०४/०५/२०२१

Article about the news published in international media about Corona Pandemic situation in India

आंतर्राष्ट्रीय माध्यमांनुसार आपले मत 

असावे का ?   

     आंतर्राष्ट्रीय माध्यमांनी जरी आज मा. पंतप्रधान यांना कोरोना परिस्थितीस जबाबदार धरले असले तरी कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी जनहित हेच सरकारचे प्राधान्य असते व त्यातही नेतृत्व जर कणखर , सक्षम असेल तर देश किती का मोठ्या संकटात असो त्यातून बाहेर येईलच असा विश्वास जनता बाळगून असते.

सध्या भारतात कोविडची दुसरी लाट आलेली आहे.  काही परदेशी वृत्तपत्रांनी दुस-या लाटेच्या गंभीर स्थितीस मोदी यांना जबाबदार धरले आहे.  पण भारतात हि लाट पसरण्यास मोदी एकटे जबाबदार ठरू शकत नाही. दुस-या लाटेच्या गंभीर परिणामास अनेक बाबी आहेत,  बेशिस्तपणा ही सुद्धा त्यातील महत्वाची बाब आहे. 

      गतवर्षी पासून चिनी विषाणूचा प्रादुर्भाव , लॉकडाऊन , ढासळलेल्या आरोग्य व्यवस्था , काळाबाजार या सर्वानी भारतच नव्हे तर संपूर्ण जग हादरून गेले आहे. दुस-या लाटेचा सामना करण्यास भारत मागे पडला अशी उक्ती अनेक लोक करीत आहेत व त्याचे सर्व खापर एकट्या मोदींच्या माथी फोडण्याचा प्रयत्न होत आहे. भारताने कोविड विषाणू आल्यानंतर लगेच लॉकडाऊन घोषित केले होते त्यास कारण म्हणजे संक्रमणाची भीती. त्यावेळी आपण कोविड विषाणूचा सामना करण्यास सज्ज झालेलो नव्हतो. त्यानंतर पिपिई कीट , औषधे , कोविड रुग्णालये आदी उभारण्यास तेंव्हा सरकारने गती दिली होती. तत्कालीन पहिल्या लाटेत , प्राणवायूचा स्तर घटण्याचे प्रमाण अत्यल्प होते , रेमडिसीवीर हे इंजेक्शन तेंव्हा इतके आवश्यक नव्हते जेवढे ते आज आवश्यक म्हणून सांगितले जात आहे. आजही अनेक डॉक्टर व जागतिक आरोग्य संघटनेने या इंजेक्शनचा वापर अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या रूग्णांसाठीच करण्याचे मत व्यक्त केले आहे. दुस-या लाटेत भारतातील दररोजची रुग्णसंख्या लाखोच्या घरात आहे, हजारो मृत्यू होत आहेत. पण त्यासोबतच भारतातील बरे होण्याचा दर सुद्धा इतर देशांच्या तुलनेत खूप चांगला आहे. काही नेत्यांनी इतर देशाला लस , ऑक्सिजन हे का पुरवले असा प्रश्न विचारला. आपल्या देशाला गरज असतांना इतरांना का पुरवठा करायचा ? परंतू आयात- निर्यात , विदेश धोरण या सर्व बाबी सुद्धा विचारात घेतल्या पाहिजे. शिवाय आपल्याला सुद्धा इतर देशांनी मदत पुरवली आहे. मग ती मदत आपण कशी स्विकारतो ? रशियाने आपल्याला स्पुटनिक लस दिली , इतर देशांनी सुद्धा मदत पुरवली ही मदत त्या-त्या देशांनी बडेजाव मिरवण्यासाठी केली असे म्हणता येणार नाही. मात्र पाकिस्तान सारख्या कुरापती देशाला , ज्या देशात आश्रित दहशतवाद्यांमुळे भारताला किती त्रास होतो , सीमेवरील सैनिकांचे, नागरिकांचे जीव हकनाक जातात त्यांना लस देण्यात घाई करण्याचे काहीही कारण नव्हते. भारतातील परिस्थितीला आंतर्राष्ट्रीय मिडीयाने नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे. ज्या देशातील वृतपत्रे यांनी मोदी यांना जबाबदार धरले आहे त्या वृत्तपत्रांनी त्यांच्या देशातील विरोधी पक्षांची त्यांच्या देशातील सरकारच्या कोरोना परिस्थिती हाताळण्याबाबतची कामगिरी समाधानकारक आहे की नाही अशी वृत्ते दिली आहेत का ? देतात का ? तशी वृत्ते दिली असल्यास त्याचा उहापोह भारतातील माध्यमे , माध्यम प्रतिनिधी करतात का ? या बाबींवर सुद्धा विचार व्हायला पाहिजे. ढोबळ मानाने पाहू जाता आम्हा भारतीयांना विदेशातील लोकांनी , वृत्तपत्रांनी काही सांगितले की ते त्वरित स्विकारार्ह वाटते. या वृत्तपत्रांनी जरी मोदींना जबाबदार धरले असले हे एकवेळेस मान्य केले तरी बेशिस्त , भ्रष्ट , विभाजित भारतीय जनतेचे काय ? ही परदेशी माध्यमे मोदींकडे बोट दाखवतात यांना काय कल्पना की इथे विलगीत केलेले लोक बाहेर हिंडतात , इथले नेते आपल्या मुलांची लग्ने वेळेचे बंधन न पाळता , जास्त लोकांना बोलावून कोरोनाचे नियम डावलून गुपचूप उरकतात. गर्भश्रीमंत लोक सुद्धा त्यांच्या मुलांच्या लग्नात सर्व नियम डावलतात , विना मास्कचे फिरतात, रस्त्यावर पचापचा थुंकतात. भंडारे करतात, बनावट ई-पास बनवून फिरायला निघतात, काही हजारांचे इंजेक्शन लाखोत विकतात , रुग्णांच्या, मृतांच्या खिशातील पैसे चोरतात , काही सरकारी रुग्णालयातील डॉक्टर पैसे घेतात , तर काही बनावट डॉक्टर चक्क कोविड रुग्णालय उभे करतात , लस पुण्याच्या बाहेर जाऊ देणार नाही अशा धमक्या काही नेते देतात. अशा असंख्य चुका करणारे बेशिस्त नागरिक या देशात आहेत याची परदेशी मिडीयाला काय कल्पना ? महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका कोरोना काळातच घेतल्या गेल्या त्याने सुद्धा कोरोना संक्रमण झाले असेल याकडे कुणाचेही का लक्ष गेले नाही ? हे सर्व कटू सत्य आहे. उपरोक्त बेशिस्तपणा इतर देशात नाही , बेशिस्तपणा केला तर त्यास तिथे कडक कायदे आहे. इथे काही करायला गेले या संघटनेचा विरोध , त्या संघटनेचा विरोध , याची याचिका त्याची याचिका असे अनेक सोपस्कार असतात. 

     मोदींच्या दाढी, वेशभूषा या बद्दल सुद्धा बोलले जाते. एक तर मोदी वारंवार वेशभूषा बदलत नाही, त्यांना तेवढा वेळही नाही. कोरोना आल्यापासूनच त्यांनी दाढी वाढवली आहे. या देशाने तर दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रसंगी पाच वेळा पोशाख बदलणारे गृहमंत्री सुद्धा पाहिले आहे. 

     तसेच मोदींनी दुस-या लाटेत जबाबदारी राज्यांवर ढकलली असेही म्हटले जात आहे.परंतु भारतात संघराज्य पद्धती आहे .राज्यांना त्यांच्या राज्यात कायदा, आरोग्य इ सुविधा पुरवणे त्याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे . त्यानुसार राज्यांनी सुद्धा त्यांच्या राज्यात कोरोना परिस्थिती हाताळणे अपेक्षित आहे की नाही की सर्व भार केंद्रावर सोपवायचा ?

    सध्या जरी परिस्थिती गंभीर असली तरी परदेशी माध्यमांच्या बातम्यांवर अनुसरून भाष्य करण्यापेक्षा या कोरोना संकटाचा सर्व पक्ष एकत्र येऊन , जनतेला विश्वासात घेऊन , माध्यमांनी सकारात्मक बातम्या देऊन या आपल्या मातृभूमीवर आलेल्या संकटास तोंड देणे हे आपल्या देशबांधवांकडून अपेक्षित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेने या संकटात मोठे सेवाकार्य केले आहे.पण संघ आपल्या कार्याचा डंका पिटत नाही. इतरही अनेक संघटना व व्यक्ती सेवाकार्यात पुढाकार घेत आहे.        संपूर्ण जगावर आलेल्या या महामारीच्या संकटातून आपण तावून सुलाखून बाहेर निघणारच आहोत. मोदींवर सामान्य जनतेचा विश्वास आहे. मा. पंतप्रधान यांना जनतेच्या मनातील भावना बरोबर कळतात. आंतर्राष्ट्रीय माध्यमांनी जरी आज मा. पंतप्रधान यांना जबाबदार धरले असले तरी कोणत्याही पक्षाचे सरकार असेना जनहित हेच सरकारचे प्राधान्य असते व त्यातही नेतृत्व जर कणखर , सक्षम असेल तर देश किती का मोठ्या संकटात असो त्यातून बाहेर येईलच असा विश्वास जनता बाळगून असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा