१७/०६/२०२१

Article about various demands by people, organisations etc

मांगो..मांगो..मांगो 


आपल्या मागण्यांमुळे  संविधान व त्यातील प्रास्ताविकातच एकता, एकात्मता , समता यांसोबतच सर्वात मुख्य बाब म्हणजे “दर्जाची व संधीची समानता प्रवार्धित करण्याचा निर्धार करण्याचा संकल्प” असा जो उल्लेख आलेला आहे त्याला तडा तर पोहचत नाही आहे ना ? दर्जा , संधी , समानता , एकता हे केवळ शब्दमात्र असल्याचे वाटत आहे. प्रत्यक्षात मात्र शिक्षण , नोकरी या क्षेत्रात दर्जा, समानता या गोष्टी पाहण्यात येत नाही.

1980 च्या दशकात वरील शीर्षकाचे एक खळबळ उडवून देणारे “आयटेम साँग”  खुप गाजले होते. तुम्ही जे काही पाहिजे ते माग अशा आशयाचे हे गीत होते. चित्रपटातील त्या गीताचा हेतू वेगळा होता. परंतू मागणे , मागण्या यांचा या गीतात आलेला उल्लेख. हा, हे गीत आठवण्यामागचे कारण. आपल्या देशात सतत काही ना काही मागण्यांची री ओढणे सुरू असते. गेल्या काही वर्षांपासून तर मागण्यांचे हे स्तोम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कुठल्यातरी संघटना , व्यक्ती , संस्था यांच्या स्वहितासाठीसाठी काही ना काही मागण्या सरकारकडे करणे हे सुरूच असते. वृत्तपत्रातून प्रशासनातील अधिका-यांना कुठल्या ना कुठल्या मागण्यांची निवेदने देत असल्याच्या बातम्या , छायाचित्रे रोज प्रकाशित होतच असतात. मागण्यांसाठी आंदोलने , मोर्चे , बंद याचे आवाहन केले जाते. यांमुळे मग सामान्य नागरिक वेठीस धरले जातात. वाहूतक खोळंबते , क्वचित प्रसंगी हिंसक वळण लागते. या प्रकारामुळे राष्ट्राची गती तर अवरोधित होत असतेच शिवाय नागरीकांमधील राष्ट्रीय एकात्मतेची भावना सुद्धा क्षीण होत असते. प्रत्येकाला आपल्या मागण्या ह्या रास्तच आहे असे वाटत असते , तशा त्या असूही शकतात परंतू त्या मागण्यांमुळे दुस-यांच्या हक्कावर गंडांतर येत आहे का ? त्या मागण्यांमुळे आपल्या संविधान व त्यातील प्रास्ताविकातच एकता, एकात्मता , समता यांसोबतच सर्वात मुख्य बाब म्हणजे “दर्जाची व संधीची समानता प्रवार्धित करण्याचा निर्धार करण्याचा संकल्प” असा जो उल्लेख आलेला आहे त्याला तडा तर पोहचत नाही आहे ना ? दर्जा , संधी , समानता , एकता हे केवळ शब्दमात्र असल्याचे वाटत आहे. प्रत्यक्षात मात्र शिक्षण , नोकरी या क्षेत्रात दर्जा, समानता या गोष्टी पाहण्यात येत नाही. जास्तीत जास्त मागण्या ह्या व्यक्तिगत , स्वत:च्या संस्था , संघटना , समाज यांच्यासाठीच केल्या जात असतांनाचे चित्र दिसून येते. प्रत्यक्षात देशहीत कशात आहे याकडे मात्र संपूर्णपणे डोळेझाक केली जात आहे.

देशा करीता , देशाच्या हिताच्या मागण्या जसे नक्षलवाद्यांचा बिमोड करा , शहरी नक्षलवाद्यांना कठोर शासन करा , आतंकवाद्यांना फाशी द्या , गैरकृत्य करणारे नेते , व्यक्ती यांना शिक्षा करा , अशा मागण्यांचे प्रमाण क्वचितच असते. उलट बरेच प्रसंगी तर आतंकवादी व गैरकृत्य करणारे नेते यांच्या मागे जनता उभी ठाकलेली दिसली. याला  आपल्या राष्ट्राचे दुर्भाग्य नाही म्हणणार तर आणखी काय ? असे जर होत असेल तर ही आपली अधोगतीकडे होत असलेली वाटचाल ठरणार नाही का ? परंतू उपरोक्त बाबींचा विचार शांत चित्ताने , सर्वांना , सर्व पक्षीयांना देशहितासाठी एकत्र येऊन होत तर नाहीच , होतांना दिसतही नाही व भविष्यातही होईल की नाही याची शाश्वती नाही. ज्या मागण्यांनी दुस-यांच्या हक्कावर गदा येत नसतील तर अशा न्याय्य मागण्या करणे रास्त आहे 

    आपला देश हा हजारो वर्षांपासून देणा-यांचा देश म्हणून ओळखला जातो. आपली कवच कुंडले काढून देणारा  दानशूर कर्ण , दरवर्षी स्वत:ची संपत्ती दान करणारा हर्षवर्धन , मरेतो स्वत:च्या शरीराचे  मांस दान करणारा राजा शिबी अशा  कित्येक राजांचा असा देश आहे. त्यागी पुरुषांचा , महात्म्यांचा देश आहे , “वही जीते है, जो दुसरोके लिये जीते है” असा संदेश देणा-या स्वामी विवेकानंद यांचा देश आहे , देशातील गरीबी पाहून वस्त्र त्याग करणा-या महात्मा गांधींचा देश आहे. परंतू सांप्रत काळात मात्र याच देशात हे सर्व विसरून केवळ स्वत:चा स्वार्थ साध्य होईल मग दुस-याचे जे काय होईल ते होवो अशा प्रकारच्या याचनाच जास्त होतांना दिसून येत आहे. विविध मागण्या करतांना आपल्या भारतमातेवर काय संकटे आहेत , कोरोना , दहशतवाद , चिनने आता श्रीलंकेचे एक बेट तर हस्तगत केले आहेच शिवाय कोलंबो मध्ये सुद्धा त्याने शिरकाव केला आहे. आगामी काळात आपल्या देशासाठी हे मोठे आव्हानच ठरणार आहे. सरकार जी काय पाऊले उचलायची ती उचलेल परंतू नागरिक म्हणून आपले मात्र या वरील बाबींकडे दुर्लक्ष आहे. देशाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असून आपल्या देशात मात्र वैयक्तिक फायदा कसा करून घेता येईल, आपल्याच पात्रात तूप कसे ओढता येईल यात चढा ओढ करतांना निव्वळ मांगो ...मांगो ...मांगो असा मागण्यांचा सपाटा सुरु आहे. 

1 टिप्पणी: