०४/०२/२०२१

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 9

खामगांवची शान असलेली आताची 

भकास स्थाने , भाग- 9

जनुना तलाव 

भकास स्थानांच्या यादीतील या स्थानाबाबतचा लेख हा बहुप्रतिक्षित असावा. ही 

लेखमालिका सुरु केल्यापासून अनेकांचे दुरध्वनी येत आहेत व समाज 

माध्यमांवर प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत त्यापैकी अनेकांनी जनुना तलाव या खामगांव 

व परिसरातील सर्वात लोकप्रिय व प्रेक्षणीय अशा स्थानाच्या आठवणी काढून त्याबाबत 

लिहावे अशी इच्छा प्रकट केली. त्यामुळे हा आजचा लेख. हा लेख म्हणजे जुलै 2014 

मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाची सुधारीत आवृती आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.


प्रवेशव्दार 
 
भग्न शिल्पे वर  पक्ष्याचे शिल्प पडलेले दिसत आहे  


   

सहा नंबर शाळेत वर्ग चौथीत होतो तेंव्हा माझ्या वडीलांनी आमचे कुटुंबीय व त्यांच्या मित्रांचे कुटुंबीय असे सर्व सायकलवर डबा पार्टीस जाण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही निघालो. दुपारची वेळ आमच्यापैकी कुणी पायी तर कुणी सायकलवर असे निघालो. 1980 चे दशक होते ते. आजच्यासारखे खामगांव विस्तारीत झाले नव्हते , वाहने, वर्दळ अगदीच कमी असायची. मुख्य रस्ता सोडून आम्ही अरुंद अशा रस्त्याला लागलो येथे गर्दी नव्हती , सुनसान रस्ता त्यामुळे सर्वांच्या सायकली सुसाट निघाल्या. आता रस्त्याच्या बाजूला वडाची भली मोठी झाडे , त्यांच्या मोठ्या पारंब्या असे दृश्य दिसू लागले. आम्ही थांबून सायकलच्या कॅरीअरवर चढून पारंब्यांना लोंबू लागलो. आमच्यापैकी वयाने थोडी मोठी मुले सायकल चालवता-चालवता पारंब्यांना लोंबून सायकल सोडून देत. ती चालक विरहीत सायकल मग समोर जाऊन पडे. अशी गंमत करत पुढे गेल्यावर एक भव्य दरवाजा आम्हाला दिसला. बाप रे ! किती छान ! असे उद्गार आमच्या मुखातून बाहेर पडले. गेंडा , हरीण , मगर विविध पक्षी यांची मनमोहक शिल्पे असलेला तो मोठा दरवाजा आमच्या लहान दृष्टीस अधिकच भव्य वाटत होता. कुणीतरी म्हणाले आला जनुना तलाव. ही जनुना तलावाची पहिली भेट आजही लक्षात आहे व चिरस्मरणीय आहे. आत गेल्यावर पिंजरे , खुप झाडे-झुडपे व पुढे गेल्यावर तो खामगांवच्या तमाम जनतेला प्रिय असा जनुना तलाव. आता पोहण्यासाठी गेल्यावर या काठाहुन उडी मारल्यावर त्या काठापर्यंत कित्येकदा गेलो आहे पण तेंव्हा आम्हा लहानग्यांना किती मोठा वाटत होता तो तलाव. समुद्र पण तेंव्हा पाहिला नव्हता पण समुद्रासारखाच भव्य वाटला होता. खुप , खेळून बागडून डबा खाऊन आम्ही परतलो होतो. जनुना तलाव हे स्थान तेंव्हा सर्वप्रथम ज्ञात झाले. नंतर मग तिथे कित्येकदा जाणे झाले. पण जसे-जसे वय वाढत होते तशी तशी जनुना तलावाची दुर्दशा सुद्धा डोळ्यांना दिसत होती.

अलीकडेच एक दिवस अचानक जनुना तलाव उद्यानाचा विकास सुरु करण्याची बातमी ऐकली. कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद झाल्याचे ऐकले ही खामगांवकरांसाठी आनंदाची बातमी होती. खामगांवातील प्रचंड तापमानात अनेक उत्साही मंडळींची पाऊले पोहण्यासाठी म्हणून जनुना तलावाकडे वळतात. सकाळी पोहण्याच्या व्यायामामुळे येथे एक विशिष्ट प्रकारचा मानसिक आनंद मिळतो पण जनुना तलावाची दुर्दशा पाहुन दु:ख सुद्धा होते. जनुना तलाव म्हणजेच तलाव व उद्यान असे दोन्ही हे वाचकांनी समजावे. जनुना तलावावर आता बघण्यासारखे म्हणजे फक्त पाणी आहे तेही इंग्रजांनी बांधलेली भिंत असल्यामुळे. पुर्वी येथे बगीचा असल्याची काही चिन्हे आजही दिसतात. प्रवेशव्दारावरील व बगीच्यातील अंतर्गत व आकर्षक शिल्पे आम्हा लहान मुलांची नजर खिळवून ठेवत उद्यानात प्रवेश करतांनाच सर्वप्रथम हरणांचा पिंजरा होता. त्याच्या बाजूला कबुतरे, ससे यांचा एकच संयुक्त पिंजरा होता. त्याच्याजवळ उद्यानरक्षकासाठी घर, समोर गेल्यावर छोटे हौद ज्यात कमळे फुलायची. या हौदात सुद्धा मगर, बदके यांची शिल्पे होती. हे दोन्ही हौद आज कोरडे असतात. तलावाकडे जातांना डावीकडे एक छत्री व उजवीकडे एक छत्री आहे व आजही सुस्थितीत आहे.

      पुर्वी श्री पिल्ले म्हणून व्यक्ती उद्यान रक्षक म्हणून होते.जे अतिशय इमानेइतबारे उद्यानाची व प्राण्यांची काळजी घेत उद्यानात कुठेही काही वाजले की या पिल्लेंची शिट्टी वाजे त्यामुळे कुणी पानालाही हात लावण्याची हिम्मत करीत नसत. खामगांव नगरीचे शिल्पकार स्व. श्री शंकरराव बोबडे यांच्या कारकीर्दीत या उद्यानाची शान होती. संपूर्ण जिल्ह्यात तेंव्हा हे ठिकाण प्रसिद्ध होते. शंकरराव बोबडे हे स्वत: वृक्षप्रेमी असल्यामुळे त्यांनी खामगांवातील सर्वच उद्यान विकासात पुढाकार घेतला होता. उंचावर असूनही भारतरत्न राजीव गांधी उद्यान जे खामगांवात टॉवर गार्डन व यशवंत टॉवर या नावाने प्रसिद्ध होते येथे नटराज गार्डन विहिरीवरून पाणी सुविधा उपलब्ध करून हे उद्यान फुलवले गेले होते. आता या उद्यानाची सुद्धा दशा पाहवत नाही व त्याबाबतचा स्वतंत्र लेख या लेख मालिकेत येऊन गेला आहे. जनुना तलाव उद्यानात आजही गुलमोहर, आंबा आदी अनेक भली मोठी झाडे आहेत. मात्र उद्यानाची दुरावस्था पाहून, तेथील पुर्वीच्या रम्य वातावरणाऐवजी आताचा भकासपणा , उजाडपणा पाहून तिथे जाणा-या खामगांवकरांना त्यातल्या त्यात ज्यांनी या उद्यानाचे वैभव पाहिले आहे त्यांना निश्चितच मोठी खंत होत असेल. उद्यानाला कंपाउंड नाही , पिंज-याच्या जाळ्या तुटलेल्या आहेत (आता वन्यजीव धोरण बदलले असल्याने पिंजरे काढूनच टाकले आहेत) , तलावाच्या भिंतीवरील संरक्षक कठडे चोरट्यांनी काढून नेले आहेत. भिंतीवरून जातांना दोन्हीकडे खोल असल्याने भिंतीवरून जाणारा व्यक्ती खाली पडू शकतो, फुलझाडे नाहीत , मुलांना खेळण्यासाठी एकच तुटकी जंगलेली घसरगुंडी आहे, या घसरगुंडीच्याच ओळीत काही शिल्पे होती जी आता उध्वस्त झाली आहेत , शिल्पांसाठीची चबुतरे मात्र आहेत. शहराची फुफ्फुसे असणा-या उद्यानांना फुलवण्यासाठी खामगांव नगर परिषदेने सुनियोजित असा कार्यक्रम राबवण्याची नितांत आवश्यकता आहे. तलावाकडे जाणा-या रस्त्याबाबत जर म्हणाल तर साक्षात ब्रह्मदेवाने जरी सांगितले की येथे रस्ता होता तरी कुणाचा विश्वास बसणार नाही अशी या रस्त्याची स्थिती आहे. (आता निम्मा रस्ता चांगला झाला आहे ) या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वटवृक्षांची संख्या आता रोडावली आहे. (तलावाला पोहायला येणा-या व काही निसर्गप्रेमी मंडळीनी आता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे ) पुर्वी या तलावातून खामगांव शहरास पाणी पुरवठा होत असे. आजही व्यवस्था केली तर अर्ध्या खामगांव शहरास या तलावातून पाणी पुरवठा होऊ शकतो. आजकाल खामगांवातच नव्हे तर बहुतांश शहरात उद्याने उपेक्षित झाली आहेत. मोठया शहरातील उद्यानात तर आता लहान मुलांना घेऊन जाणे कठीण झाले आहे असे तरुणाईचे पराक्रम सुरु असतात.

     जनुना तलाव व उद्यान विकास सुरु होत आहे. ( काही बदल झाले आहेत  परंतू फुलझाडे , हिरवळ याऐवजी रस्ते , सिमेंटच्या छोट्या भिंती व जुना दरवाजा चांगला करण्याऐवजी त्याच्या समोर विनाकारण नवीन  कमान बांधण्यात आली आहे ). 2019 च्या उन्हाळ्यात जनुना तलाव पुर्ण आटला होता. ते दृश्य वेदनादायी होते. मी माझे मित्र धनंजय टाले , रितेश काळे असे तिघे तेंव्हा तिथे भर उन्हात , भर दुपारी गेलो होतो. तलावात कित्येकवेळा पोहलेलो आम्ही अक्षरश: भेगा पडलेल्या तलावाच्या तळातून चालत होतो तेंव्हा तलावात पाणी नव्हते पण आमच्या डोळ्यात मात्र होते.पण त्या चक्षूस्त्रवाने तलाव थोडी भरणार होता. आम्ही जड अंत:कारणाने तिथून निघालो होतो.ईश्वर कृपेने पावसाळ्यात तलाव पाण्याने पुनश्च काठोकाठ भरला, ओव्हरफ्लो झाला. परंतू जुन्या पाईपलाईन मधून लिकेज सुरूच असते व हजारो लिटर पाणी वाया जात असते ते पाणी उद्यानासाठी सुद्धा वापरत नाही. 

    खामगांव शहरातील या विरंगुळ्याच्या रमणीय , निसर्गसमृद्ध  ठिकाणास न.प. ने गतवैभव प्राप्त करून द्यावे तसेच तलाव रोड हा संबंधीत विभागाने दुरुस्त करावा, रस्त्यावरील वटवृक्षांचे जतन करावे अशी खामगांवातील जनतेची अपेक्षा आहे. खामगांव नगर परिषदेने आता येथे पुन्हा सुंदर बाग फुलवावी , राष्ट्रीय शाळेच्या निमित्ताने येथे कितीतरी शिल्पकार आहेत. नुकत्याच झालेल्या 26 जानेवारीच्या दिल्ली येथील पथ संचलनात खामगांवचे सागर एरंडोलकर यांनी बनवलेली काही शिल्पे होती. असे अनेक कलाकार आपल्याच शहरात आहेत अशा कलाकारांकडून येथील शिल्पे दुरुस्त करून घ्यावी काही नवीन लावावीत. श्री पिल्ले यांच्यासारख्या उद्यानप्रेमी व्यक्तीची येथील उद्यानरक्षक म्हणून नेमणूक करावी व जनुना तलाव उद्यानास पुन्हा रमणीय बनवावे. जनुना तलाव व तेथील उद्यान सुद्धा त्याला वैभव देणारे स्व. श्री शंकरराव बोबडे , कलाचार्य स्व.श्री पंधे गुरुजी , उद्यानरक्षक श्री पिल्ले आदींच्या स्मृती व स्वत:च्या वैभवाचे सुंदर दिवस आठवून ते सुंदर , सुखाचे दिवस त्याला कुणीतरी वापस आणून देण्याची प्रतिक्षा करीत “कोई लौटादे मेरे बीते हुये दिन” असेच म्हणत नसेल का ?

जनुना तलाव प्रेमी खामगांवकरांसाठी तलावाबाबतच्या जुन्या लेखांच्या लिंक, 👇

आवड असल्यास लिंक वर क्लिक करा   👇

1 तलावाने डोळ्यात पाणी आणले 

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2019/04/januna-lake-dried-this-year-its-very.html

2 गाळमुक्त तलाव ... रोटरीचा दिलासा 

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2019/04/blog-post.html

जय बाबा बर्फानी ... तालाबमे भर दे पानी 

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2019/11/article-about-lake-overflow-power-of.html 


४ टिप्पण्या:

  1. सुंदर लेख छान माहिती पूर्ण लेख

    उत्तर द्याहटवा
  2. डॉ निलम राणा इंगळे४/२/२१, ५:५३ PM

    थँक यू. छान लेख आहे . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

    उत्तर द्याहटवा
  3. As usual very informative and nicely written 👌👌 माझ्या आजोबांचा उल्लेख विशेष आवडला.धन्यवाद

    उत्तर द्याहटवा