२६/०८/२०२१

Article about leaders hatred statements about each other

 ...वो घाव नही भरता जो बना हो कडवी बोली से  


एकीकडे जनता  बिचारी कोरोना , बेरोजगारी , अवर्षण , पाण्याची टंचाई , शिक्षणाची झालेली वाताहत व इतर अनेक प्रश्न यांमुळे हवालदिल झाली आहे तर दुसरीकडे नेते एकमेकांशी भांडत आहेत, यांचे कार्यकर्ते कोरोनाचे सर्व नियम डावलून एकमेकांवर दगडफेक करीत आहेत व आपल्या नेत्यांकडून पाठ सुद्धा थोपटून घेत आहे. जनतेला कोरोना नियम पाळायला सांगायचे तेच नियम डावलून हिंसक आंदोलने करणा-यांचे कौतुक करायचे, वा रे वा !

स्वातंत्र्योत्तर काळाच्या सुरुवातीचे राजकारण कसे होते हे वाचनातून सर्वांपुढे आलेले आहे. उच्चविद्याविभूषित नेहरू पंतप्रधान तसेच त्यांचे विद्वान मंत्रीमंडळ असे नेते त्याकाळात होते तसेच विरोधी पक्षांचे नेते सुद्धा होते. तरुण अटलजींचे संसदेतील भाषण , त्यांच्या वक्तृत्वाने प्रभावीत होऊन नेहरूंनी अटलजी हे पुढे भारताचे पंतप्रधान होतील असे भाकीत केले होते व ते खरे ठरले होते. तसेच विरोधी पक्षाचे असूनही अटलजींनी बांगलादेश निर्मितीच्या वेळी दुर्गा अवतार म्हणून इंदिरा गांधी यांची स्तुती केली होती. नरसिंहराव पंतप्रधान असतांना त्यांनी युनो मध्ये अटलजींना भारताचा प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. विरोधी पक्षातील नेता प्रतिनिधी म्हणून आलेला पाहून व भारताची प्रगल्भ लोकशाही पाहून जगातील नेते अवाक झाले होते. अटलजींनी तिथे तेंव्हा आंतर्राष्ट्रीय स्तरावर सर्वात प्रथम हिंदीतून भाषण दिले होते. अशी कित्येक उदाहरणे भारताच्या राजकारणात मिळतील, त्या काळात जी राजकीय प्रगल्भता होती ती मात्र जसे जसे कालोत्क्रमण होत गेले तशी-तशी लोप पावत जाऊ लागली व आता तर ती लयालाच गेली की काय असे वाटू लागले आहे. प्र.के.अत्रे , यशवंतराव , बाळासाहेब ठाकरे , वसंतराव असे नेते पाहिलेल्या महाराष्ट्राची राजकीय स्थिती किती रसातळाला गेली आहे याचे दाखले दररोज मिळू लागले आहे. जाहीर भाषणातून एकमेकांवर शाब्दिक वार करण्याची जणू प्रथाच महाराष्ट्रात हल्लीच्या नेत्यांनी सुरु केली आहे. सुरुवातीला प्र.के अत्रे व नंतर बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या भाषणातून त्यांच्या थेट , रोखठोक अशा शैलीत बोलत परंतू त्याला एक दर्जा होता , विनोदाची , व्यंगात्मक अशी त्यांची शैली होती. त्यांचा कित्ता गिरवण्याच्या नादात सांप्रतकालीन नेते बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत स्वत:ची राजकीय उंची कमी करून घेत आहेत. कुणी म्हणते मारू , कुणी म्हणते थोबाड फोडू , कुणी कानाखाली आवाज काढू तर कुणी म्हणते चपला मारू , कुणी अरे-तुरे ची भाषा बोलते, कुुणी कुणाचा बाप काढते. एकीकडे जनता  बिचारी कोरोना , बेरोजगारी , अवर्षण ,  पाण्याची टंचाई , शिक्षणाची झालेली वाताहत व इतर अनेक प्रश्न यांमुळे हवालदिल झाली आहे तर दुसरीकडे नेते एकमेकांशी भांडत आहेत, यांचे कार्यकर्ते कोरोनाचे सर्व नियम डावलून एकमेकांवर दगडफेक करीत आहेत व आपल्या नेत्यांकडून पाठ सुद्धा थोपटून घेत आहे. जनतेला कोरोना नियम पाळायला सांगायचे व तेच नियम डावलून हिंसक आंदोलने करणा-यांचे कौतुक करायचे, वा रे वा !

नेत्यांच्या ही अशी वागणूक पाहून किती लिहायचे ? किती भाष्य करायचे ? या लिहिण्याचा काही उपयोग होतो की नाही? यांच्याकडे व यांच्या गलीच्छ राजकारणाकडे पाहून जनता पुरती कंटाळून गेली आहे. यापूर्वीही नेत्यांच्या अशा काहीही बोलण्या बद्दल “घासावा शब्द , तासावा शब्द ,तोलावा शब्द बोलण्यापूर्वी” हा लेख , तोंडात कोरोना विषाणू भरण्याचे उद्गार काढल्यावरचा “...त्यापेक्षा गरीबाच्या तोंडात घास भरा” हा लेख , “गाडी रेड लाईट ची भाषा रेड लाईट एरियाची” , अनुभवाचे बोल  असे कितीतरी लेख लिहिले आहेत तसेच अनेक  संपादक, राजकीय विश्लेषक, पत्रकार, लेखक यांनी या बाबत मोठे लिखाण केले आहे. मग हे कुणी वाचते की नाही ? हे नेत्यांपर्यंत पोहोचते की नाही ? की पोहचूनही आपल्या स्वार्थी राजकारणाकरीता हे आपले शाब्दिक हल्ले सुरूच ठेवत असतील. वैयक्तिक वा राजकीय वैमनस्यातून एकमेकांवर तोंडसुख घ्यायचे , ज्याची सत्ता असेल त्याने मग दुस-यावर कारवाई करायची व मग त्यानंतर कार्यकर्त्यानी एकमेकांशी भिडायचे बस हाच काय तो पोरखेळ सध्याच्या राज्कारणात सुरु आहे, राज्याचे व जनतेचे प्रश्न त्यांच्या समस्या या गेल्या घंटा गाडीत. यथा राजा तथा प्रजा ही जुनी म्हण आहे राजासारखे अनुकरण प्रजा करायला लागते. नेतेच जर सदैव मारठोकीची भाषा करीत असतील तर त्या राज्याची जनता सुद्धा त्याचेच अनुसरण करायला लागेल व नाहक न्यायव्यवस्था व सुरक्षा यंत्रणांचा बोजा वाढेल. सर्वच नेत्यांनी आपली राजकीय प्रगल्भता, आपली सौजन्यपुर्ण वागणूक , साधी राहणी, चांगली भाषा असे आदर्श जनतेपुढे ठेवायला पाहिजे व नेहमी चांगले बोलायला हवे. अनेक महाराष्ट्रीयन संत मंडळींनी शब्दांबाबत सांगितलेल्या ओव्या, श्लोक या सुद्धा लक्षात ठेवायला हव्या केवळ राजकारणा पुरता त्यांचे नांव घेऊ नये कारण,   

“भर जाता है गहरा घाव जो होता है गोलीसे पर वो घाव नही भरता जो बना हो कडवी बोली से तो मिठे बोल कहो”

४ टिप्पण्या: