०५/०८/२०२०

Article on the occasion of "Shilanyas" of Lord Ram Temple in Ayodhya

हे रोम, रोम मे बसनेवाले राम...

राम मंदिराचे भुमी पुजन 5 ऑगस्ट रोजी  होणार हे वृत्त झळकले आणि आज भुमी पुजन संपन्न सुद्धा झाले. शेकडो वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या रामभक्तांचा आनंद आज गगनात मावेनासा झाला आहे. आजपावेतो अनेक वृत्तपत्रे व माध्यमांनी राम, अयोध्या , मंदीर मस्जिद वाद , अयोध्येचा इतिहास याबात अनेक लेख, चर्चा प्रसारीत केल्या. मर्यादा पुरुषोत्तम , आदर्श पुत्र, आदर्श पती , आदर्श भ्राता , आदर्श पिता प्रभू रामचंद्र म्हणजे करोडो भारतीयांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य करणारे भगवंत.

राम नाम की लूट है, लूट सके सो लूट
अंत काल पछतायेगा, जब प्रान जायेगा छूट। 

आणि

राम रहीमा ऐक है, नाम धराया दोई कहे कबीर दो नाम सूनि, भरम करो मत कोई। 

असे दोहे लिहिणारे संत कबीर , उर्दू मध्ये रामायण लिहिणारे चकबश्त यांच्यासह अनेक संतानी त्यांच्या अभंग, भारुडे यातून रामाला आळवले आहे. संपूर्ण भारतातच नव्हे तर इतरही अनेक देशांत रामाला आपला पूर्वज समजले जाते, रामलीलेसारखी नाट्ये होतात. मग हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा याला अपवाद कशी असेल. महात्मा गांधींनी पाहिलेला एकमेव चित्रपट सुद्धा कौसल्यापुत्र रामाच्या जीवनावर आधारीत “रामराज्य” हाच होता. तद्नंतर रामावर आधारीत अनेक चित्रपट त्याकाळात प्रदर्शित झाले. पुढे अनेक चित्रपटातून दशरथनंदन रामावर आधारीत अनेक गीते दाखवण्यात आली. बहुतांश गीते ही मुस्लिम कलाकारांवर चित्रित किंवा त्यांनी गायलेली , लिहिलेली व संगीतबद्ध केली आहेत. 

    मोहम्मद रफी यांनी गायलेली “सुखके सब साथी दु:ख मे ना कोई मेरे राम” हे सर्वांग सुंदर गीत आजही तितकेच श्रवणीय आहे. जुन्या घराना चित्रपटात रामाला आळवणारे  रफीजींचे “आशा भोसले यांच्या समवेत गायलेले सुमधुर असे “जय रघुनंदन जय सियाराम , हे दुख भंजन तुम्हे प्रणाम” गीत आहे या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे गीताच्या आरंभी असलेला

श्रीरामचंद्र आश्रित पारीजातह, समस्त कल्याण गुण विरामह

सिता मुखं गुरु चंचरीकाह, निरंतरम मंगल मातलत


हा संस्कृत श्लोक रफीजींनी एखाद्या संस्कृत निष्णाताप्रमाणे गायला आहे. राफीजींनीच गायलेले "मुझे अपनी शरण मे ले लो राम" हे सुद्धा एक सुंदर भजन आहे. 80 च्या दशकातील सरगम चित्रपटातील “रामजी की निकली सवारी” रफीजींनी गायलेले हे गीत तर आजही रामाच्या शोभायात्रेत हमखास वाजवले जाते. अशी आणखी किती तरी गीते आहेत. जगातील कणा-कणात ईश्वर आहे असे ईश्वराप्रती भावना व्यक्त करणारे , जगताचे स्वामी असलेल्या प्रभू श्रीरामाला नील-कमल चित्रपटात  वहिदा रहमान  “हे रोम रोम मे बसनेवाले राम मै तुझसे क्या मांगू ?" असे म्हणते. तुझ्या चरणाची धूळ ज्याला मिळते तो दगड सुद्धा हिरा बनून जातो ,  तू आम्हाला जे काही देतो त्याला आम्ही चांगले किंवा वाईट कसे म्हणणार ? , मी सर्व आशांचे बंधन तोडून सर्व काही तुझ्यावरच सोपवले आहे , असा आशय असलेले भक्तीरसाने ओतप्रोत असे हे गीत अतिशय श्रवणीय आहे.  

    अमेरिकेच्या टाईम स्क्वेअर येथे मोठ्या स्क्रिनवर प्रभू श्रीरामाचे भले मोठे चित्र आज झळकणार होते परंतू तेथील मुस्लिम संघटनांनी यावर आक्षेप घेतला असे वृत्त माध्यमांवर दाखवले. यावरून महाशक्तीशाली अमेरिका सुद्धा दबावाखाली येऊ शकतो हे समजले. परंतू जरी अमेरिकेच्या टाईम स्क्वेअर वर प्रभू रामचंद्र यांचे चित्र झळकले नसले तरी वहिदा रहमान यांनी नील कमल या गाजलेल्या चित्रपटात मात्र पडद्यावर रामाला आळवतांना म्हटलेल्या “हे रोम रोम मी बसनेवाले राम , जगत के स्वामी हे अंतर्यामी मै तुझसे क्या मांगू ?“ या गीतात व्यक्त केल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र हे या विश्वाच्या कण-कणात वसलेले आहे टाईम स्क्वेअर येथील स्क्रीन वर नाही झळकले तर काही बिघडत नाही.   

(संस्कृत श्लोक व दोह्यांमध्ये काही चूक असल्यास क्षमस्व)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा