२१/१२/२०२०

Remembering RSS ideologue M.G. Vaidya

आठवणींचा “मागो”वा 

"....महाराष्ट्राचे चार छोट्या राज्यांत विभाजन केले पाहिजे “ अशा त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर टीका करतांना राज ठाकरे त्यांना उद्देशून ज्यांची जग सोडण्याची वेळ आली आहे त्यांनी याबाबत बोलू नये” अशा स्वरूपाचे बोलले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना मी वयाचे शंभर वर्ष पुर्ण करणारच जो पर्यंत मनसे प्रमुख त्यांचा नेमबाज मला मारायला  पाठवणार नाही तो पर्यंत मी मरणार नाही” असे आत्मविश्वासाने मा.गो. म्हणाले होते...."

19 डिसेंबर ला मा.गो.वैद्य निवर्तले. पत्रकारिता , बौद्धिक क्षेत्रास अपरिमित हानी झाली. कळायला लागले तेंव्हा पासून तरुण भारत हा पेपर ज्ञात झाला. जेंव्हा तो ज्ञात झाला त्या काळात मा.गो. वैदय यांना तरुण भारतात येऊन 20-25 वर्षांपेक्षाही जास्त काळ उलटून गेला होता. बालवयात वृत्तपत्राच्या नावाखेरीज संपादक , अग्रलेख स्तंभ याबाबत विशेष माहिती किंवा आवड नसते. त्यामुळे मा. गो वैद्य हे नांव पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर परिचित झाले. मग त्यांचे लेखन , त्यांनी माध्यमांवर दिलेले अभिप्राय यांनी त्यांच्याकडे आकृष्ट झालो. व्यक्तिगत संपर्काचा योग मात्र आला नाही हे मी माझे दुर्भाग्य समजतो. त्यांच्या निधनाचे वृत्त पाहिले आणि धक्काच बसला. 

छोट्या राज्यांबाबत बोलतांना , “महाराष्ट्राचे चार छोट्या राज्यांत विभाजन केले पाहिजे अशा त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर टीका करतांना राज ठाकरे त्यांना उद्देशून बोलतांना म्हणाले होते की ज्यांची जग सोडण्याची वेळ आली आहे त्यांनी याबाबत बोलू नयेअशा स्वरूपाचे बोलले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना मी वयाचे शंभर वर्ष पुर्ण करणारच जो पर्यंत मनसे प्रमुख त्यांचा नेमबाज मला मारायला  पाठवणार नाही तो पर्यंत मी मरणार नाहीअसे आत्मविश्वासाने ते म्हणाले होते. तसेच माझ्या शतकपुर्तीचा  सुद्धा समारंभ होईल, तो पर्यंत तुम्ही तुमच्या तब्येती सांभाळा असेही ते त्यांच्या एका सत्कार समारंभात म्हणाले होते. त्यांच्या या आत्मविश्वासाने ते निश्चितच शंभरी पुर्ण करतील अशी आशा सर्वांनाच होती. परंतू त्यांची प्राणज्योत मालवली.

      त्यांच्या निधनाबाबत खामगांवातील परिचितांशी बोलणे झाल्यावर अनेकांनी त्यांच्या स्मृती कथन केल्या. जेष्ठ बंधू सिद्धेश्वर वरणगांवकर यांचे त्यांनी टीळक स्मारक खामगांव येथे तरुण भारतच्या वाचक मेळाव्यात झालेल्या कार्यक्रमात कौतुक केले होते. गो.से. महाविद्यालयाचे प्राध्यापक सुनील मुळे हे त्यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करायला गेले असता त्यांच्याशी झालेला संवाद व त्यांनी दिलेला आशीर्वाद कसा खरा झाला हे कथन केले. श्रीपाद कुळकर्णी हे माझे मित्र शिक्षक आहे.ते जेंव्हा डी.एड.ला शिकत होते तेंव्हाच्या स्नेहसंमेलनात प्रमुख वक्ते म्हणून मा.गो.वैद्य आले होते तेंव्हा मा.गो. यांनी म्हटलेले वाक्य आजही त्यांच्या स्मरणात असल्याचे त्यांनी सांगितले. "द्रौपदीच्या संकट काळात वस्त्र पुरवणारा असा भगवान श्रीकृष्ण होता आणि म्हणून त्याला गोपींबरोबर रासक्रीडा करण्याचा अधिकार आहे." असे मा.गो. बोललेले त्यांच्या आजही स्मरणात आहे.माझे वरुड येथील जावाई महेश लोहोकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली होती व त्यांच्या एकत्र कुटुंब पद्धतीचे, गो पालनाचे  कौतुक केले होते. 

     देशभरात अशा अनेकांच्या कितीतरी आठवणी असतील.तरोडा गावात जन्मलेले मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य हे जात्याच बुद्धिमान.प्रथम क्रमांक हा त्यांनी कधी सोडलाच नाही.  बी.ए. संस्कृत परीक्षेत सुवर्ण पदक प्राप्त झाल्यानंतर व पुढे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर  ते शिक्षक झाले, पुढे प्राध्यापक  झाले. बालपणापासून संघसंस्कार रुजलेले होते. वाचनाच्या  अंगीभूत गुणामुळे संघात त्यांनी अ. भा. बौद्धिक प्रमुख, अ.भा. प्रचार प्रमुख, संघाचे प्रवक्ते अशी पदे भुषवली. वाजपेयी यांच्या समवेत एका जाहीर कार्यक्रमात वाजपेयी त्यांना संघ  प्रचारक असे म्हणाले होते तेंव्हा वाजपेयी यांना थांबवत ते म्हणाले होते “मै प्रचारक नाही  प्रचारकोंका बाप हूं” त्यांची दोन मुले प्रचारक असल्याने त्यांनी तसे म्हटले होते. निवृत्त  झाल्यावर वानप्रस्थाश्रम स्विकारावा त्याप्रमाणे ते काही काळ संघ कार्यालयात निवासासाठी  गेले होते. संघ विचाराचे जरी असले तरी इतर विचारांचा सुद्धा ते आदर करीत असत. दीर्घकाळ पर्यन्त भाष्य हे सदर लिहिणा-या तसेच टोपण नावांनी इतर स्तंभ लेखन करणा-या , विपुल ग्रंथ लिहिणा-या, आपल्या लेखनाव्दारे खरा संघ काय आहे हे साध्या सोप्या लेखन शैलीत समजवून सांगणा-या मा. गो. वैद्य यांना भेटण्याची माझी इच्छा होती , माझ्या दुर्भाग्याने ती अपूरी राहिली याचे आता शल्य आयुष्यभर राहील. मा.गो वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा