचे लक्ष वळवायचे हा सुद्धा चीनचा हेतू असावा. वांगचुक यांच्यामते चीनला शह देण्यासाठी भारतीय जनतेने “बुलेट पॉवर” पेक्षा “वॉलेट पॉवर” चा वापर करून चीनला वेसण घातली पाहिजे. “वॉलेट पॉवर” अर्थात भारतीयांनी चीनी वस्तूंवर आपले पैसे खर्च करणे टाळलेच पाहिजे. भारत चीन कडून 5.2 लाख करोड रुपयांची आयात करतो तर निर्यात मात्र 1.2 लाख करोड रुपयांची करतो.
चीन निर्मित अगदी क्षुल्लक वस्तू सुद्धा आपण खरेदी करतो. लायटिंग आदी शोभेच्या वस्तू आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. गणपती उत्सवात चिनी लायटिंग वापरली जाते. गणेश मंडळे खूप आहेत त्यांचे संघटन सुद्धा चांगले आहे. त्यांनी डेकोरेशनसाठी लागणा-या साहित्यासाठी चीनी वस्तूंचा वापर टाळावा. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे परंतु भविष्यात गणेश मंडळांनी हि भूमिका जरूर घ्यावी. चीनी वस्तूंवरच्या बहिष्काराबाबत बोलतांना "चीनी वस्तू विकणारे आपलेच भारतीय असतात , सरकारने आयात बंद करावी, चीनी वस्तू आपल्या वस्तूंपेक्षा खिशाला परवडणा-या असतात " अशी निरनिराळी मते व्यक्त होतील. परंतू प्रचंड पैसा आपण चीनी वस्तू खरेदी करून चीनला देतो आणि पुढे याच पैस्यांचा उपयोग चीन त्याच्या सैन्यासाठी करतो. याचा अर्थ यत्कदाचीत युद्ध झालेच तर चीनी वस्तू घेऊन चीनला गेलेले आपलेच पैसे आपल्याच सैनिकांना मारण्यासाठी वापरले जाऊ शकतात. सीमावाद किंवा युद्धजन्य अशी स्थिती निर्माण झाली की आपण निश्चिंतपणे झोप घेत असतो कारण सीमेवर सैनिक आहे हे आपणास ज्ञात असते. या आपल्या सैनिकांसाठीच आपल्याला “वॉलेट पॉवर”चा वापर आता करायचा आहे. म्हणूनच भारतीयांनी व अनिवासी भारतीयांनी boycott made in China” हे अभियान सुरु केले पाहिजे. हे अभियान जर व्यापक झाले म्हणजेच इतर देशांनी सुद्धा असे अभियान राबवले तर चीनवर दबाव निर्माण होईल आणि या अभियानाचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होईल. पारतंत्र्यात सर्वप्रथम सावरकरांनी परदेशी कापडाची होळी केली, महात्मा गांधीनी विदेशी वस्तूंच्या बहिष्काराची चळवळ व्यापक केली. महाराष्ट्रात बाबू गेनू सारख्या कोवळ्या मुलाने परदेशी कापड घेऊन जाणा-या ट्रक समोर आत्मबलिदान केले. आज चीनी वस्तूंचा बहिष्कार करणे जरुरी आहे आणि यासाठी पक्षभेद , मतभेद दूर सारून राष्ट्रहितासाठी सर्वानी एकत्र येऊन बहिष्काराचे हे अभियान अमलात आणणे या करिता महत्वाचे आहे कारण या अभियानाचे आवाहन सोनम वांगचुक यांच्या सारखा शिक्षण तज्ञ, पर्यावरण प्रेमी, ज्ञानी व्यक्ती करीत आहे की ज्याच्या कर्तृत्वावर 3 idiots सारखा चित्रपट निघाला होता व तरुणांनी तो पाहिला आहे.
     आज आपल्या देशातील युवक “टिक टॉक” या चीनी मोबाईल अॅपचा वापर जगात सर्वाधिक प्रमाणात करीत आहे. असे इतरही अनेक अॅप आहेत. चीनी हार्डवेअर आपण वापरतो. या सर्वाचा फायदा चीनला मोठ्या प्रमाणात होतो आहे. आपल्या देशातून मोठा फायदा करून घेणारा हा देश आपल्याशीच कुरापती काढत असतो त्यामुळे आम्हा भारतीयांना boycott made in China” हे अभियान राबवावेच लागेल. काल माध्यमांवर एक फार सुंदर संदेश फिरला की , एक व्यक्ती आपल्या बाहुलीसाठी रडणा-या मुलीसह दुकानात जातो, परंतू Made In China असे लिहिलेले पाहून तो घेतलेली बाहुली ठेऊन देतो. दुकानदाराने विचारल्यावर तो व्यक्ती म्हणतो ,"माझ्या मुलीचे तीन मिनिटांचे रडणे थांबवण्यासाठी मी आपल्या सैनिकांच्या मुलांना कायमचे रडवू शकत नाही" . हा संदेश काल्पनिक असेलही परंतू बरेच काही सांगून जाणारा आहे. आज आपल्या सर्वांकडे एक ना एक वस्तू Made In China आहेच. या वस्तूंचा हळू-हळू त्याग आपण सर्वानी करण्याचे ठरवूया व नवीन वस्तू घेतांना सुद्धा चीनी वस्तू वागळूया. हे आपल्याला शक्य आहे व आता करावेच लागेल.  
     वांगचुक यांच्या आवाहनास मोठा प्रतिसाद देऊन अनेकांनी चीनी अॅप , इतर सॉफ्टवेअर हे आपल्या मोबाईल व संगणकातून काढून टाकले आहेत. एका मोबाईल विक्रेत्याने चीनी मोबाईल विक्री बंद केली आहे. कदाचित या अशा अभियानाची चुणूक चीनला लागली असावी म्हणून चीनचे सैनिक पिछाडीस गेले होते खरे परंतू गलवान खोरे, सियाचीन कडे जाण्यास तयार झालेला रस्ता, विमानतळ याने चीनला धडकी भरली शिवाय चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोर या भागात भारत त्वरीत पोहचू शकतो , लक्ष देऊ शकतो व त्यामुळे परवा दोन्ही देशातील सैनिकांची झटापट होऊन आपले 20 जवान शहीद झाले. चीन मात्र भारतानेच त्यांच्या भूमीवर अतिक्रमण केल्याच्या उलट्या बोंबा मारत आहे. ड्रॅॅगनच्या दादागिरीला रोखण्यासाठी आपल्याला चीनी अॅप, चीनी हार्डवेअरचा सुद्धा क्रमाक्रमाने त्याग करावा लागणार आहे. परंतू हे करतांना आपणास आपल्या देशात अशाप्रकारचे अॅप, इतर सॉफ्टवेअर, हार्डवेअर कसे निर्माण करता येईल ,चीनी वस्तूंना पर्यायी इतर स्वदेशी वस्तूंचे उत्पादन कसे करता येईल याकडे लक्ष देणे जरुरी आहे. परवाच्या चकमकीमुळे दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. हीच वेळ आहे की आपल्या देशवासीयांनी आपल्या सैनिकांना पाठबळ देण्यासाठी आपआपल्या परिने चीनी वस्तूंचा त्वरीत त्याग करणे सुरु करावे.   
बॉयकॉटसाठी विकसित करावा लागेल औद्योगिक दृष्टीकोन       
     आज आपल्या देशात कित्येक अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत,शेकडो अभियंते दरवर्षी पदवीधर होतात. परंतू हे अभियांत्रिकी पदवीधर निर्मिती बाबत मात्र उदासीन असतात. किंबहुना त्यांना उद्योगपती, व्यवसायिक बनण्याचे कुणी बाळकडू पाजलेलेच नसते. गलेलट्ठ पगाराची नोकरी मिळाली, त्यातही विदेशात गेले की यांचे गंगेत घोडे न्हाले. अशी आपल्या देशातील तरुणांची मानसिकता असते. हे तरुण उद्योग व्यवसाय सुरु करण्याच्या ऐवजी नोकरीच्याच मागे लागतात आणि ज्या महाविद्यालयात हे शिकलेले असतात ती महाविद्यालये दरवर्षी वारेमाप शुल्क आकारून गब्बर होत असतात. हे चित्र कधी बदलणार ? आपणास स्वतंत्रता मिळून 70 हून अधिक वर्षे झाली आपण स्वतंत्र झालो परंतू अजूनही आपण निर्मिती क्षेत्रात विकसित देशांच्या तुलनेत बरेच मागे आहोत. आपण जिथे होतो तिथेच आहोत, पारतंत्र्यातही जनतेला विदेशी वस्तूंची होळी करण्यास सांगावे लागत होते आणि आजही आपल्या देशातील नागरिकांना boycott made in China” असे चीनी वस्तूंचा त्याग करण्याच्या अभियानाबाबत सांगावे लागते.  

०६/०६/२०२०

Anubhav Sinha gives challenge to people to kneel in front of minorities , article about this tweet


“अनुभवाचे” बोल
नाही ! शीर्षक वाचून गोंधळात पडू नका. हे अनुभवाचे बोल म्हणजे एखाद्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्यानंतर एखाद्या व्यक्तीस जो अनुभव येतो त्या व्यक्तीच्या अनुभवाचे बोल नसून हे अनुभवाचे बोल म्हणजे नेहमीच आपल्या अकलेचे तारे तोडणा-या चित्रपटसृष्टीतील अनुभव सिन्हा या लेखक , निर्माता , दिग्दर्शकाचे बोल आहेत. हा अनुभव सिन्हा म्हणजे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा पदवीधर. तुकडे-तुकडे गँग विचाराचा, हिंदू विरोधात हा गरळ ओकणारा. कुणी काही विचारले नाही तरी स्वत:च विवादास्पद बोलून सवंग प्रसिद्धी मिळवणारे अनेक कलाकार आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत आहे. या कलाकारांनी तोडलेले अकलेचे तारे पूर्वी सर्वानीच पाहिले आहेत व नेहमी पहात असतोच त्याचे इथे पुनश्च स्मरण करून देण्याची गरज नाही. याच आपल्या चित्रपटसृष्टीतील अनुभव सिन्हा हा सुद्धा परवा बरळलाच.
“ मैं हिंदुस्तानियों को challenge करता हूँ, एक तारीख़ तय करो और देश की minorities के सामने एक घुटने पे झुक के दिखाओ। करते हो #२अक्टूबर को? माफ़ी माँगते हैं इतने सालों की। Twitter FB से आगे निकलो।“
असे या अनुभव सिन्हाचे व्टीट आहे.
काय तर म्हणे, “हिंदूंस्थान्यांनी एका गुडघ्यावर झुकून (Courting) अल्पसंख्यांकांची माफी मागावी” या सिन्हाला आताच अशी उपरती का यावी ? तर याचे कारण आहे अमेरिकेत उसळलेला वर्णव्देश. तेथील लिबरल लोक कृष्णवर्णीयांची माफी मागत आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आपल्या देशात सतत होत असतेच. संगीत, कथानक , वेशभूषा इ ची शैली अगदी जशीच्या तशी आपल्या चित्रपटात (काही सन्मानीय अपवाद वगळता) कॉपी करणारी व तसे चित्रपट काढून गल्ला भरणारी आपली चित्रपटसृष्टी या अंधानुकरणात विशेष अग्रेसर आहे. तिकडे लिबरल लोकांनी माफी मागितली तर इकडे त्वरीत अनुभव सिन्हा यांनी त्यांचीच री ओढत अल्पसंख्यांकांच्या माफीचे टुमणे काढले. काही गरज? आणि का म्हणून माफी मागायची ? अल्पसंख्यांकांतील काहींमुळे या देशात आजही अराजकता आहे, पाकीस्तानचे झेंडे फडकतात, ज्या अल्पसंख्यांकांची माफी मागण्याचे तुम्ही म्हणता त्यांच्यातीलच शर्जील पूर्वेकडील राज्ये तोडण्याची भाषा करतो असे अनेक प्रश्न आहेत , देशांतील काही भांगात कोरोना काळात डॉक्टर , पोलिसांवर झालेले हल्ले आपण नुकतेच पाहिले, काश्मीर प्रश्न आहे असे आणखी कित्येक दाखले देता येतील.  अनुभव सिन्हा यासाठी माफी मागायची का ? अनुभव सिन्हा जरा इतिहास वाचा , सर्वच तत्कालीन इतिहासकारांनी, अगदी मुघल साम्राज्यातील इतिहासकारांनी सुद्धा काय लिहिले आहे ते वाचा , कशी लुट झाली , कसे धर्मांतरण झाले ? कसे अत्याचार झाले हे जरा वाचा हे वाचल्यावर कुणी माफी मागायची हे तुम्हाला कळेल आणि मग माफी मागण्याची भाषा करा. या देशात औरंगजेबासारखे शासक होऊन गेले की ज्याचे फर्मान सुद्धा गुडघे टेकून घ्यावे लागत असे. तुमचे गुढघे टेका असे आवाहन करणे हे याच पठडीतले वाटते आहे. परंतू ज्याच्या दरबारात कुणाची नजर वर करायची हिम्मत नसे त्याच औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांनी खडे बोल सुनावून दिले होते. हा देश त्या शिवाजी महाराजांचा आहे. गुढघे टेकणारा नव्हे. निव्वळ उचलली जिभ अन लावली टाळूला अशी वक्तव्य करून नवीन वादाला तोंड फोडू नका. इतिहासात जरा डोकावून पहा या देशात कशी आक्रमणे झाली कशी तोडफोड झाली, या देशाला कसे लुटले गेले हे जरा ज्ञात करून घ्या. अगदी काही वर्षांपूर्वी हिंदूंना कसे बेघर केले हे पहा असे बेघर झालेले हिंदू तुमच्या चित्रपटसृष्टीत सुद्धा आहेत त्यांच्याशी चर्चा करा. तसेच या देशात अल्पसंख्यांकांनी किती मोठ-मोठी पदे भूषवली आहेत ते सुद्धा जरा स्मरण करा. तुम्ही फिल्मवाले लॉकडाऊन मुळे सध्या रिकामे आहात, त्यामुळे तुमचे डोके ठिकाणावर नाही म्हणूनच काही बाही बरळत आहात. व्टीटर सारखे माध्यम हे चांगले विचार प्रसारीत करण्यासाठी आहे त्यावर चांगले बोला , चांगल्या पोष्ट करा. तुम्ही माफी बाबतची जी पोष्ट केली त्यावर तुम्हाला मिळालेल्या नेटक-यांच्या प्रतिक्रिया सुद्धा तपासा. तुमचे हे असे वक्तव्य ऐकून जरी तुमचे नांव अनुभव असले , तुम्हाला सिनेमाचा अनुभव असला तरी हा देश , या देशाचा इतिहास , येथील राजवटी या बाबत तुम्हाला अनुभव दिसत नाही. 

०३/०६/२०२०

An article about a pregnant wild elephant dies in Kerala after cracker filled pineapple explodes in her mouth.

हाथी मेरे साथी ? 
   मे महिना अखेरीस केरळ मध्ये एका गर्भार हत्तीणीची निर्घुण हत्या झाली.
1971 या वर्षी हाथी मेरे साथी हा चित्रपट झळकला होता. हत्तींच्या सहवासात वाढलेल्या नायकाच्या हत्तीचे प्राण खलनायक घेतो.  आपल्या प्रिय हत्तीचा जीव घेतलेला पाहून  प्रसंगाला अनुसरून करूण रसाने ओतप्रोत भरलेले “नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनियामे खुश रहना मेरे यार” हे गीत नायक गातो. जरी चित्रपट असला , काल्पनिक कथा असली तरी प्राण्यांचे व मानवाचे नाते , सहजीवन या चित्रपटात फार छान दाखवले आहे. तसेच प्राणीमात्रांवर प्रेम करावे , प्राणी इमानदार असतात असा संदेश देणारा हा सिनेमा होता. हा चित्रपट , हे गीत आज प्रकर्षाने आठवत आहे याचे कारण म्हणजे केरळ मध्ये झालेली एका हत्तीणीची निर्घुण हत्या. कुण्यातरी कृरकर्म्या नराधमाने अननसात फटाके टाकून या जंगली हत्तीणीची हत्या केली. अननसातील फटाके फुटल्याने तिचा जबडा गंभीर क्षतीग्रस्त झाला. तिला खाणे कठीण झाले. 27 मे रोजी या हत्तीणीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात ती गर्भार असल्याचा निष्कर्ष निघाला आणि तिच्या मृत्यू बाबत आणखी हळहळ वाटली. तेथील वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी समाज माध्यमांवर जेंव्हा “माफ कर बहिणी” म्हणून पोष्ट शेअर केली तेंव्हा ही घटना प्रकाशझोतात आली. का करतो मानव असे? काय बिघडवले असेल त्या हत्तीणीने त्या  मारेक-
याचे , कदाचित काही नुकसान केले असेलही. परंतू त्याची ही शिक्षा ? एकाचवेळी त्या पाप्याने दोन जीव मारले. या हत्तीणीबाबतची माहिती मिळाल्यावर मोहन कृष्णन तिच्या शोधार्थ निघाले. तेंव्हा पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत ती  निश्चल उभी होती. आपल्या जबड्यातील फटाक्यांच्या विस्फोटाने झालेली लाहीलाही शमवण्यासाठी ती बिचारी नदीत उतरली होती. आपल्या पोटातील 18 ते 20 महिन्याच्या पिल्लाला वाचवण्याचा सुद्धा तिचा विचार असावा. त्यांनी तिला पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न केले परंतू ती आली नाही.  कदाचित त्या बिचारीला आपण आता मरणार हे ठाऊक झाले असावे. मोहन कृष्णन म्हणाले की, “फटाक्यांनी भरलेला अननस देणा-या मानवावर तिचा आता विश्वास नव्हता.” बाहेर न येऊन तिने तिच्यावर झालेल्या अन्यायाचा जणू निषेधच केला. जणू ती आता जलसमाधी घेणार होती. हे असे मुक्या प्राण्यांना मारून काय मिळवले असेल त्या मारेक-याने. त्या नराधमाचा शोध आता घेतल्या जात आहे. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. जंगली जनावरे , पाळीव जनावरे , पर्यावरण हे सगळे आपले सोबती आहेत हे अजूनही मानवाला कळत कसे नाही ? एखादे हरीण , एखादा बिबट्या शेतात/ गावात शिरल्यावर मानव किती ओरड करतो. परंतू जेंव्हा मानव अशाप्रकारे मुक्या जीवांचे हत्या करतो तेंव्हा सर्व चूप का असतात ? 
“ जब जानवर कोई इन्सान को मारे , कहते है दुनियामे वैहशी उसे सारे
एक जानवर की जान आज इन्सानोने ले ली है चूप क्युं है संसार “
या हाथी मेरे साथी चित्रपटातील गीताच्या उपरोक्त ओळी मानवी वृत्तीला चपखल बसतात. एका प्राण्याच्या मृत्यूवर काही तुरळक लोक बोलतीलही , तो नराधमही पकडला जाईल परंतू त्याला काय शिक्षा होईल ? साक्षी , पुरावे , यात कितीतरी वर्षे निघून जातील. काळवीट मारणारा सलमान नाही का मजेत ! परंतू हे असे थांबवावे लागेल मानवी हत्येच्या शिक्षेप्रमाणे या हत्तीणीच्या मारेक-याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण त्याने हत्तीणच नव्हे तिच्या पिल्लाचा सुद्धा जीव घेतला आहे. ज्या केरळ मध्ये हत्तींचा सन्मान केला जातो , अनेक मंदिरात तिथे हत्ती आहेत , या देशात हत्तीला गणपती म्हणून पाहिले जाते त्या देशात हत्तीणीची अशी हत्या झालेली पाहून सर्व सुन्न झाले आहेत आणि खरच आपण हत्तींना “हाथी मेरे साथी” मानतो का ? असा प्रश्न पडला आहे.