०१/०७/२०२०

Article about India′s ′Made in China′ boycott campaign after Sonam Wangchuk appeal- Part 3

लाल चीन्यांनो खबरदार 
(ड्रॅगनचा बॉयकॉट आवश्यकच भाग 3)
मागील भागापासून पुढे ....
प्रखर राष्ट्रप्रेमाचे तेल घालत राहून चीनच्या जवानांशी झालेल्या झटापटीत 20 जवानांच्या हौतात्म्यामुळे  चीनी वस्तूंच्या बहिष्काराची ही जी ज्योत पेटली आहे ती आपल्याला तेवतच ठेवावी लागणार आहे. चीन हा कसा धोकादायक देश आहे याचा अंदाज आपल्या देशातील थोर नेते स्वातंत्र्यवीर सावरकर , सरदार पटेल यांनी ओळखला होता शिवाय एका जुन्या मराठी चित्रपटात सवाल-जवाब असलेल्या लावणीत राक्षस कुठे राहतात ? या प्रश्नाचे उत्तर नटी “चीन” असे देते. शिवाय सध्या माध्यमांवर 
"च्याऊ अन माऊ आपलेच भाऊ , जमिनीचा थोडासा भाग त्याला देऊ , आपसातला तंटा मिटवून घेऊ...आम्हाला म्हणतो मागे सारा ...डॉ कोटणीस दिला मराठ्यांनी जरा हाय काय त्याची लाज त्याला
लामा-लामातला वाद, तिबेट घशात घातला, नेफा असे सर्व मुद्दे दादांनी त्यात अगदी समर्पक घेतले आहेत. तसेच 
"लाल चीन्यांनो खबरदार...लाल चीन्यांनी मायभूमीवर आज घातला डाका हो....इथले त्यांचे हेर हेरुनी चारा त्यांना धुळखडे" अशा आशयपूर्ण ओळी असलेला दादा कोंडके यांचा चीनबाबतचा पोवाडा सुद्धा ‘व्हायरल’ होत आहे. मग प्रश्न हा आहे की देशातील थोर नेते , सिनेसृष्टीतील गीतकार अशा अनेकांना , तसेच सामान्यजनांना चीन हा धोकादायक देश आहे हे माहित असूनही चीन या विस्तारवादी देशापासून सावध पवित्रा स्वातंत्र्योत्तर काळात का घेतल्या गेला नाही ? चीनची सीमा आपल्या देशाला पूर्वी लागून नव्हती तिबेटवर अनधिकृतरित्या कब्जा मिळवून चीन आपल्याला येऊन भिडला. हाच चीन आता खुल्या आर्थिक धोरणामुळे आपली बाजारपेठ काबीज करून , आपल्या येथून मोठा नफा मिळवून आपल्याशीच वाद उकरून काढत आहे व सतत कुरापती काढतच असतो. आपल्या देशात कित्येक महान लोक , अभ्यासक , ज्ञानी , पंडीत , ऋषी-मुनी होऊन गेले. त्यांची शिकवण आपण विसरलो आर्य चाणक्य यांचे अर्थशास्त्र , राजनीती व त्यातील कुटनिती विसरलो. परंतू याच कुटनीतीचा वापर करून चीन मात्र ‘सुपर पॉवर’ बनण्याकडे  घोडदौड  करीत आहे. येन केन प्रकारेण प्रगत देशातून चीनने मोठी आर्थिक ताकद उभारली आहे. या अर्थसत्तेचा वापर स्वत:च्या देशातील नागरिकांसाठी न करता चीनने अनेक अप्रगत देशांना कर्ज देऊन त्यांना आपले मांडलिक केले आहे. नेपाळला चीनी भाषा शाळांतून शिकवा , चीनी संस्कृतीचा प्रसार करा असे आवाहन चीनने केले आहे. आपल्याशी सीमावाद उकरून काढत अरेरावी करणारा व पूर्वी हिंदू राष्ट्र बिरूद मिरवणारा नेपाळ आता ड्रॅगनच्या तोंडात गेला आहेच घशात जाण्यास वेळ लागणार नाही. श्रीलंकेतील बेट विकासाच्या नावावर ताब्यात घेत चीनने तिथे आपले सैनिक नेले. श्रीलंकेने चीनचा धोका ओळखून ते बेट भारताला सुपूर्द करण्याची तयारी दर्शवली होती. ते आपण घेऊ शकलो नाही. परंतू यावरून श्रीलंका सरकारचा चीनपेक्षा भारतावर अधिक विश्वास असल्याचे स्पष्ट झाले. कम्युनिझममुळे आम्ही प्रगत झालो असे दर्शवत अप्रगत देशांना कम्युनिझमकडे वळवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. परंतू चीनमध्ये कामगारांच्या श्रमाला मात्र काहीच किंमत नाही. तिथे मानवाधिकाराचा, माणुसकीचा जराही लवलेश नाही. अशा या “चायनीज व्हायरस” निर्मात्या चीनच्या वस्तूंचा आता समस्त भारतवासियांनी त्याग करायला हवाच. सरकारने 59 अॅपवर बंदी घातली आहे. तत्पूर्वी कित्येकांनी आपल्या मोबाईल मधून अॅप काढून टाकले होतेच. नितीन गडकरी यांनी सुद्धा रस्ते बांधणीतील चीन सोबतचे सर्व करार रद्द केले आहेत. BSNL, MTNL यांनी सुद्धा चीन सोबतचे करार रद्द केले आहे. चीन ने सुद्धा आपल्या ई-पेपर वर बंदी आणली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की राखी , फ्रेन्डशिप बँड यांसारख्या वस्तू सुद्धा आपण चीन कडून आयात करतो ! व त्यांची येथे सर्रास खरेदी-विक्री होते. या वस्तू निर्मितीसाठी काय फार मोठे तंत्रज्ञान लागते काय की त्या चीन मधून आणाव्या लागतात? राखी , मैत्री दिवस यांत आकर्षक राखीपेक्षा आवश्यक असते ती भावना. राखी एक साधा लाल धागा असला तरी चालतो. गणपतीसमोर चीनी लायटिंगच्या ऐवजी आपला साधा दिवा सुद्धा चालतो. या गोष्टींचे आपण आता आवर्जून भान ठेवायला हवे. जसे आपण कोरोना या चायनीज व्हायरस मुळे घराबाहेर पडतांना आठवणीने मास्क लावतो तसेच वस्तू खरेदी करतांना सुद्धा सर्वानी ती वस्तू कुठे निर्मित झाली आहे हे आता अवश्य पहावे मगच ती विकत घ्यावी. विस्तारवादी चीन हा आपल्यासाठी सर्वात धोकादायक आहे. हे आपण 1962 प्रमाणे दुर्लक्षिले तर एक-एक प्रदेश गिळंकृत करणारा चीन आपला भूप्रदेश बळकावू शकतो. लडाखचा भाग असलेला अक्साई चीन तर त्यांच्या ताब्यात नेहरू पंतप्रधान असतांनाच गेला होता.आता त्याची पुनरावृत्ती होणार नाही तरीही अखंड सावध असावे. विस्तारवादी , अनेक देशांना गिळंकृत करणारा , कुरापती , कोरोना व्हायरसच्या या जनकाला म्हणजेच चीनला लाल चीन्यांनो खबरदार म्हणत, आपल्या परीने चीनी वस्तूंचा त्याग करून त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे.
पुढील भागात चीन विषयी आणखी काही....
क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा